विदर्भावर बोला, विदर्भाला गृहित धरू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:06 AM2018-07-16T00:06:47+5:302018-07-16T00:07:21+5:30

विदर्भात आले आहात मग विदर्भावर कधी बोलणार?, नाणार, नाणारच करणार का? या भागाचे काही प्रश्न असतील तर सोमवारपासून त्यावर बोला.

Speak on nanar, do not assume the Vidarbha | विदर्भावर बोला, विदर्भाला गृहित धरू नका

विदर्भावर बोला, विदर्भाला गृहित धरू नका

googlenewsNext

विदर्भात आले आहात मग विदर्भावर कधी बोलणार?, नाणार, नाणारच करणार का? या भागाचे काही प्रश्न असतील तर सोमवारपासून त्यावर बोला. विदर्भाला पाठ दाखवू नका. विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात होत असताना नाणारप्रश्नी कामकाज तीन दिवस ठप्प होते. आता पाच दिवस बाकी असताना तरी विदर्भातील प्रश्नांवर बोला! विदर्भाला गृहित धरणे सोडा. गृहित धरणारे पार साफ झाले हा इतिहास जुना नाही. वैदर्भीय जनता भोळी आहे पण मूर्ख नाही. यह पब्लिक है यह सब जानती है, हे लक्षात ठेवा. विदर्भात येऊन किती लोक विदर्भाच्या प्रश्नांवर बोलतात हे ती बरोबर पाहते. लगेच प्रतिक्रिया देत नाही. निवडणूक आली की कुणाला मतांचं व्हिटॅमिन द्यायचं अन् कुणाला जमालगोटा द्यायचा याचा हिशेब बरोबर करते. ही गृहित धरल्याची फळं काँग्रेस भोगतेय पण सुधरायला तयार नाही. एकेकाळी काँग्रेसचा हा गड होता. इंदिराजींना विदर्भाने ताकद दिली. आज इथले काँग्रेसचे नेते त्यांची ताकद एकमेकांना लंबे करण्यासाठी वापरत आहेत. काँग्रेसला डायबिटीज झालाय अन् नेते रसगुल्ले खात आहेत. विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांचा दबाव गट पूर्वी होता. मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना धडकी भरायची. आता प्रत्येक जण आपापले दुकान चालवतो.
एक काळ असा होता की शिवसेनेचा पश्चिम विदर्भात बोलबाला होता. आता तो राहिला नाही. नाही म्हणायला मोदी कृपेने निवडून आलेले चार खासदार अन् स्वबळावर लढून जिंकलेले चार आमदार आहेत. मुंबई-कोकणाशिवाय शिवसेनेचे प्रेम पुढे सरकत नाहीे. त्यामुळे नागपुरात अधिवेशन असतानाही शिवसेनेच्या आमदारांना नाणारचा विषय महत्त्वाचा वाटतो. विदर्भात आपण चारवर का आलो याचा धडा घ्यावासा वाटत नाही. शिवसेनेपेक्षाही वाईट परिस्थिती राष्ट्रवादीची आहे. मनोहर नाईक हे अख्ख्या विदर्भात पक्षाचे एकच आमदार आहेत. सभागृहात येण्याची त्यांना गरज वाटत नाही. मंत्री असतानाच नाही यायचे तर आता काय येणार ?
नाणार हा एकच प्रश्न उरल्यासारखे वातावरण तयार केले जात आहे. विदर्भात कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. बोंडअळीने कापसाचे पार नुकसान केले. पावसाचा लहरीपणा सुरूच आहे.पीककर्ज मिळत नसल्याच्या अनेक शेतकºयांच्या तक्रारी आहेत. या सगळ्या मुद्यांवर सर्वपक्षीय आमदार कधी बोलतील याची प्रतीक्षा आहे. मात्र, आमदार टीडीआर, एफएसआय, एसआरएवर प्रश अन् लक्षेवधी देत सुटले आहेत. त्यात मुंबईचेच नाही तर विदर्भ, मराठवाड्यातील आमदारदेखील आहेत. अरे बाबांनो! बिल्डरांशी दोस्ती करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले आहे का? मुख्यमंत्री अन् काही पॉवरफुल मंत्री विदर्भाचे आहेत म्हणून इथले सगळे प्रश्न सुटले असे थोडीच याची दरक्षणी जाणीव भाजपाला असली पाहिजे. विरोधकांच्या गोंधळाआड सरकारचे अपयश लपवण्याची खेळी कुणी खेळता कामा नये.
- यदु जोशी

Web Title: Speak on nanar, do not assume the Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.