डायऱ्यांच्या प्रेमातील जिल्हाधिकारी...
By राजा माने | Published: April 6, 2018 12:23 AM2018-04-06T00:23:21+5:302018-04-06T00:23:21+5:30
अनेक आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे ‘डायºया प्रेम’ अनेकांच्या हेव्याचा विषय...
प्रशासनात अधिका-यांची कार्यपद्धती हा विषय जसा त्या यंत्रणेत गुंतलेल्या प्रत्येक घटकाशी निगडित असतो तसाच तो जनतेच्याही औत्सुक्याचा विषय असतो. त्यातूनच पुढा-यांशी जमणारा किंवा न जमणारा अधिकारी, आपल्या टीममधील सहका-यांना संरक्षण देणारा अधिकारी, लोकाभिमुख अधिकारी तसेच कुठलीही आकडेवारी तोंडपाठ असलेला अधिकारी, अशी अधिका-यांची वर्गवारी तुम्ही-आम्ही नेहमीच करीत असतो. अशाच वेगळ्या वर्गवारीत मोडणारे अधिकारी म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
हातात डाय-या, सोबत असलेल्या सुटकेसमध्ये डायºया आणि रंगीबेरंगी विविध डाय-यांमध्ये लिहिण्यासाठी सोबत टोकदार पेन्सिल! या प्रमुख लवाजम्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा कारभार गतीने चाललेला असतो. दिवसाची सुरुवात झाल्यापासून समोर येणारा विषय असो वा व्यक्ती असो, ते त्या अनुषंगाने डायरी काढतात आणि पुढील सोपस्कार सुरू होतात. स्वत:च्या सुवाच्च हस्ताक्षरात काळ्या पेन्सिलने केलेल्या नोंदी आणि नव्या नोंदी यांची लीलया रेलचेल करीत त्यांचे काम सुरू असते. कुठलाही माणूस हा सर्व प्रकार पाहून सुरुवातीला अचंबित होणे स्वाभाविक आहे. कारण, आज ‘पेनलेस आणि पेपरलेस’ बरोबरच डिजिटल कारभाराचे वारे जगभर वाहत असताना डायºयांच्या विश्वात का बरे रमावे? असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. पण जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे काम पाहिल्यानंतर ते डिजिटल युगाचे फक्त समर्थकच नाहीत तर कृतिशील भोक्तेही असल्याची प्रचिती येते. प्रत्येक बाबीचे विश्लेषणात्मक संदर्भ आणि काळ यांच्या डायरीतील नोंदीमुळे त्यांचे काम गतिमान होते व आॅनलाईन प्रशासन व्यवस्थेला पूरक असे सकस खाद्यच या डायºया पुरवितात.
या कार्यपद्धतीचा सोलापूर जिल्ह्याला फायदाच झाल्याचे दिसून येते. ग्रामपंचायत निवडणूकसंदर्भातील वाद असोत अथवा भूसंपादनाची प्रकरणे, त्याची तड गतीने लागल्याचा अनुभव जिल्हा घेतो आहे.
जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या पतपुरवठ्याचा नऊ हजार कोटींहून अधिक रकमेचा वार्षिक आराखडा त्यांच्याच कल्पकतेतून साकार झाला. शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांसाठी तब्बल ७० टक्के तरतूद असलेला तो आराखडा आहे. मुद्रा योजनेत जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला. ३६२ कोटींचे उद्दिष्ट असताना जिल्ह्याने ८६६ कोटी रुपयांच्या कर्जाचा पल्ला गाठला, अशी अनेक उदाहरणे देता येतील. आषाढीवारीचे आणि ६५ एकर क्षेत्रातील वारकरी तळाचे नियोजन असो, जलयुक्त शिवाराची कामे तांत्रिक निकषावरच व्हावीत, यासाठी कसोशीने चाललेले प्रयत्न असोत वा सोसायट्यांच्या शर्तभंग प्रकरणांचा निपटारा असो त्यात लोकाभिमुख कामांची झलकच सर्वांना अनुभवायला येते. साखर उद्योग, गारमेंट उद्योग आणि कृषिक्षेत्रात फळबाग उत्पादनात क्रांतिकारी दिशा घेऊ पाहणाºया सोलापूर जिल्ह्याला डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कार्यक्षम कारभाराबरोबरच त्यांच्या डायºया प्रेमाचा हेवा वाटल्यास आश्चर्य नको!