- प्रा. डॉ. संदीप ताटेवार(अभियांत्रिकी प्राध्यापक)पावसाळा सुरू झाला की पूर, इमारती-दरडी कोसळणे, पूल वाहून जाणे, धरणे फुटणे, संरक्षक भिंती खचणे यासारख्या घटना दरवर्षी नियमित घडतात. या वर्षी पावसामुळे मुंबईत डोंगरी येथील शंभर वर्षे जुनी चार मजली केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू व आठ जण जखमी झाले, पुण्यात कोंढवा भागात पावसाळ्यात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला, मालाड येथे भिंत झोपड्यांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पाप बळी गेले, चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीमुळे २४ जणांना पाण्याच्या लोंढ्याने ओढून नेले. त्यापैकी १३ जणांचे मृतदेह हाती आले.या काही महाराष्ट्रातल्या पावसाळ्यातील प्रमुख दुर्घटना. जीवितहानी, वित्तहानी व मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या अशा घटना टाळण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी बांधकामांचे नियमित संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट) करणे आवश्यक असते. माणूस चाळीस वर्षांचा झाला की साधारणत: डॉक्टर नियमित वैद्यकीय तपासणी करण्यास सुचवितात व सुदृढ राहण्यासाठी त्या आपण करीत असतो. त्याचप्रमाणे इमारतीचे वय ३0 वर्षांवरील असेल तर दर तीन वर्षांनी संरचनात्मक लेखापरीक्षण करणे कायद्याने अनिवार्य आहे.संरचनात्मक लेखापरीक्षणात इमारतीचे विविध भाग जसे की, कॉलम, बिम, स्लॅब, भिंती, पाया इत्यादींची तपासणी तज्ज्ञांकडून करून इमारतीची गुणवत्ता, क्षमता व आयुष्यमान ठरविले जाते. बांधकामांतील भिंतीमध्ये निर्माण झालेल्या तडा, विविध भागांत निर्माण झालेला ओलावा, धरलेले पोपडे, काँक्रीटमधील सळ्यांना लागलेले गंज, विविध भागांत निर्माण झालेले बाक, विविध पाइपलाइनमधील गळती यावरून बांधकाम सुरक्षित आहे की नाही हे ठरवू शकतो. इमारतीप्रमाणे विविध स्थापत्य अभियांत्रिकी बांधकामे जसे की धरण, पूल, उंच पाण्याच्या टाक्या, संरक्षक भिंती इत्यादींचे वेळोवेळी संरचनात्मक लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. ज्या इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण करावयाचे आहे, तिथे तज्ज्ञ स्थापत्य अभियंता प्रत्यक्ष भेट देऊन इमारतीच्या बाह्यस्थितीवरून, इमारतीवर किती वजन आहे व सद्य:परिस्थितीत किती प्रमाणात इमारतीची भारवाहन क्षमता आहे याचा अभ्यास करून संबंधित इमारत सुरक्षित आहे की नाही ठरवतो. संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याच्या मुख्यत: दोन पद्धती असतात. पहिल्या पद्धतीत बांधकामाचा नमुना घेऊन त्यातील काँक्रीट, सळ्या, विटा, रेती गुणवत्ता, मजबुती प्रयोगशाळेत तपासली जाते. या पद्धतीला विध्वंसक परीक्षण म्हणतात.दुसºया प्रकारात बांधकामाच्या कोणत्याही भागाची तोडफोड न करता विविध उपकरणांद्वारे जसे की रिबाऊन्ड हॅमर, अल्ट्रासोनिक पल्स व्हेलोसिटी मशीन, पीएच मीटर, रिबारलोकेटर इत्यादींद्वारे गुणवत्ता व मजबुती ठरविली जाते. या पद्धतीला अविध्वंसक परीक्षण म्हणतात. लेखापरीक्षणाच्या अहवालात सुचविल्याप्रमाणे इमारतीच्या दोषांवर आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित असते; पण बरेचदा तातडीने कार्यवाही होत नसल्यामुळे दुर्घटना घडतात. काही वेळा इमारतीचे मालक जुनी इमारत पाडून नवीन बांधण्यासाठी उत्सुक असतात; मात्र बºयाच वर्षांपासून राहत असलेले भाडेकरू घर सोडायला तयार नसतात. कोर्ट कचेºया वर्षानुवर्षे चालू असतात व मध्येच केव्हा तरी इमारत कोसळून अपघात होतो. काही वेळेस नूतनीकरण व इंटेरियर डेकोरेशनच्या नावाखाली इमारतीतील महत्त्वाचे कॉलम व बिम तोडले जातात, त्यामुळे मूळ इमारतीला धोका निर्माण होतो. पावसाळ्यात स्लॅबवरील पाणी इमारतीच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात झिरपत राहिले तरी इमारत क्षतिग्रस्त होऊ शकते. पावसाळ्यात जमिनीमधील जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढल्यामुळे भूस्खलन व दरड कोसळण्यासारख्या घटना घडतात. इमारती, पूल, धरण, संरक्षक भिंतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण स्ट्रक्चरल कन्सल्टंट तसेच स्थापत्य अभियांत्रिकीचे तज्ज्ञ प्राध्यापक, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिकेतील तज्ज्ञ अभियंत्याकडून करून घेता येऊ शकते.महत्त्वाच्या स्थापत्य अभियांत्रिकी बांधकामांचे संरचनात्मक लेखापरीक्षण नियमित करून अहवालाप्रमाणे कार्यवाही केल्यास पावसाळ्यातील भविष्यातील बºयाच दुर्घटना तसेच मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होऊ शकते. याकरिता संबंधित शासकीय बांधकाम विभाग, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यासारख्या विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बांधकामाचे संरचनात्मक लेखापरीक्षण बंधनकारक करून त्याची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.
इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण अत्यावश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 4:24 AM