विशेष लेख : कसे घडले महात्मा गांधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 11:45 AM2018-10-01T11:45:32+5:302018-10-01T12:03:59+5:30

महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून ‘व्यवहारवादी राजकारणी’ असलेल्या गांधीजींची जडणघडण कशी झाली, त्यांची अत्यंत बळकट नैतिक शक्ती व सामाजिक कळवळा, सत्याग्रहाचे तत्त्व आणि एकूणच राजकीय तत्त्वज्ञान याचा आलेख आम्ही येथे घेत आहोत.

Special article on the life of Mahatma Gandhi | विशेष लेख : कसे घडले महात्मा गांधी?

विशेष लेख : कसे घडले महात्मा गांधी?

googlenewsNext

- राजू  नायक 

महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून ‘व्यवहारवादी राजकारणी’ असलेल्या गांधीजींची जडणघडण कशी झाली, त्यांची अत्यंत बळकट नैतिक शक्ती व सामाजिक कळवळा, सत्याग्रहाचे तत्त्व आणि एकूणच राजकीय तत्त्वज्ञान याचा आलेख आम्ही येथे घेत आहोत.

आपण जेव्हा ‘गांधी कसे घडले’ याची चर्चा करायला बसतो, तेव्हा दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या जीवनाकडे दुर्लक्ष करूच शकत नाही. वास्तविक दक्षिण आफ्रिकेतच ‘गांधी’ घडले, म्हणणे औचित्यपूर्ण ठरेल. दक्षिण आफ्रिकेतील 20 वर्षाच्या आपल्या वास्तव्यात जे काही लढे दिले, चिंतन-मनन केले, त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तित्वावर झाला व ते भारतात परतले ते या आपल्या अनुभवांची शिदोरी घेऊन. गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील अनुभव हे विविधांगी होते, तसेच ते तीव्र आणि प्रखर होते. दर्बन व जोहान्सबर्गमधील दिवस, फिनिक्स व टॉलस्टॉय आश्रमातील सहजीवन, न्यायालये व तुरुंग, रस्ते व रेल्वे या सर्वाचा परिणाम त्यांचे जीवन समृद्ध व्हायला झालाच, शिवाय मानवता व त्यातल्या त्यात भारतीय माणूस दुभागतो कसा (कधी ऐक्य निर्माण करतो) याचे त्यांना आकलन होऊ शकले. एक लेखक म्हणून, संपादक, नेता, समाज निर्माणाचा शिल्पकार, समाजसुधारक, नैतिक अधिष्ठाता, राजकीय संघटक व राजकीय तत्त्वज्ञानी असे विविधांगी पैलू पाडलेला हा माणूस १९१५ मध्ये भारतीय भूमीत उतरला तो नव्या अवतारात समाजजीवनात क्रांती घडवितानाच खूप मोठा इतिहास निर्माण करण्याच्या इराद्याने!

सर्व धर्म समभावाचे जे तत्त्व गांधीजींनी भारतीय जीवनमानाला आकार देताना वापरले, ते त्यांना कसे स्फुरले, ते समजून घेण्यासाठी या नेत्याचे दक्षिण आफ्रिकेतील व्यक्तिगत जीवन नजरेखालून घातले पाहिजे. विद्यार्थीदशेपासून गांधीजींना इतर धर्माबद्दल कुतूहल होतेच; परंतु त्याविषयीची त्यांची आस्था वाढण्यास आपल्या मायभूमीपेक्षा त्यांचे लंडन, दर्बन व जोहान्सबर्गमधील वास्तव्य अधिक कारणीभूत झाले. राजकोट व पोरबंदरपेक्षा ही शहरे समृद्ध होती व तेथील सहजीवनाला अधिक कंगोरे होते. गांधीजींना आता आपले कुतूहल शमविण्यास या शहरांमधील विविधांगी जीवनपद्धती उपयोगास आली.

या शहरांमध्ये जोहान्सबर्गने त्यांच्या जीवनात खरे बदल घडविले. १९०० सालात ते शहरही आपले नवे स्वरूप धारण करू लागले होते, त्याचा आकार, जीवनपद्धत बदलू लागली होती; कारण केवळ खाण व्यवसायाला आलेल्या बरकतीमुळे नव्हे तर लोक आपल्यावरची सामाजिक दडपणे आणि रूढींचा त्याग करण्यासाठी महानगरांच्या आश्रयाला येणे सुरू झाले होते. एका बाजूला सत्ताधीश एक नवी, स्थिर वर्णद्वेषी व्यवस्था रूढ करू पाहात होते तर दुसऱ्या बाजूला समाज एक नवी जीवनसंस्कृती स्वीकारू लागले होते त्यात पेहराव, जेवण, आरोग्यासह परस्पर सांस्कृतिक-धार्मिक सुसंवादाची अपेक्षा बाळगली जात होती. याच बदलत्या जीवनशैलीमध्ये गांधीजींना विविध जाती-धर्माचे व परंपरांचे लोक भेटले, जे त्यांचे केवळ मित्रच बनले नाहीत तर त्यांनी गांधीजींवर विचारांचे संस्कारही केले.
गांधीजी जर भारतातच राहिले असते तर ते ज्यू किंवा धर्माचा पगडा नसलेल्या ख्रिश्चनांच्या सहवासात येऊच शकले नसते. वेगळ्या प्रदेशात त्यांना भारतीयांमधले वैविध्य आणि वैगुण्य यांचेही पुरेपूर दर्शन झाले, जे भारतात साध्य नव्हते. त्यांनी आपल्या कुटुंबांच्या परंपरा पाळत काठियावाडमध्येच वास्तव्य करणे पसंत केले असते तर ते कदाचित तमिळी व उत्तर भारतीयांचे जीवन समजून घेऊच शकले नसते. त्यांनी मुंबईत वकिली केली असती तर मळेवाल्यांचे दु:ख व फेरीवाल्यांच्या वेदना समजल्याच नसत्या.

भारतातील जीवनावर परंपरा, जात, धर्म यांचा पगडा होता. मुंबईसारख्या महानगरांमध्येही लोकांचे वास्तव्य भाषा व जातींना धरूनच घडले होते; परंतु दक्षिण आफ्रिकेत गांधीजींच्या स्फूर्तीने लोक सर्वाना सामावून घेणा-या सामाजिक चळवळीचा भाग बनले. २० वर्षाच्या कारकिर्दीत टप्प्याटप्प्याने ही चळवळ चालली, सुरुवातीला नाटालमध्ये नंतर ट्रान्सवाल व नंतर तिचे रूपांतर प्रचंड लढय़ात १९१३मध्ये झाले. या काळातील सत्याग्रहांमध्ये तमीळ, गुजराती, हिंदी भाषिक पारशी, हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती, उच्च, मध्यम व कनिष्ठ जाती, मजूर, व्यापारी, पुजारी यांनी स्वेच्छेने, खांद्याला खांदा लावून सहभाग घेतलेला पाहायला मिळतो.

गांधीजीचा जन्म आणि वाढ हिंदू म्हणूनच झाली होती. शिवाय आपल्या संपूर्ण जीवनात आपला धर्म त्यांनी कधी लपविला नाही; परंतु त्यांच्याआधी कुणीही इतर धर्मियांशी, विशेषत: मुस्लिमांशी निकटचे संबंध प्रस्थापित केले नव्हते. आपल्या निकटच्या मित्रांकडून त्यांनी यहुदी धर्म समजून घेतला. ख्रिस्ती धर्मातील तत्त्वांचा त्यांचा अभ्यास सखोल होता व टॉलस्टॉयच्या पुस्तकांमधून त्यातील शिकवण त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता आली. मुस्लीम धर्माबाबतचा त्यांचा संबंध बराचसा वैयक्तिक आणि बहुतांशी व्यवहारी व राजकीय होता; परंतु त्यांचे अनेक निकटचे मित्र मुस्लीम असले तरी भारतात व दक्षिण आफ्रिकेत या दोन्ही समाजांची युती झाल्याविना महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले जाऊ शकणार नाही, असे त्यांनी मानले होते.

परंतु, सर्व धर्माबद्दलची आस्था गांधीजींच्या तत्त्वांना समृद्ध बनवीत असली तरी सत्ताधारी वर्गाबद्दल जराही कटुता न बाळगण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना महानतेकडे घेऊन जाते. या त्यांच्या प्रवृत्तीची मुळे त्यांच्या लंडन वास्तव्यात विशेषत: तेथील शाकाहारी मित्रांबरोबरच्या सहवासातून पेरली गेली होती. मे १८९१मध्ये त्यांनी जेव्हा भारताला जाण्यासाठी इंग्लंडचा निरोप घेतला तेव्हा त्यांनी जरी यापुढे मी जीवनपद्धती व हृदयांची युती करण्यासाठी झटेन असे म्हटले तरी त्यांना दर्बन येथे गोऱ्या लोकांकडून हल्लाही सोसावा लागला होता; परंतु पुढे कित्येक वर्षानी जेव्हा ते मागे वळून पाहातात तेव्हा आपल्यावर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या गोऱ्यांबद्दलच्या तिरस्काराचा लवलेशही त्यांच्या मनात नसतो; तर जे कोणी त्यांच्या मागे उभे राहिले, त्यांचीच आठवण काढताना आढळतात. ट्रान्सवालमध्ये शोषणकर्त्याबद्दल ते कटू उद्गार काढीत नाहीत, की तेथील अन्यायकर्त्याबद्दल ते अनुद्गार काढत नाहीत. वेगळ्या वंशाचे आणि धर्माचे लोक ज्या काळी एकत्र नांदणे शक्य नव्हते, तेव्हा गांधी सहजीवनाची भाषा करीत असत. विन्स्टन चर्चिल यांचीही विचारसरणी त्या काळी बरीच पूर्वग्रहदूषित असता गांधीजींनी त्यांच्याशी असहमती दर्शविली एवढेच नव्हे तर जोहान्सबर्गमधील त्यांच्या घरात एक ख्रिस्ती व एक यहुदी जोडपे वास्तव्यास होते, हे विशेष. गांधीजींच्या घरात राहाणाऱ्या हेन्री पोलाक यांनी पुढे आत्मचरित्र लिहिले, त्यात गांधीजींच्या विशाल अंत:करणाबद्दल भरभरून लिहिले आहे आणि नोंदविले आहे की त्यांचा धर्म त्यांच्यासाठी मोठा असला तरी तो (धर्म) सहिष्णू, सर्वाचा आदर करणारा, परमार्थनिष्ठा बाळगणारा होता. तो कोणामध्येही फरक करीत नव्हता व सर्व धर्माबरोबर आध्यात्मिक बंधुत्वाचे नाते प्रस्थापित करीत असे. आपला वर्ग, धर्म व वंश यांच्या भिंती ओलांडून संपूर्ण जगाकडे मायेने आणि प्रेमाने पाहणारा हा माणूस आपल्या काळाच्या खूप पुढे होताच, शिवाय भारतातील आपल्या समवयस्क नेत्यांपेक्षा पुढारलेला होता.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाली असली तरी बराच काळ ही संघटना मध्यमवर्ग व शहरी प्रवृत्तीचीच बनून राहिली. डॉक्टर, वकील, संपादक व शिक्षक यांच्या बाहेर तिला स्थान नव्हते. तेच तिच्या बैठकांना उपस्थित राहात. शेतकरी, कामगारवर्ग त्यापासून कोसो दूर होता. मुस्लीम लोकही दूर चालले होते, तसेच कनिष्ठ वर्गातील विचारवंत व समाजसुधारकांनाही तेथे स्थान नव्हते. त्याशिवाय पुरुषांचेच तिच्यावर वर्चस्व होते.

गांधीजींच्या प्रत्यक्ष जीवनात व आचरणात त्यांनी या सर्व वर्गाना घेऊनच कार्य केले, ते केवळ दिखाऊ नव्हते तर त्या सर्वाना घेऊनच समाजरचनेची पुनर्बाधणी केली पाहिजे, तरच ती टिकेल असे ते मानीत. गांधीजींच्या सुरुवातीपासूनच्या सत्याग्रहांमध्ये महिला वर्ग तर प्रामुख्याने दिसला व महिलांना बरोबर घेतल्याशिवाय समाजपरिवर्तनाला अर्थ प्राप्त होणार नाही हे त्यांनी ताडले होते, त्या काळी जोहान्सबर्गमध्ये निवडणुकीतही महिलांना स्थान नव्हते. शिवाय भारतातही पुरुषांना महिला केवळ पत्नी, बहीण, मुली म्हणूनच माहीत होत्या, मैत्रीण म्हणून नाही! याबाबतीतही गांधीजींचे आफ्रिकेतील वास्तव्य त्यांच्या मानसिकतेत बदल करण्यास फायदेशीर ठरले.

गांधीजींनी सुरू केलेले हे परिवर्तनाचे वारे, ज्या काळात टीव्ही आणि इंटरनेट नव्हता तरीही भारतात सर्वदूर पसरले व भाषिक वृत्तपत्रे, दक्षिणेतील राज्ये जेथील भाषाही गांधीजींना अनभिज्ञ होती, तेथेही त्याचे कौतुक झाले. गांधीजींच्या चळवळीशी जवळीक साधणाऱ्या सभा ठिकठिकाणी झाल्या. दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींच्या चळवळींना मुस्लीम लीग व मद्रासच्या बिशपांनी पाठिंबा दिला. ज्या काळात भारतात महिलांना घराची चौकट किंवा डोक्यावरचा पदर दूर करणे कठीण होते त्या काळात गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली कस्तुरबा व अनेक महिला सत्याग्रह करून तुरुंगात जातात याचेच भारताला खूप कौतुक वाटले.

दक्षिण आफ्रिकेतच गांधीजींनी लेखक व संपादक म्हणून नैपुण्य प्राप्त केले. मुळात इंग्लंडमध्ये त्याची सुरुवात झाली व त्यांना तेथे मासिक चालविण्यास शाकाहारी समाजाने सहकार्य केले असले तरी नाताळमध्ये त्यांची लेखणी अधिक प्रभावीपणो चालली व त्यांनी वृत्तपत्रांना पत्रे लिहिण्याचा सपाटा चालविला. १९०३मध्ये त्यांचे नियतकालिक ‘इंडियन ओपिनियन’ सुरू झाले, त्याचा उद्देशच तेथील भारतीयांचे हितरक्षण करणे हा होता. गांधीजींनी त्यात अनेक विस्तृत लेख लिहिले, त्याचे व्यवस्थापन केले व त्यासाठी खर्चही केला. लेखक व संपादक म्हणून त्यांचे कार्य महान होते; परंतु वक्ता म्हणून मात्र ते फारसे प्रभावी नव्हते. गांधी संथपणे व एकाच लयीत बोलत असत. जोश असा त्यात नसे; परंतु लोक त्यांचे ऐकायला थांबत; कारण आवाजात जरी हुकूमत नसली तरी त्यात तळमळ होती. त्यांची काटकसर, मेहनत, त्यांची जिद्द व हिंमत यांचा पगडा लोकांवर असे व ते वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांना चेतना देत असत. त्यांनी अशा प्रकारे एक नीतिवान व करारी राजकीय समाजाची बांधणी केली. जे लोक गरिबीचा स्वीकार करण्यास कचरत नसत तसेच हसत हसत तुरुंगवासही पत्करत.

गांधीजींच्या ‘संसर्गापासून’ व्यापारीही सुटले नाहीत, व्यापारी खरे म्हणजे कातडीबचावू प्रवृत्तीचे असतात व सत्ताधाऱ्यांशी वितुष्ट घेण्याचे टाळतात. त्यातल्या त्यात दक्षिण आफ्रिकेतील भारतीय व्यापारी कोणाच्या अध्या-मध्यात नसत. आश्चर्यकारकरीत्या त्यांनाही सत्याग्रहात ओढले गेले. हे लोक आपल्या कुटुंबापासून दूर राहात असल्याने ते अधिकच असुरक्षित होते; परंतु व्यापारी व फेरीवाले, कामगार व व्यावसायिक यांनी आपला व्यवसाय पणाला लावून गांधीजींची साथ केली. त्यातील अनेक जण गांधीजींचे रक्षण करण्यासाठी पुन्हा पुन्हा तुरुंगवास पत्करत व कारवाईची भीती बाळगत नसत. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींवर अनेक हल्लेही झाले; परंतु या माणसाची एकाग्रता आणि निडरपणा अनेकांना भावल्यामुळे लोक गांधीजींचे रक्षण करण्यासाठी धावत येत व अत्याचार सहन करीत. हा हडकुळा; परंतु विचारांवर, ध्येयावर ठाम असलेला माणूस जे काय सांगेल ते आपण ऐकले पाहिजे, अशी एक प्रवृत्तीच या चळवळीने निर्माण केली.

गांधीजींची वकिली मुंबईत चालली नाही, मात्र आफ्रिकेत ती कमालीची यशस्वी झाली; तरीही गांधीजींनी व्यवसाय म्हणून कमीच व सामाजिक प्रश्न हाताळणीसाठी तिचा वापर सुरू केला. ते अत्यंत साधे राहाण्याकडे वळले. ते खूप काम करीत, अक्षरश: कामाला जुंपून घेत, त्यांनी सुखांचा व ऐेषआरामाचा त्याग केला, मद्य व मांसालाही स्पर्श करणे टाळले आणि हो, त्यांनी साखर व मसाल्यांचाही त्याग केला. शिवाय कोणताही खेळ नाही आणि मनोरंजनही त्यांना वर्ज्य होते!

गांधीजींच्या काही विसंगतीही होत्या. ते संपूर्ण शाकाहारी असणे समजू शकते; परंतु ते नैसर्गिक उपचारपद्धती अवलंबीत. ब्रह्मचर्याचे पालन तर खूपच टीकेचा विषय ठरले; परंतु प्रखररीत्या या तत्त्वांचे आचरण त्यांनी आपल्या जीवनशैलीत केले आणि प्रचंड नैतिक शक्ती निर्माण केली, जिच्यातूनच पुढे ‘सत्याग्रहा’चा जन्म झाला असे मानणे चूक ठरणार नाही. गांधीजींनी सत्याग्रहाचा केवळ सिद्धांत मांडला नाही तर स्वत: त्याचे आचरण केले व कार्यकर्त्यानाही त्याचे धडे दिले. शेकडो लोक हिंसेचा अवलंब न करता ब्रिटिशांचा अत्याचार सोसत आहेत, हे जगाने पाहिले व या तत्त्वाचा खूप मोठा आदर जगभर झाला, त्याच काळात जगभर हिंसक क्रांत्या होत होत्या; परंतु कालांतराने जगाने वाखाणणी केवळ गांधी तत्त्वांचीच केलेली आपण पाहिली. गांधीजींच्या राजकीय तंत्राचा भाग म्हणून सत्याग्रहाकडे आज संपूर्ण जग पाहाते व अजूनही विस्मयचकित होते. त्यातील नैतिक अधिष्ठान अनेकांना अजूनही अचंबित करते; परंतु हे तंत्र त्यांनी आफ्रिकेत विकसित केले आणि भारतात या तंत्राने शेकडो निरक्षर, मजूर, शेतकरी, गरिबांना भारून टाकले आणि जराही विचलित न होता ते चालत राहिले. त्याच तत्त्वाने पुढे भारताला मुक्ती मिळवून दिली. लोकशाही बळकट केली. भारताला जगभर प्रतिष्ठा लाभली. त्यादृष्टीने ६५ वर्षानंतर अजूनही गांधीजी कालसुसंगत राहिले आहेत! गांधीजी अमर आहेत आणि त्यांचे विचारही!

(रामचंद्र गुहा यांच्या ‘गांधी बीफोर इंडिया’ या पुस्तकाचा संदर्भ या लेखासाठी घेतला आहे.)

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )
 

Web Title: Special article on the life of Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.