- एम. व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपतीआपल्या परंपरागत भारतीय समाजाच्या समृद्ध सामाजिक वस्त्राला मजबुती देणारा एक शक्तिशाली धागा जर कोणता असेल तर तो आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आहे. भारतीय समाजातील कुटुंब ही एक संस्थाच असते जिने प्राचीन काळापासून सामूहिक संस्कृतीची जोपासना केली आहे. संयुक्त कुटुंब पद्धती हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. पण शहरीकरणाने आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने आपली घरे बाधित झाली आहेत. किमान शहरी भागात तरी हीच वस्तुस्थिती पहावयास मिळते. कारण तेथे लहान लहान कुटुंबे अस्तित्वात आली आहेत. सामाजिक आणि आर्थिक प्रभावामुळे आपली संयुक्त कुटुंब व्यवस्था विरविरीत झाली आहे.मला खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते की, आपल्या सध्याच्या जीवनपद्धतीमुळे वर्षानुवर्षे जपलेल्या परंपरा आणि चालीरीती टिकवून ठेवण्याचे काम करणाऱ्या संयुक्त कुुटुंब पद्धतीचे फार मोठे नुकसान झाले आले. तथापि वसुवैध कुटुंबकम्ची भावना आपल्या रक्तातच भिनली असल्यामुळे आपला समाज अन्य समाजापेक्षा सुस्थितीत दिसून येतो. त्यामुळे आपल्या समाजाचे हे शहाणपण पुढील पिढ्यांपर्यंत पोचविणे हे आपले कर्तव्यच ठरते.परस्परांपासून वेगळ्या असलेल्या दोन जगात आपण वावरतो आहोत, या भावनेने आजचा तरुण वर्ग गोंधळलेला दिसतो. तथापि संयुक्त कुटुंब पद्धती आणि छोटे कुटुंब याच्या गुणदोषांबद्दल बरेच काही सांगता येईल. काळानुरुप समाजात बदल घडत असतात. त्यामुळे प्रगतीशील रिवाज आणि जीवनपद्धतीचे सर्वांनीच स्वागत करायला हवे. प्रतिगामी जीवन पद्धतीतून महिलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे त्या बालविवाह, हुंडापद्धती, स्त्रियांवरील अत्याचार आणि भ्रममूलक चालीरीती यासारख्या अनिष्ट चालीरीतींचा सामना करण्यास सक्षम होतील.शिक्षण देऊन त्यांचे सबलीकरण करून न थांबता त्यांना अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीतींचा सामना करण्यास सज्ज केले पाहिजे. आपल्या पितृसत्ताक समाजात पुरुषांकडून या गोष्टींचा प्रतिकार जरी करण्यात आला तरी त्याला तोंड देण्याची क्षमता स्त्रियांमध्ये यायला हवी. एक स्त्री शिकली की सारे कुटुंब शहाणे होते असे जे म्हटले जाते ते यथार्थ आहे. विकासासाठी संपूर्ण समाज शिक्षित होण्याची खरी गरज आहे.संयुक्त कुटुंब पद्धतीचा मोठा फायदा हा आहे की कुटुंबातील घटकात त्यामुळे घट्ट बंध निर्माण होतात. तसेच मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. जी मुलं संयुक्त कुटुंबातील आजी-आजोबा, मावशा, काका, चुलत भाऊ यांच्या सहवासात वाढतात, त्यांच्यात जबाबदारीची जाणीव अधिक असते. इतरांविषयी सहानुभूती आणि ममत्वाची भावना संयुक्त कुटुंबामुळे त्यांच्यात निर्माण होते. लहान कुटुंबात वाढणाºया मुलांमध्ये हे गुण रुजणे बºयाच प्रमाणात शक्य होत नाही. संयुक्त कुटुंबातील ममत्वाची भावना मुलांमध्ये घट्ट नातेसंबंध निर्माण करण्याचे काम करते. अर्थात संयुक्त कुटुंबात सगळे छान छान असते असे मला म्हणायचे नाही. त्यांच्यातही संघर्षाचे प्रसंग ओढवतात. भांडणं होतात आणि गैरसमजही वाढतात.मनुष्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी कुटुंबाची मूल्यव्यवस्था बरेच काही कार्य करीत असते. भारताच्या कुटुुंब पद्धतीत ज्येष्ठांची काळजी घेण्यास प्राधान्य असते. पण अलीकडच्या काळात वृद्धांना वृद्धाश्रमात पाठविण्याची प्रथा वाढीस लागली आहे. त्याची अनेक कारणे आहेत. छोट्या कुटुंबात घरे लहान असल्याने जागा कमी असते. मुले परदेशात असल्याने वृद्धांची काळजी कुणी घ्यायची हा प्रश्नच असतो. त्याबद्दल काही निष्कर्ष न काढता मी एवढेच म्हणेन की वृद्धांकडे होणारे दुर्लक्ष हे देशासाठी चांगले नाही. कुटुंबात वृद्धांची अवहेलना करण्यात येते असे मी जेव्हा ऐकतो तेव्हा माझे मन अस्वस्थ होते. अशी प्रकरणे हाताळण्यासाठी सरकारने कायदे केले आहेत पण तरीही प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की वृद्धांचा योग्य सन्मान राखणाºया मूल्याचे जतन केले गेले पाहिजे.जेव्हा मुलांचे आई-वडील दोघेही नोकरी करीत असतात तेव्हा संयुक्त कुटुंबात आजी-आजोबा किंवा काकू-काका हे त्यांच्या मुलांची काळजी घेत असतात, हा संयुक्त कुटुंब पद्धतीचा मोठाच फायदा आहे. पाळणाघरात किंवा बालक मंदिरात बालपण घालविण्यापेक्षा कुटुंबातील व्यक्तींच्या संगतीत राहून त्या मुलांचे बालपण संस्मरणीय ठरू शकते. तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीसुद्धा ते लाभदायक ठरू शकते. संयुक्त कुटुंब व्यवस्थेमुळे बालवयातच एकात्मतेचे सुदृढ नाते निर्माण होते, ज्यातूनच पुढे राष्टÑीय ऐक्य आणि सामाजिक समरसता निर्मितीचा मार्ग प्रशस्त होत असतो. कुटुंबातील ज्येष्ठांनी संगोपन केल्यामुळे मुले मोठी झाल्यावर ती त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी गुंतवणूक करू लागतात. त्यातूनच देशाची आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होण्यास हातभार लागू शकतो.कुटुंब व्यवस्थेचा असाही फायदा आहे की एखादा रिक्षावालासुद्धा स्वत:चे लग्न करण्यापूर्वी आपल्या बहिणीचे लग्न अगोदर करण्याचा विचार करीत असतो. संयुक्त कुटुंबात वाढणाºया मुलांमध्ये सहिष्णुता, संयम, इतरांचे विचार जाणून घेण्याची लोकशाही क्षमता आणि खिलाडूवृत्ती यांची सहजच जोपासना होत असते!निरनिराळे रीतीरिवाज आणि जगण्याच्या पद्धतींचा उदय संयुक्त कुटुंब पद्धतीतूनच झालेला आहे. एकूणच संयुक्त कुटुब पद्धती ही सामाजिक सद्भावनेचे आणि लोकशाही प्रवृत्तीचे बीजारोप करीत असते असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. डिसेंबर १९८९ साली संयुक्त राष्टÑसंघाच्या सर्वसाधारण सभेने आंतरराष्टÑीय कुटुंबवर्ष पाळण्याची घोषणा केली होती. १९९३ साली करण्यात आलेल्या दुसºया एका ठरावान्वये दरवर्षी १५ मे रोजी आंतरराष्टÑीय कुटुंब दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादिवशी कुटुंब व्यवस्थेशी निगडित विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळत असते.यावर्षी ‘कुटुंब व्यवस्था आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्था’ असे याचे स्वरूप ठरविण्यात आले आहे. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी कुटुंब व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. २५ सप्टेंबर २०१५ रोजी संयुक्त राष्टÑसंघाने टिकाऊ विकासाची १७ उद्दिष्टे निश्चित केली. त्यातून दारिद्र्य निर्मूलन, भेदभाव निर्मूलन, मृत्यूदर कमी करणे, पर्यावरण रक्षण या उद्दिष्टांसह जगातील सर्व जनतेचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. भविष्यात हे जग राहण्यासाठी सुंदर ठरावे यासाठी मानवता, करुणा, उदात्तता आणि सहिष्णुता ही तत्त्वे समाविष्ट असलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेचा आपण अंगीकार करायला हवा.
सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांसाठी कुटुंब व्यवस्था आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 4:18 AM