- प्रा. डॉ. प्रकाश खांडगे भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, प्रख्यात गायक, संगीतकार, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक शेखर सेन यांनी देशातील सांस्कृतिक चळवळीला विकेंद्रित करण्याचे मोठे कार्य सुरू ठेवले आहे. ते नोव्हेंबर महिन्यात १000 एकपात्री नाट्य कारकीर्द साजरी करीत आहेत.आजवर सांस्कृतिक चळवळ ही दिल्ली, मुंबई, कोलकाता, मद्रास आदी महानगरांपुरतीच मर्यादित होती याचा अर्थ देशाच्या अन्य भागात सांस्कृतिक चळवळ रुजलेली नव्हती असे नाही. पण तेथील कलावंतांना अभावानेच राष्ट्रीय रंगमंच उपलब्ध झाला. शेखर सेन हे संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सांस्कृतिक चळवळ ही जिल्हा, तालुका पातळीवर नेली. आजवर शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य आणि नाटक यांचाच वरचष्मा सांस्कृतिक घडामोडींवर होता; पण शेखर सेन यांनी आदिवासी वाड्यापाड्यावरील लोककलावंतांना श्रेष्ठ भारत संस्कृती समागमसारख्या चळवळीत सामावून घेतले. इतकेच नव्हेतर, देशातील शिखरस्त सर्व कलावंत आणि अभ्यासक यांचे मंडळीकरण श्रेष्ठ भारत संस्कृती समागम या उपक्रमाद्वारे साध्य केले.तुलसी, कबीर, विवेकानंद, सुरदास आणि साहेब हे एकपात्री प्रयोग त्यांनी सादर करून इतिहास घडविला आहे़ १९९७ साली त्यांनी तुलसी या एकपात्री प्रयोगाचे लेखन केले. कारण तुलसीदास यांच्या रामायणाने शेखर सेन प्रभावित झाले होते. जणू तुलसीदास यांनी स्वप्नात येऊन शेखर सेन यांना साक्षात्कार दिला की काय? असे वाटावे. कारण त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात तुलसी हा एकपात्री प्रयोग लिहिला आणि ‘धर्मयुग’चे संपादक डॉ. धर्मवीर भारती यांच्यापुढे त्यांनी तुलसीचे वाचन केले. डॉ धर्मवीर भारतीदेखील तुलसीने प्रभावित झाले. १0 एप्रिल १९९८ रोजी भाईदास सभागृहात दुपारच्या वेळी तुलसी हा एकपात्री प्रयोग शेखर सेन यांनी सादर केला़ भारतीय संस्कृतीत तुलसीदास, कबीर, सुरदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, ज्ञानेश्वर, तुकाराम अशा संतांना अनन्यसाधारण महत्त्व असून परमार्थ साधनेबरोबरच विश्वबंधुत्वाचा संदेश या संतांनी दिला.त्यांच्या विचारांनी मी झपाटलो गेलो. म्हणूनच आधी तुलसी आणि नंतर कबीर असे एकपात्री प्रयोग मी करू शकलो, असे मत शेखर सेन यांनी व्यक्त केले़ लेखन, दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाश आणि प्रत्यक्ष गायन व अभिनय अशा सर्वच आघाड्यांवर शेखर सेन यांना एकपात्री प्रयोग करताना एकाग्रता दाखवावी लागते़. तुलसीमध्ये ५२ गीते, कबीरमध्ये ४५ गीते, ४३ राग अशी संगीत साधना करीत शेखर सेन यांनी देशभर आणि न्यू यॉर्क, लंडनमध्ये आपले एकपात्री प्रयोग सादर केले. ३७ वर्षांची संगीतसाधना सांभाळीत एकपात्री प्रयोगांचे मार्गक्रमण करीत असताना विवेकानंदांच्या जीवनकर्तृत्वाने शेखर सेन भारावून गेले आणि जानेवारी २00४ साली त्यांनी विवेकानंद हा एकपात्री प्रयोग रंगभूमीवर आणला.आपल्याकडे अनेक सांस्कृतिक चळवळींची पुनरुक्ती होते़ अनेक संस्था तेचतेच कार्य करीत राहतात. उदा. राष्ट्रीय नाट्य विद्यालय जर नाट्यचळवळीची केंद्रीय संस्था असेल तर केंद्रीय पातळीवर पुन्हा वेगळी नाट्यचळवळ राबविणे अप्रस्तुत आहे. त्यामुळे संगीत नाटक अकादमी नाटकासोबतच लोककलांच्या जतन, संवर्धन, संशोधनासाठी कार्य करीत असल्याचे मत शेखर सेन यांनी व्यक्त केले. त्यांनी भारतीय कलांच्या इतिहासाला आपल्या कार्यकर्तृत्वाने नवा आयाम दिला आहे.(लेखक लोककलेचे अभ्यासक आहेत)
सांस्कृतिक विकेंद्रीकरणाला गती देणारा कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 6:28 AM