तुमच्या चपला-बुटांची चुकीची ‘साइझ’ लवकरच बदलणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 05:34 AM2024-04-25T05:34:47+5:302024-04-25T05:36:48+5:30
भारतातल्या एक लाखापेक्षा जास्त स्त्री-पुरुषांच्या पायांचं सर्वेक्षण नुकतंच पूर्ण झालं, त्याआधारे आता आपल्या चपला-बुटांच्या आकाराची प्रमाणं बदलू घातली आहेत!
अनिरुद्ध अथणी, मॅरेथॉन प्रशिक्षक, नाशिक
केवळ योग्य मापाचे बूट (स्पोर्ट्स शूज) नाहीत म्हणून बहुसंख्य भारतीय खेळाडू मागे पडतात, त्यांचं करिअर अकालीच संपतं ही वस्तुस्थिती आहे. योग्य आकार आणि मापाचे बूट मिळाले तर अनेक भारतीय खेळाडू अनेक खेळांत आणखी देदीप्यमान कारकीर्द घडवू शकतील, ती लांबवू शकतील. मॅरेथॉन कोच म्हणून माझ्या गेल्या दहा वर्षांच्या अनुभवावरून मी हे खात्रीनं सांगू शकतो. तुम्ही म्हणालं, प्रत्येक शहरात, अगदी खेडेगावातही पावलोपावली चप्पल-बुटांची दुकानं असताना योग्य मापाची पादत्राणं मिळत नाहीत, हे कसं शक्य आहे?
कटु आहे; पण हे सत्य आहे. कारण आपल्याकडे जी पादत्राणं मिळतात त्यांचं ‘स्टॅण्डर्ड’ भारतीय मानकांप्रमाणे नाही. कुठल्याही दुकानात गेलं तरी यूएस/यूके/युरोप या मानकांनुसारच पादत्राणं मिळतात आणि तीच घ्यावीही लागतात. स्वातंत्र्योत्तर काळापासून ब्रिटिशांनी त्यांच्याकडील लोकांच्या पायाच्या आकारमानानुसार, तिथे प्रचलित आकार-प्रकारांनुसार तीच मापं भारतात आणली. आजतागायत त्याच प्रमाणानुसार भारतात पादत्राणं विकली जातात. यूएस आणि युरोपातील कंपन्यांनी आपापले ब्रॅण्ड भारतात आणले; तेही त्यांच्या मानकांप्रमाणे. भारतीय माणसांच्या पायाच्या मापानुसार पादत्राणं न मिळणं ही एक मोठीच उणीव आहे.
चेन्नईच्या कौन्सिल फॉर सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च - सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ या काळात भारताच्या पाच भौगोलिक क्षेत्राच्या ७९ ठिकाणांवरील एक लाखापेक्षा जास्त स्त्री-पुरुषांच्या पायांचं सर्वेक्षण केलं. त्यात आढळून आलं की ब्रिटिश, युरोपीय किंवा अमेरिकन लोकांपेक्षा भारतीय लोकांचे पाय रुंदीला जास्त आहेत. परंतु त्यांच्या मापाची पादत्राणंच उपलब्ध नसल्यानं बहुसंख्य भारतीय एकतर घट्ट किंवा खूप सैल पादत्राणं वापरतात. त्यामुळे पायांना, बोटांना दुखापत होणं, पादत्राणं चावणं, पायांना फोड येणं आणि एकूणच पायाच्या आरोग्य समस्या निर्माण होतात.
या सर्वेक्षणानुसार भारतीय पायाच्या मापानुसार एकूण आठ प्रमाणं ठरवण्यात आली आहेत. जवळपास ८५ टक्के भारतीय लोकांच्या पायाला ही मापं बरोबर बसतील. या प्रणालीला ‘भा’ म्हणजे भारत असं नाव देण्यात आलं आहे. साधारण २०२५पासून भारतीय मानकांची पादत्राणं भारतात तयार होऊ लागतील, अशी शक्यता आहे. गेल्या सुमारे आठ वर्षांपासून खेळाडूंच्या पायांचं प्रत्यक्ष मोजमाप घेऊन त्यांना त्याप्रमाणे बूट सुचवण्याचा उपक्रम मी सुरू केला. पण बाजारात त्या आकाराचे, मुख्यत: रुंदीचे बूट उपलब्ध नसणं हीच मुख्य अडचण होती. बहुतांश ब्रॅण्डेड कंपन्या ‘स्टॅण्डर्ड’ मानकांशिवाय जास्त रुंदीचे म्हणजेच वाइड आणि एक्स्ट्राॅ वाइड बूटही तयार करतात; पण ‘ते भारतात चालणार नाहीत’, या भीतीनं विक्रीसाठी उपलब्धच होत नाहीत. मग एकच पर्याय उरतो; थेट परदेशातूनच हे बूट मागवणं. या बुटांची किंमत किमान दहा ते वीस हजार रुपयांच्या घरात!
प्रोफेशनल ॲथलिट असेल तर हे बूट जेमतेम तीनेक महिनेच टिकतात. ज्यांना ‘परवडू’ शकतं असे खेळाडूही इतक्या वारंवार बूट बदलत नाहीत. त्यामुळे बहुसंख्य जण या बुटांचं लाइफ संपल्यानंतरही तेच बूट दीर्घकाळ वापरतात. त्यामुळेही खेळाडूंचा परफॉर्मन्स खालावतो आणि दुखापतीची शक्यताही वाढते. माझ्या माहितीतले काही खेळाडू आहेत, ज्यांच्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याची क्षमता आहे; पण केवळ योग्य मापाच्या बुटांअभावी ते मागे पडतात. एवढा खर्च परवडत नसल्यानं आणि दुखापतींमुळे काहींनी आपलं स्पोर्ट्स करिअर सोडून दिल्याचंही मी पाहिलं आहे. कोणताही खेळ असो, त्यात धावण्याचा संबंध असतोच असतो आणि त्यामुळेच योग्य मापाच्या बुटांचीही आवश्यकता असते.
किमान ७० टक्के भारतीय खेळाडूंना योग्य बुटांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक क्रमांकाच्या बुटांसाठी ‘स्टॅण्डर्ड’, वाइड आणि एक्स्ट्रॉ वाइड असे किमान तीन पर्याय असणं आवश्यक आहे. योग्य बुटांसाठी खेळाडूंची ही कथा, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल, हे विचारायलाच नको. नव्या सर्वेक्षणानंतर का होईना, योग्य आकाराचे बूट लवकरच उपलब्ध होतील ही अपेक्षा.
athani@live.com