शरद पवार, ‘रयत’ आणि पाचपुते

By admin | Published: May 11, 2017 12:20 AM2017-05-11T00:20:13+5:302017-05-11T00:20:13+5:30

शरद पवार यांच्या कुठल्याही विधानातून व कृतीतून अनेक अर्थ ध्वनीत होतात. राष्ट्रवादीचे माजी मंत्री व सध्या भाजपवासी असलेले

Sharad Pawar, 'Raiat' and Panchpatay | शरद पवार, ‘रयत’ आणि पाचपुते

शरद पवार, ‘रयत’ आणि पाचपुते

Next

शरद पवार यांच्या कुठल्याही विधानातून व कृतीतून अनेक अर्थ ध्वनीत होतात. राष्ट्रवादीचे माजी मंत्री व सध्या भाजपवासी असलेले बबनराव पाचपुते यांना ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिलवर स्थान देऊन पवार यांनी नगर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा गळ टाकला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी तशी खिळखिळी झाली आहे. एकेकाळी जिल्ह्यात पक्षाचे चार आमदार होते. पालकमंत्रिपद होते. एक खासदार होता. आता ती परिस्थिती बदलली आहे. विधानसभेत पक्षाचे जिल्ह्यातून अवघे तीन आमदार आहेत. कालपरवा जिल्हा परिषदेतही कॉँग्रेसने अध्यक्षपद मिळविले. दोन्ही खासदारक्या युतीकडे आहेत. राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष पदालासुद्धा दाबजोर माणूस मिळायला तयार नाही. यशवंतराव गडाख यांसारखा नेताही पक्षापासून दुरावला आहे. राष्ट्रवादी बदलली नाही तर आगामी विधानसभेला आणखी पानिपत संभवते. या परिस्थितीने पवारही अस्वस्थ असणार. त्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीत त्यांनी काही फासे टाकले आहेत.
एकेकाळी पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे बबनराव पाचपुते हे गत विधानसभेपूर्वी पवारांपासून दुरावले. हातावरील घड्याळ दूर करत तेही मोदींच्या नौकेत बसले. अर्थात ते भाजपाकडून निवडून आले नाहीत. त्यांच्या श्रीगोंदा मतदारसंघात पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावत राहुल जगताप यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले. पाचपुते पवार यांना ‘पांडुरंग’ मानत होते. मात्र, विधानसभेला या दोघांनीही एकमेकांबद्दल प्रचंड गरळ ओकली.
‘बारामतीकरांनी मला मोठे केलेले नाही’, इतक्या टोकाची टीका पाचपुते यांनी केली. पवारांशी मैत्री तुटल्यापासून पाचपुते राज्याच्या राजकारणापासून दूर फेकले गेले आहेत. जिल्ह्यातही त्यांचा संपर्क तुटला. त्यांच्या दोन खासगी साखर कारखान्यांपैकी एक कर्जबाजारी आहे. भाजपा सरकार त्यांना मदत करेल असे वाटले होते. पण, अद्याप तशी मदत झालेली नाही. भाजपाने त्यांना राज्यात व जिल्ह्यातही दखलपात्र पद व संधी दिलेली नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर रयतच्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना पवार यांनी पाचपुते यांना मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निर्णयातून पवारांनी पद्धतशीर संशयकल्लोळ निर्माण केला आहे. पाचपुते नेमके आपले आहेत का? हा संशय आता भाजपाच्याच मनात निर्माण होईल. भाजपा कदाचित पाचपुते यांना तपासून पाहण्यासाठी त्यांचा ‘वेटिंग पिरियड’ आणखी वाढवेल. ‘रयत’वर विविध पक्षांचे सदस्य असतात. यापूर्वीही नगर जिल्ह्यातून कम्युनिस्ट नेते कॉ. पी.बी. कडू पाटील पदाधिकारी होते. शेकापचे एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख ‘रयत’वर असतात. कॉँग्रेसचे पतंगराव कदम आहेत. यावेळी पवारांनी पाचपुते यांच्या रूपाने भाजपा नेत्याला संधी दिली आहे. ही संधी भाजपापेक्षाही पाचपुते यांना आहे. पाचपुते यांना राष्ट्रवादीचे दरवाजे उघडे आहेत किंवा ते कधीही आमचे होऊ शकतात, असाही संदेश त्यांनी पेरला आहे. यातून श्रीगोंद्यातील आपल्या आमदारालाही त्यांनी सूचक इशारा दिला आहे. नगर जिल्ह्याच्या आगामी राजकारणाचे काही आडाखे यामागे असू शकतात.
पाचपुते यांना संधी देताना नगर जिल्ह्यातील पवारांचे जुने समर्थक शंकरराव कोल्हे यांनाही पवार विसरलेले नाहीत. त्यांनाही उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. कोल्हे यांच्या सूनबाई स्रेहलता कोल्हे याही नगर जिल्ह्यातून भाजपाच्या तिकिटावर गत विधानसभेला आमदार झाल्या. वर्षानुवर्षाची कोल्हे व पवार यांची युती त्यावेळी तुटली. मात्र, कोल्हे परिवाराने भाजपाचा पंचा गळ्यात घातल्यानंतरही पवार यांनी त्यांना सोडलेले नाही. त्यामुळे पाचपुते यांच्याप्रमाणेच भाजपा आता कोल्हे परिवाराकडेही संशयाने पाहू शकते. ‘रयत’मध्ये पक्षीय राजकारणाला थारा नाही, हा एक मोठा संदेश पवारांनी राज्याला दिलाच, पण त्याआडून नगरच्या राजकारणात एक मोठी चालही खेळली आहे. पाचपुते पुन्हा या पांडुरंगाच्या चरणी लीन झाले तरी नवल वाटायला नको.
- सुधीर लंके

Web Title: Sharad Pawar, 'Raiat' and Panchpatay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.