संजय पाठक
आपल्या शहराच्या/गावाच्या घसरत चाललेल्या गुणवत्तेबाबत शुंभ लोकप्रतिनिधी आणि शासन-प्रशासनाला जबाबदार धरून त्यांच्या नावे नुस्ता शंख करत बसण्याऐवजी नागरिकांचे गट स्वत:च पुढे आले, सखोल संशोधन-मुद्द्यापुराव्यांच्या आधाराने त्यांनी यंत्रणेला ‘काम करायला’ भाग पाडले, तर काय घडू शकते याचा वस्तुपाठ नाशिककरांनी अवघ्या देशापुढे ठेवला आहे. या शहरातली जीवनदायिनी गोदावरी नदी नाशिकच्याच नव्हे, तर सहा राज्यांच्या समृद्धीची गुरुकिल्ली आहे; परंतु सगळ्याच नद्यांचे नशीब गोदावरीच्याही माथी! ते म्हणजे नदीच्या अवस्थेबाबत अतोनात बेफिकिरी आणि दुर्लक्ष! नदीशी संबंधित बहुतांशी कामे तज्ज्ञांचा सल्ला न घेता आणि नदीच्या जैवविविधतेवर काय बरावाईट परिणाम होईल, याचा विचार न करता केली जाणे हे सर्वत्रच घडते. त्यात नाशकातून वाहणाऱ्या गोदावरीच्या नशिबी दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याची गर्दी! कुंभमेळ्यात स्नानाला उतरणारे भाविक बुडुन मरू नयेत म्हणून नदीपात्रातील प्राचीन जिवंत कुंडे सिमेंट- काँक्रीट भरून बुजवण्यात आली. त्यामुळे नदीच्या अंत:तळाचा श्वासच घुसमटला. रामकुंड परिसरात महापालिकेसारख्या शासकीय यंत्रणेनेच तळ काँक्रिटीकरण करून नैसर्गिक झरे, कुंडे सारेच बंदिस्त केले. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून अशा प्रकारचे काँक्रिटीकरण सुरू झाले आणि कुंभमेळ्यातल्या भाविकांच्या सुरक्षेचे निमित्त करून नदीकाठावर काँक्रीटचे घाटदेखील बांधण्यात आले. पाहता-पाहता जिवंत नदी जणू मरण पावली आणि भाविकांसाठी परमपवित्र असलेल्या रामकुंडाच्या पाण्याला दुर्गंधी सुटली. शेवटी नळाचे पाणी आणून वरून रामकुंड भरण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली.
अखेरीस शहरातल्या पर्यावरणप्रेमींनी गोदावरीसाठी पुढाकार घेतला. २०१० पासून नाशिकमध्ये वेगवेगळे पर्यावरणप्रेमी गट याविरोधात लढा देऊ लागले. गोदाप्रेमी संस्थेेचे देवांग जानी यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रदीर्घ लढ्यानंतर महानगरपालिकेला नागरिकांच्या विरोधाची दाद घ्यावी लागली . अखेर स्मार्ट सिटीच्या ‘प्रोजेक्ट गोदा’मध्ये नदी संवर्धनासाठी तळ काँक्रिटीकरण हटवण्याच्या कामाचा समावेश झाला. नदीतील तळ काँक्रिटीकरण हटवावे, असा एक अहवाल निरी या संस्थेने अगेादरच दिला होता; परंतु देवांग जानी यांनी सन १७०० मध्ये नदीपात्रात असलेली १७ कुंडे बंदिस्त झाल्याने गोदावरीचा नैसर्गिक स्रोत आटल्याचे सप्रमाण सिद्ध केले आणि काँक्रिटीकरण हटविण्याबरोबरच रामकुंड परिसरातील सुमारे एक ते सव्वाकिलो मीटर अंतरातील कुंडांच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा मांडला. तळ काँक्रिटीकरण मुक्त करताना या पुरातन कुंडांचे पुनरुज्जीवन केल्यास नदीपात्र सदैव प्रवाही राहील, हा त्यांचा उद्देश होता. नाशिकच्या वास्तुविशारद महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते यांनी प्रचंड मेहनतीने तयार केलेला अहवाल अत्यंत वस्तुनिष्ठ होता. नैसर्गिक स्रोत दबले गेल्याने नदीची मृतावस्थेकडे वाटचाल होत असल्याचे त्यांनी सिद्ध केले.
नागरिकांच्या या लढ्याला अखेर यश आले आणि नदीतळातील काँक्रिटीकरण हटविण्याचे काम सुरू झाले. रामगया, पेशवे कुंड आणि खंडाेबा कुंडातील काँक्रिटीकरण काढण्याचे काम पन्नास टक्के झाले आहे. अनामिक आणि दशाश्वमेध या दोन कुंडांमधून तर साडेतीन लाख किलो सिमेंट काँक्रीट काढण्यात आले आहे. तब्बल एकोणीस वर्षांनंतर खुल्या झालेल्या या कुंडांमधून सध्या अखंड जलस्रोत बाहेर येत असल्याने कोरडेठाक नदीपात्र पाहण्याचे दुर्दैव निदान यापुढे तरी नाशिककरांच्या नशिबी येणार नाही. नाशिकमधील गोदावरी पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या गटांनी आवश्यक तेथे प्रशासनाबरोबर सहकार्याची भूमिका घेऊन एक वेगळा ‘पॅटर्न’ तयार केला. न्यायालयासह सर्वांची मदत घेऊन यंत्रणेला कर्तव्य-पालनासाठी उद्युक्त केल्यास मरणपंथाला लागलेल्या नदीत नवा प्राण फुंकता येऊ शकतो, हे ‘गोदाप्रेमी’ या संस्थेने सिद्ध करून दाखवले, या कामाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. डिझाइन बिनाले या लंडनमधील पर्यावरण प्रदर्शनात नाशिकच्या या प्रकल्पाचा समावेश आहे. पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे मूलभूत बदल घडवून आणणाऱ्या संकल्पनांचा या प्रदर्शनात समावेश असतो. त्यात ही कहाणी सध्या झळकते आहे.
(लेखक लोकमत नाशिक आवृत्तीमध्ये वरिष्ठ मुख्य उपसंपादक आहेत)