परमबीर सिंह महाराजांचा स्वयंभू प्रकटोत्सव !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 05:38 AM2021-11-29T05:38:38+5:302021-11-29T05:39:10+5:30
Parambir Singh : परमबीर सिंह म्हणजे ‘मिस्टर इंडिया’च! किती कला असावी एखाद्या माणसात! मुंबई पोलिसांचे भांडे फोडले, गुप्तचर यंत्रणांच्या मिशाही उतरवल्या त्यांनी!!
- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
चला, एक उत्तम झाले... परमबीर सिंह, शेवटी एकदाचे प्रकट झालात आपण! महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आपले स्वागत आणि नमस्कार आपल्याला! आपले प्रकट होणे हा खरं तर एक उत्सवच म्हणायचा. संत -महात्म्यांचे प्रकट उत्सव नसतात का, तसाच आपलाही! आपल्या प्रकट होण्याची तारीख इतिहासात नोंदली गेली पाहिजे. काय हरकत आहे? किती जणांना छळलेत तुम्ही, किती लोकांना भुलवले, कित्येकांना तर जळवलेही! आपल्या वाटेकडे कधीचे डोळे लागले होते सगळ्यांचे. हुजूर, आपण खूप उशीर केलात हे खरे पण तक्रार तरी कशी करणार?... शेवटी आपण आलात हे काय कमी आहे?
श्रीमान परमबीर सिंह, आपण गायब झालात आणि किती गोंधळ माजला इथे!! केवढी चर्चा, केवढी चलबिचल! आपण कुठे गेलात, कसे गेलात, गायब कसे झालात याचा विचार करुन करून सगळे हैराण झाले होते. कोणी पळवले तर नाही आपल्याला? रेड कॉर्नर नोटीसला आपण कसा गुंगारा दिला असेल? वेशभूषा तर नाही बदलली? की प्लास्टिक सर्जरी करवून घेतलीत?... आता काय सांगू, किती चर्चा उसळल्या त्या! आपण गायब झालात आणि लोकांच्या कल्पनेला पंखच पंख फुटले. कोणी म्हणत होते आपण बेल्जियममध्ये आहात. कोणी सांगायचे लंडनमध्ये. काहींनी तर खुद्द आपल्याबरोबर चहा, नास्ता केल्याच्या बढायाही मारल्या.
...काय करणार दुसरे? आम्ही आपले निमूट ऐकून घेतले. मुख्य म्हणजे विश्वास कोणावर ठेवणार? अर्थात, आपल्यावरचा आमचा विश्वास मात्र ढळला नाही कधी! आम्हाला खात्री होतीच की, एक ना एक दिवस आपण नक्की परत याल... पोलिसांना, इतर यंत्रणांना आपण कसा गुंगारा दिलात, हे सांगालही. मला तर वाटते, लपण्यासाठी कोणकोणत्या युक्त्या प्रयुक्त्या करता येतात हे आपण थेट गुप्तचरांनाच शिकवायला काय हरकत आहे? देशातील यंत्रणांच्या गुप्तचरांना एकदा का आपले कला कौशल्य अवगत झाले की मग आरोपीना सहज पकडणे हा त्यांच्या हातचा मळच होऊन जाईल... काय?
तुम्ही तर ‘मिस्टर इंडिया’चे अनिल कपूर आणि ‘भूतनाथ’चे अमिताभ बच्चन यांना खाली मान घालायला लावले, परमबीर सिंह!! तेही दोघे असेच गायब झाले होते पण ते पडद्यावर!!.. आपण तर अगदी प्रत्यक्षातच गायब होऊन दाखवले! अमिताभ आणि अनिल कपूर यांनी तोंडात बोटेच घातली असतील!
पण काही असो हुजूर, एका गोष्टीसाठी मात्र आपले आभारही मानायचे आहेत. अनेकांची भांडी आपण फोडलीत! पहिले अर्थातच मुंबई पोलीस! उगीचच त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जात होती आजवर! पण त्यांच्यातल्याच एका अधिकाऱ्याने मुंबई पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांचे भांडे फोडून टाकले. देशातल्या समस्त गुप्तचर यंत्रणा स्वतःला मारे तुर्रमखान का समजेनात, तुम्ही त्यांनाही गुढघे टेकायला लावून त्यांची मिशी उतरवलीत! आपण गायब झाल्यावर आपल्याला शोधण्यासाठी या यंत्रणा मारे हात-पाय मारत राहिल्या, इकडून तिकडे पळत राहिल्या... शेवटी न्यायालयाने आपल्याला फरार घोषित केले. हा सगळा गोंधळ इकडे चालू असताना आपण मात्र चंदीगडला मस्त आराम करत होतात. किती कमालीची गोष्ट आहे ना? आपल्या या कौशल्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो, हुजूर !
काही भोचक लोक उगीचच नसते प्रश्न विचारतात. म्हणे, परमबीर सिंह, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यात शक्तिमान कोण? - आता हा काय प्रश्न झाला? पोलिसांचे शहेनशहा आपणच तर आहात, मान्यवर! ज्यांनी कोणी आपला रुबाब पाहिला असेल, त्यांना हे कळले असेलच की कोण आहात आपण, कुठून आलात, कुठे जाऊ शकता! ‘‘डॉन को पकडना मुश्कीलही नही, नामुमकिन है’’ हे तर सरळसरळ सिद्धच केलेत की आपण!
- पण समजा, आपण प्रकट झालाच नसतात तर काय झाले असते? - या विचारांनी मी कधीकधी फार हैराण होऊन जातो. आपण गायबच राहिला असतात तर आपली संपत्ती जप्त झाली असती, असे काही लोक म्हणतात! अज्ञानी आहेत हो ते! त्यांना काय माहीत आपले हात कुठवर पोहोचलेले आहेत ते!
आपल्या प्रकट दिनाचा उत्सव जरूर साजरा करावा, असा सल्ला मी पोलीस आणि गुप्तचर यंत्रणाना देईन. आपले प्रकट होणे म्हणजे सरकारी पातळीवर एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. सगळ्या व्यवस्थेला आपण वेड्यात काढले ते एकवेळ तसे ठीकच! मी तर म्हणतो, जे झाले ते गेले! आता आपण आला आहात ना, तर सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला पाहिजे. आपल्या प्रकट होण्याने आपल्याला शोधण्यासाठी लागणारे श्रम, वेळ आणि साधनांची केवढी बचत झाली! जनतेने आपले उपकृतच असले पाहिजे खरे तर!
तो प्रेम से बोलो... परमबीर महाराज के प्रकटोत्सव की जय...!
... आणखी एक. आपण आणि काही पोलिसांनी मिळून एका बिल्डरकडून १५ कोटी रुपये खंडणीपोटी घेतले, असा आरोप झालाय; पण आपण त्याची चिंता तर बिलकुल करू नका. आपल्या देशात असे आरोप होतच असतात, हे मी आपल्याला वेगळे सांगायला हवे का?, आपण देशमुखांवर १०० कोटींचा आरोप केलात. दुसऱ्यांनी आपल्यावर १५ कोटींचा केला. आता असे समजून चला, जो जितका मोठा तेवढा त्याच्यावरचा आरोप मोठा !
खरे काय ते देवाला माहीत. आणि हो, चिंचेच्या पानावर कोलांटी मारण्याची कला तर, कुणीही आपल्याकडूनच शिकावी. चिंचेचे पान अगदी लहान असते. त्याच्यावर कोलांटी मारणे किती कठीण... म्हणूनच तर, हिंदीत तशी म्हण तयार झाली... इमली के पत्तेपर गुलाटी मारना !, ती आठवण्याचे कारण चांदीवाल आयोगापुढे आपल्या वकिलाने सांगितले की, अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांविषयी कोणते खास पुरावे आपल्याकडे नाहीत. काही अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणून आपण हा आरोप ठोकून दिला.
अरे वा, परमबीर सिंह; आपण तर स्वत: पोलीस आयुक्त होतात. आरोप करायचे तर पुरावे लागतात हे आपणास ठाऊक असेलच. आव तर मोठा आणलात; पण स्वत: अडचणीत येताच कोलांटी मारलीत. जबरी कलाबाज आहात आपण !!! आता विनंती इतकीच की, कृपया एकच करा, ही कला इतर पोलीस अधिकाऱ्यांना शिकवू नका. आपण जे केले आहे, त्याने अख्ख्या पोलीस यंत्रणेची मान खाली गेलीच आहे; त्यात आता आणखी भर नको. तसे आपण धन्यच आहात परमबीर सिंहजी !