विरोधकांची धारच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 04:01 AM2018-05-17T04:01:25+5:302018-05-17T04:01:25+5:30

लोकशाही पद्धतीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच विरोधकांनादेखील महत्त्व असते आणि ही प्रणाली सुरळीतपणे चालण्यात त्यांचादेखील मोठा वाटा असतो.

The support base of the opponents | विरोधकांची धारच आधार

विरोधकांची धारच आधार

Next

लोकशाही पद्धतीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच विरोधकांनादेखील महत्त्व असते आणि ही प्रणाली सुरळीतपणे चालण्यात त्यांचादेखील मोठा वाटा असतो. देशात विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र मोट बांधण्याच्या प्रयत्नांमध्ये असताना देशाचे केंद्रस्थान असणा-या नागपुरात मात्र विरोधक मवाळ पवित्र्यातच दिसून येत आहेत. विरोधी गटांमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना ही बाब प्रकर्षाने जाणवतदेखील आहे. शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेलादेखील आला. विरोधी पक्षात असलो तरी नागरिकांच्या हक्कांसाठी आपण सजग राहायला हवे. वेळ आलीच तर रस्त्यांवर उतरून आंदोलन करायला हवे. जर पक्षात सक्रियच राहायचे नसेल तर दुसºया व्यक्तीला संधी देण्यात येईल, असे खडे बोल काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी यावेळी सदस्यांना सुनावले. मुळात विरोधी पक्षात असताना तर नगरसेवक किंवा पक्षातील पदाधिकाºयांची जबाबदारी आणखी वाढते. कारण सत्ताधाºयांकडून न्याय मिळत नसेल तर जनता आपले प्रश्न विरोधकांनी मांडावे ही अपेक्षा करत असते. परंतु नागपुरात खरोखरच असे चित्र आहे, या प्रश्नावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. खरे तर नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यासाठी विरोधी पक्षातील सदस्यांनी नेहमी तत्परच असायला हवे. परंतु काँग्रेसच्या शहराध्यक्षांना बैठकीमध्ये ही गोष्ट सांगण्याची वेळ का आली हा कळीचा मुद्दा आहे. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी निवडणुकांच्या वेळी सक्रिय होतात आणि त्यानंतर पक्षाच्या आंदोलनाकडे सातत्याने पाठ फिरवितात हे ठाकरे यांचे निरीक्षण एकदम योग्य आहे. विरोधी बाकांवर बसणे म्हणजे हताश होऊ जाणे असा अर्थ होत नाही. तर ती एक संधी असते पक्षाला मजबूत करण्याची, संघटनेला सक्षमरीत्या बांधण्याची. विरोधकांनी या काळात जनतेमध्ये स्वत:बाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी परिश्रमांची गुंतवणूक केली पाहिजे. कदाचित लगेच परिणाम समोर येणार नाहीत. मात्र दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यात निश्चितच फायद्याची ठरू शकते. केवळ प्रसिद्धीपुरते आंदोलनात यायचे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी उन्हात येणे टाळायचे, असा पवित्रा नुकसानकारक ठरू शकतो. जनतेसाठी लढताना जनतेच्या खांद्याला खांदा लावून उतरणे अपेक्षित असते. काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी वा इतर पक्ष, या सर्वांनी सखोल मंथन केले पाहिजे. विरोधकांच्या मुद्यांमध्ये धार हा लोकशाहीचा खरा आधार असल्याची बाब समजून घेण्याची गरज आहे.

Web Title: The support base of the opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.