बोथटलेले अस्त्र !

By admin | Published: October 11, 2015 10:10 PM2015-10-11T22:10:34+5:302015-10-11T22:10:34+5:30

कोणताही कुशल योद्धा एकदा वापरून झालेले आणि त्या वापरण्यात यश मिळवून दिलेले अस्त्र पुन्हा वापरीत नाही.

Shaggy weapon! | बोथटलेले अस्त्र !

बोथटलेले अस्त्र !

Next

कोणताही कुशल योद्धा एकदा वापरून झालेले आणि त्या वापरण्यात यश मिळवून दिलेले अस्त्र पुन्हा वापरीत नाही. याचं साधं कारण प्रत्येक शत्रू एकसमान नसतो आणि म्हणून जसा शत्रू तसे अस्त्र असे साधे गणित त्यामागे असते. परंतु ठाकरे बंधूंना, मग ते थोरल्या पातीचे असोत की धाकल्या, त्यांना हे काही मान्य नसावे असे दिसते. नाशिक महापालिकेच्या आणि तत्पूर्वी विधानसभेच्या (जिने त्यांच्या ओंजळीत चार आमदारक्या टाकल्या त्या) निवडणूक प्रचारात त्यांनी छगन भुजबळ यांना लक्ष्य ठरविले आणि तथाकथित ठाकरी भाषेचा यथेच्छ वापर करून घेतला. नाही म्हटले तरी भुजबळांभोवती गोळा झालेल्या काही टारगटांमुळे भुजबळांची प्रतिमा तशीही डागाळत चालल्याने लोकांनी राज ठाकरे यांना पटवून घेतले. पण त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे तेव्हा त्यांची पाटी कोरी होती. त्यांनी खास मुंबईहून नाशकात विकायला आणलेली स्वप्ने नाशिककरांना मोहात पाडून गेली व नाशिक महापालिकेची सत्ता त्यांच्या ओटीत घातली. आता हळूहळू त्याच पालिकेच्या पुढील निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मनसेच्या महापौराची एक अडीचकी केव्हाच संपून गेली आहे. पण नाशिककरांची झोळी आजही रितीच राहिली आहे. टाटा, अंबानी, महिन्द्र अशी अनेक नावे घेऊन ते केवळ आपल्या सांगण्याखातर नाशिकचा कायाकल्प (केवळ कायापालट नव्हे) करण्यास कसे उत्सुक आहेत, असे राज सांगते आले. कुठे काही हालचाल दिसेना तेव्हा पत्रकार प्रश्न करू लागले तेव्हा आत्ताशी तर वर्ष झाले, दीडच झाले, दोनच झाली इतकेच पालुपद कानावर पडू लागले. अशा स्थितीत राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने वर्षभरात (ते तसे अजून काही दिवस दूरच आहे) काहीही केले नसून भाजपावाले थापाडे असल्याचा अहेर त्यांनी कल्याणात जाऊन दिला आहे. खरे तर राज डरकाळले, फुत्कारले, टणत्कारले आदि विशेषणे केव्हाच निष्प्रभ ठरली आहेत. त्यांना तेव्हाच मोल आणि महत्त्व होते जेव्हा ‘राज ठाकरे सत्ताधीश झाले तर’ या परिकल्पनेत मतदार वावरत होते. पण ही परिकथा केवळ फुसकीच नव्हे तर पार भंपक निघाली. त्याचाच परिणाम म्हणून मग ज्या नाशिककरांनी एकदम चार आमदारक्या दिल्या, त्या चारही अलगदपणे काढूनही घेतल्या. इत्यर्थ इतकाच की तथाकथित घणाघाताने केवळ करमणूक होते आणि तीही जेव्हा घण अगदी नवाकोरा असतो!

Web Title: Shaggy weapon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.