थेंबे थेंबे तळे साचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:33 AM2018-06-11T05:33:28+5:302018-06-11T05:33:28+5:30
दहावीच्या निकालाने यंदाही गुणांचा पाऊस पाडत अनेक विक्रमांना गवसणी घातली असली, तरी मराठी शाळा आणि महापालिकांच्या शाळांच्या गुणवत्तेत झालेल्या सुधारणेमुळे हा निकाल त्यांच्यासाठी सुखद आहे़ मराठी माध्यमिक शाळांनी गेल्या वर्षीपेक्षा आपला निकाल उंचावला आहे.
दहावीच्या निकालाने यंदाही गुणांचा पाऊस पाडत अनेक विक्रमांना गवसणी घातली असली, तरी मराठी शाळा आणि महापालिकांच्या शाळांच्या गुणवत्तेत झालेल्या सुधारणेमुळे हा निकाल त्यांच्यासाठी सुखद आहे़ मराठी माध्यमिक शाळांनी गेल्या वर्षीपेक्षा आपला निकाल उंचावला आहे. इंग्रजीच्या आक्रमणात मराठी शाळांना लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर गुणवत्तेतील ही वाढ अधिक उजवी ठरते. मराठी शाळेत जाणारा विद्यार्थी दुय्यम दर्जाचा, गरीब घरातील असल्याचा समज गेल्या काही वर्षांत तयार झाला. मराठी माध्यमात शिकल्यास भवितव्य नसल्याचा ठाम समज तयार झाला आहे़ मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असल्याने स्वाभाविकच येथील शैक्षणिक संस्कृतीवरही जागतिक पगडा आहे. त्याचाही परिणाम येथील इंग्रजी शिक्षणाचे प्रस्थ वाढण्यात झाला. त्यातून मराठी भाषिक शाळा अधिक संकोचत गेल्या. येथील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत गेली़ काही शाळा तर बंद पडल्या. सरकारी धोरणही मराठी शाळांना पोषक ठरण्यापेक्षा मारक ठरत गेले. अनेक शाळांनी सेमी इंग्लिशकडे वाटचाल सुरू केली. अशा साऱ्या प्रतिकूल परिस्थितीत मराठी माध्यमाच्या शाळांनी दहावीच्या निकालात केलेली प्रगती त्यामुळेच कौतुकास्पद ठरते. अशीच भरीव कामगिरी केली आहे पालिकेच्या शाळांनी. प्रांतिक भाषांचे वर्ग, प्रशस्त इमारती, प्रशिक्षित शिक्षकवर्ग असूनही पालिकेच्या शाळा गेल्या दोन दशकांत निकालाचा टक्का राखण्यात कमी पडत होत्या. विशेष म्हणजे पालिकेच्या शाळेत आवर्जून शिकवले जाणारे संस्कृतही बंद झाले. शाळांचे हॉल विवाह समारंभासह अन्य कार्यक्रमासाठी अधिक वापरले जाऊ लागले़ ही दयनीय अवस्था सुधारण्यासाठी टॅबवाटप, व्हर्च्युअल क्लासरूमसारखे अनेक प्रयत्न सुरू झाले. त्याचेच हे फलित मानायला हवे. रात्रशाळांच्या धोरणात सरकारी पातळीवर धरसोड वृत्ती असली, तरी यंदाच्या निकालात या शाळांची कामगिरीही चमकदार आहे़ काम करून शिक्षण घेणाºयांची ही शाळा़ येथील विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी पुरेसा वेळही नसतो़ त्यातून त्यांनी मिळवलेले यश गौरवास्पद आहे़ बहुभाषिकांचे शहर म्हणून ओळख मिळवणाºया मुंबईत मराठी टिकवणे दिवसेंदिवस अवघड होते आहे़ ती टिकवण्यासाठी अनेक हातांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना हा निकाल बळ देणारा आहे. यशाची ही झुळूक अशीच सुखावत राहिली, त्यात सातत्य राहिले; तर शाळांचाच नव्हे तर मराठीसाठी झटणाºया प्रत्येकाचाच आत्मविश्वास दुणावेल.