समाजमाध्यमे आणि त्यातील भक्त-गुलाम वगैरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 04:17 PM2019-03-28T16:17:36+5:302019-03-28T16:18:06+5:30

भक्त आणि गुलाम या दोन शब्दांचा अर्थ सुस्पष्ट आहे. ते समानार्थी तर अजिबात नाही

The society and its devotees and slaves ... | समाजमाध्यमे आणि त्यातील भक्त-गुलाम वगैरे...

समाजमाध्यमे आणि त्यातील भक्त-गुलाम वगैरे...

Next

मिलिंद कुलकर्णी
भक्त आणि गुलाम या दोन शब्दांचा अर्थ सुस्पष्ट आहे. ते समानार्थी तर अजिबात नाही. परंतु, सध्या या दोन शब्दांचा वापर समाजमाध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. अर्थात लोकसभा निवडणूक आणि राजकारण या विषयाशी निगडीत मंडळींकडून एखादी मोहीम चालवावी, त्यापध्दतीने हे सारे सुरु आहे.
१२५ कोटी लोकसंख्येच्या भारतदेशात तरुणाईची संख्या लक्षणीय आहे. माहिती तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर ही तरुण मंडळीच करीत असते. तरुण हे वय भारावलेपणाचे, वेडेपणाचे असते. अनुभवाची कमतरता असल्याने भान, विवेक यांचा वापरदेखील कमीच असतो. एखादी गोष्ट आवडली, पटली की, तीच सत्य. बाकी सगळे खोटे असे वाटायला लागते. काहीसा हेकेखोरपणा, हटवादीपणा या वयात असतो. पण वय वाढते, अनुभव गाठीशी आल्यावर भाबडेपण दूर होते, प्रश्न सतावू लागतात. अंधविश्वासापेक्षा डोळसपणा वाढतो. आणि हाच भक्त प्रश्न विचारु लागतो.
गेल्या लोकसभा निवडणुकीत समाजमाध्यमांचे अस्त्र प्रामुख्याने भाजपाने सर्वाधिक वापरले. नरेंद्र मोदी यांची प्रतिमानिर्मिती करण्यात समाजमाध्यमाचा मोठा हात होता. भारतापुढील सर्व प्रश्नांना एकच रामबाण उपाय म्हणजे नरेंद्र मोदी असे चित्र निर्माण करण्यात आले. आणि तरुणाईला ते भावले. कारण प्रतिस्पर्धी गटात मनमोहनसिंग यांच्यासारखा सभ्य, सुसंस्कृत आणि मुळात राजकारणी नसलेला पंतप्रधान होता आणि सोबत स्वत:ला राजकारणात सिध्द करण्यासाठी धडपडणारा राहुल गांधी यांच्यासारखा नेता होता. त्यामुळे भाजपा पुरस्कृत समाजमाध्यमांनी मुखदुर्बळ पंतप्रधान, ‘पप्पू’ राहुल गांधी आणि रिमोट कंट्रोल हाती असलेल्या सोनिया गांधी यांना लक्ष्य केले. आम आदमी पार्टी आणि अण्णा हजारे, रामदेव बाबा यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन पेटले आणि तरुणाई काँग्रेसविरोधात गेली. ‘मोदी लाट’ तयार करण्यात समाजमाध्यमे अग्रभागी राहिली.
आता २०१९ मध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहेत. समाजमाध्यमांचा वापर काँग्रेस, साम्यवादी असे सगळेच पक्ष करु लागले आहेत. राहुल गांधी, कन्हैयाकुमार, हार्दिक पटेल, चंद्रशेखर रावण, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते प्रश्न विचारु लागले आहेत. तरुणाईलादेखील प्रश्न विचारण्याचे आवाहन करु लागले आहेत. ‘तुम्ही सांगता म्हणून आम्ही विश्वास ठेवणार नाही, आम्हाला पटेल, आमचा विश्वास बसेल अशी ठोस, सबळ उत्तरे द्या’, अशी मागणी ही मंडळी करु लागली असल्याने संघर्षाला धार चढली आहे. याठिकाणी भक्त आणि गुलाम असे संप्रदाय निर्माण झाले. २०१४ मध्ये केवळ भक्त होते. भाजपा आणि मोदी जे सांगायचे त्यावर तरुणाई विश्वास ठेवत होती. पण २०१९ मध्ये तरुणाई याच समाजमाध्यमांचा वापर करुन मोदी व भाजपाला प्रश्न विचारत आहेत. त्यांच्याच विधानांचा हवाला देत आता ५ वर्षे सत्ता होती, मग तुम्ही काय केले, परिस्थितीत बदल का झाला नाही, असे प्रश्न आता जनसामान्य विचारु लागले आहेत. पाच वर्षांपूर्वी रामबाण उपाय असलेला नेता पंतप्रधान झाला, तरी प्रश्न कायम आहेत. गुंता आणखी वाढला आहे, हे तरुणाईला जाणवू लागले आहे. त्या तरुणाईला आता भाजपाची मंडळी ‘गुलाम’ म्हणून हिणवू लागली आहे.
आधार कार्डविषयी मोदी यांचे पूर्वीचे विधान आणि याच आधारचा उपयोग करुन भ्रष्टाचार संपविल्याचा आताचा दावा समाजमाध्यमांद्वारे समोर आणून प्रश्न विचारला जात आहे. कोणते खरे, तेव्हाचे की आताचे.
कोणत्याही सत्तेला प्रश्न विचारणारे आवडत नाही. जनता सुज्ञ, जाणकार झालेली आवडत नाही. बुध्दिवादी मंडळी तर नजरेसमोर नको असते. कारण ते आव्हान देतील, सत्तेला धडका मारतील, हक्काचा वाटा मागतील. हे टाळायचे असल्याने मग देशभक्तीचा उपाय शोधला जातो. तुम्ही प्रश्न विचारणारे देशद्रोही, आणि आम्ही देशप्रेमी. झाला, विषय संपला, अशी मांडणी सध्या केली जात आहे.
चीन, पाकिस्तानच्या विद्यमान प्रश्नांना नेहरु जबाबदार आणि त्याच नेहरु यांच्या कार्यकाळात स्थापन झालेल्या इस्त्रोने यशस्वी केलेल्या ‘मिशन शक्ती’चे श्रेय मात्र आमचे...असा हा दुटप्पीपणा आहे. या दुटप्पीपणाबद्दल जाब विचारला तर तुम्ही ‘गुलाम’ आहात. वर्षानुवर्षांची मानसिकता कायम आहे, असे सुनावले जाते. तुमच्या देशभक्तीविषयी, ज्ञानाविषयी, प्रामाणिकपणाविषयी शंका उपस्थित केली जाते.
प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या वाढतेय, त्यामागील त्यांची तळमळ, कळकळ लक्षात न घेता, त्यांचे शंकासमाधान न करता एकतर दुर्लक्ष करणे, गुलाम ठरविणे निखळ लोकशाही समाजव्यवस्थेला हानीकारक आहे, हे मात्र निश्चित.

Web Title: The society and its devotees and slaves ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव