दुष्काळाच्या छायेत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:35 AM2017-09-06T01:35:45+5:302017-09-06T01:36:15+5:30
एकीकडे पाऊस मुंबईत धो-धो बरसतो. मुंबईकरांना कंबरभर पाण्यातून घराचा मार्ग शोधावा लागतो. तर दुसरीकडे शेतात लावलेली पºहाटी जगविण्यासाठी तिला गडवाभर पाणी टाकून टाकून विदर्भातील शेतक-यांची कंबर लागली आहे.
एकीकडे पाऊस मुंबईत धो-धो बरसतो. मुंबईकरांना कंबरभर पाण्यातून घराचा मार्ग शोधावा लागतो. तर दुसरीकडे शेतात लावलेली प-हाटी जगविण्यासाठी तिला गडवाभर पाणी टाकून टाकून विदर्भातील शेतक-यांची कंबर लागली आहे. मुंबईकरांनी असा पाऊस न येण्यासाठी तर विदर्भवासींनी पाऊस बरसण्यासाठी गणरायाला निरोप देताना साकडे घातले आहे.
गेल्यावर्षी पश्चिम महाराष्ट्र- मराठवाड्याने दुष्काळ अनुभवला. शासनही मदतीला धावले. जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यापासून ते लातूरला रेल्वेने पाणी पोहोचविण्यापर्यंतचे उपाय योजले गेले. मात्र, तीच परिस्थिती येत्या उन्हाळ्यात नागपूरकरांवर येते की काय, याची चिन्हे दिसू लागली आहेत. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठ्याची क्षमता २९६४.४ दलघमी इतकी आहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार या मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ९२० दलघमी इतका म्हणजे केवळ ३१ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्प हे खºया अर्थाने लोकवस्ती व शेतीसाठी संजीवनी असतात. मात्र, मध्यम प्रकल्पातही फक्त ३७ टक्के जलसाठा आहे.
एक गोसेखुर्द सोडले तर एकही धरण भरलेले नाही. तोतलाडोह प्रकल्पात केवळ १२ टक्के, रामटेक (खिंडसी) २३ टक्के, इटियाडोह ३४ टक्के, बोर ३४ टक्के, धाम ५४ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ (२८ टक्के) अशी धरणांची बिकट अवस्था आहे. आॅगस्ट संपला. सप्टेंबरचाही पहिला आठवडा संपत आला आहे. गणेश स्थापनेला दोन-तीन दिवस हजेरी लावलेल्या पावसाने आता विसर्जनाला मात्र दडी मारली आहे. गणरायासोबत पाऊसही निघून गेला तर शेतीसह पिण्याचे पाणीही मिळणे कठीण होईल, अशा भयावह परिस्थितीला विदर्भवासीयांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी याच काळात जलसाठा ६० टक्क्यांपर्यंत होता. आता परतीचा मान्सून विदर्भात किती बरसेल यात शंका आहे. परततानाही वरुण राजाने कृपादृष्टी केली नाही तर विदर्भातील शेतकºयांना पुन्हा एकदा ‘देवेंद्रांवरच’ अवलंबून राहावे लागणार आहे.