समर्थकांनी मार्ग चोखाळला; खडसे काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:48 AM2019-12-13T11:48:12+5:302019-12-13T11:49:16+5:30

भुसावळचे आमदार संजय सावकारे हे मात्र अद्याप खडसे यांच्यासोबत आहेत. खडसे यांनी काही निर्णय घेतल्यास सावकारे काय करतात, हादेखील मोठा औत्सुक्याचा विषय राहील.

Supporters pave the way; What will Khadse do? | समर्थकांनी मार्ग चोखाळला; खडसे काय करणार?

समर्थकांनी मार्ग चोखाळला; खडसे काय करणार?

Next

मिलिंद कुलकर्णी
भाजप नेते एकनाथराव खडसे हे या आठवड्याचे हिरो राहिले. साडेतीन वर्षे पक्षनेतृत्वाने केलेल्या कथित अन्यायाची सव्याज परतफेड या आठवड्यात खडसे यांनी केली. परळीत गोपीनाथ गडावर ‘माझा भरोसा ठेवू नका’ या घोषणेने कळसाध्याय गाठला. दरम्यान, याच काळात खडसे यांचे समर्थक मानल्या गेलेल्या अनिल गोटे यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचा मार्ग चोखाळला. अन्य समर्थक काय करतात, याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळात राहणार आहे.
साडे तीन वर्षांपूर्वी एकनाथराव खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा संधी तर मिळाली नाहीच, पण विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले. कन्येला उमेदवारी मिळाली; मात्र ‘महाआघाडी’च्या उमेदवाराकडून रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. पक्षांतर्गत हितशत्रूंनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला रसद पुरविल्याचा खडसे यांचा आरोप आहे. हे आरोप करताना त्यांनी टायमिंग अचूक साधले आहे. भाजपच्या हातून राज्य गेले आहे, विरोधी पक्षनेतेपद राष्टÑीय नेत्यांच्या पाठबळावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविले गेले आहे, युतीला बहुमत मिळूनही आणि भाजप सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून निवडून आला तरी विरोधी पक्षात बसावे लागत असल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ‘आयारामां’मधील अस्वस्थता आणि निष्ठावंतांमधील अस्वस्थता पुन्हा भिन्न स्वरुपाची आहे. ‘हीच ती वेळ’ असे म्हणत खडसे यांनी पक्षांतर्गत नाराजी, निराशा आणि उद्विग्नतेला या आठवड्यात हवा दिली आहे. एवढे घडूनही पक्षश्रेष्ठींकडून अद्याप संयम आणि सबुरीचे धोरण अवलंबले जात आहे.
भाजपकडून आणि विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे खास वर्तुळातील नेते यांच्याकडून कशी अन्यायाची आणि अपमानाची वागणूक दिली जात आहे, यासंबंधी उदाहरणे देत खडसे यांनी बहुजन आणि मूठभर असा पक्षातील अंतर्गत नवा वाद जनतेसमोर मांडला आहे. फडणवीस यांचे निकटवर्तीय कोण आहेत, हे खडसे यांचेच समर्थक माजी आमदार अनिल गोटे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्यात गिरीष महाजन, जयकुमार रावल, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम कदम यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यानंतर भाजपच्या उत्तर महाराष्टÑ विभागाची आढावा बैठक जळगावला होणार असताना अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना पक्षातील हितशत्रूंनी पाडले, त्याचे पुरावे मी पक्षश्रेष्ठींकडे दिले असूनही कारवाई होत नसल्याचा सूर त्यांनी लावला. गिरीश महाजन यांनी या वादात उडी घेत, पुरावे असतील तर नावे जाहीर करा, असे खुले आव्हान दिले. खडसे यांना तेच हवे होते, पक्षाच्या बैठकीत ते पुरावे घेऊन पोहोचले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुरावे सादर केले. हे पुरावे पत्रकार परिषदेत जाहीर करण्याची परवानगी मागितली. ती नाकारली गेली तरी कुणाची चूक आढळल्यास कारवाई केली जाईल, हे आश्वासन त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडून मिळविले.
पक्षाने त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर खडसे यांनी दिल्लीत जाऊन राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. पाठोपाठ गोपीनाथ गडावरुन माझा भरोसा नाही, हे स्पष्ट करुन टाकले. याचा अर्थ खडसे यांच्या मनात काही शिजते आहे काय? का दबावतंत्राचा भाग म्हणून ते अशा घोषणा करीत आहे, हे कळायला काही अवधी जाऊ द्यावा लागेल.
मध्यंतरी झालेल्या एका सर्वेक्षणात खडसे यांनी शिवसेनेत जावे, असा सूर निघाला. तिन्ही पक्षांनी खडसे यांच्याविषयी सहानुभूती दाखवली आहे. त्यांना प्रवेशाचे आमंत्रण दिले आहे. खडसे कोणता मार्ग अनुसरतात, हे बघायला हवे.
४० वर्षे भाजपसाठी खस्ता खाल्ल्या असे म्हणणारे खडसे सहजपणे भाजप सोडणार नाहीत, असा काहींचा अंदाज आहे. कोणत्याही पक्षात जायचे तर मंत्रिपद आणि इतर काही अटी असतील. सून खासदार, पत्नी महानंद व जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष, कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ही पदे घरात आहेत. भाजप सोडायचा असल्यास त्यासंबंधी विचार करावा लागेल.
एकमात्र खरे की, त्यांच्या समर्थकांनी यापूर्वीच वेगळी वाट चोखाळली आहे. शहाद्याचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे भाजपने तिकीट कापताच त्यांनी काँग्रेसची उमेदवारी स्विकारली. धुळ्याचे अनिल गोटे यांनी आमदारकी व भाजपचा राजीनामा दिला आणि अपक्ष उमेदवारी केली. काँग्रेस-राष्टÑवादीने त्यांच्या पुरस्कृत केले. अर्थात दोघे पराभूत झाले.
भुसावळचे आमदार संजय सावकारे हे मात्र अद्याप खडसे यांच्यासोबत आहेत. खडसे यांनी काही निर्णय घेतल्यास सावकारे काय करतात, हादेखील मोठा औत्सुक्याचा विषय राहील.

Web Title: Supporters pave the way; What will Khadse do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.