- सचिन जवळकोटे
सोलापूरच्या इतिहासात न भुतो न भविष्यती अशी विचित्र राजकीय परिस्थिती प्रथमच निर्माण झाली असावी. भगव्या वस्त्रातल्या उमेदवार महाराजांच्या स्वागतासाठी काळ्या बुरख्यातल्या भगिनी पंचारतीचं ताट घेऊन पुढं सरसावताहेत तर मठातले महास्वामी एका शुभ्र खादीतल्या उमेदवार नेत्याला पांढरा विभूती पट्टा लावण्यात मग्न होताहेत. लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची पातळी अशी वेगळ्या मार्गानं ‘जात’ असल्यानं भांबावलेला सर्वसामान्य मतदारही घरात अडगळीत पडलेला स्वत:च्या जातीचा दाखला शोधू लागलाय; कारण आजपावेतो केवळ पोट भरण्याचा ‘धर्म’ पाळण्यातच गुंतलेला हा सोलापूरकर शक्यतो अशा वाटेवर कधी ‘जात’च नव्हता.
सोलापूर लोकसभेनं कैक मोठ्या लढती बघितलेल्या. ‘दमाणी विरुद्ध काडादी’ लढतीत ‘बाळीवेस श्/र चाटीगल्ली’ अशी जोरदार चुरसही अनुभवलेली. वल्याळांच्या विजयासाठी पूर्वभागातही सरसावून मतदान केलं गेलेलं. मात्र, हे सारं कार्यकर्त्यांपुरतंच सिमित होतं. पक्षाचे प्रमुख नेते किंवा उमेदवार स्वत: कधी जाती-धर्माच्या पातळीवर उतरत नव्हते किंवा भाषणात तसा उल्लेखही करत नव्हते. मात्र, यंदाची परिस्थिती अत्यंत विचित्र. वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली.
यंदाच्या निवडणुकीत सुशीलकुमारांसमोर दोन टोकांच्या दोन विचारसरणींची दोन वेगवेगळी मंडळी मैदानात उतरलीत. एक उमेदवार उजवा तर दुसरा डावा. एकाच्या अंगावर भगवी वस्त्रं तर दुसºयाच्या पार्टीवर निळं लेबल लागलेलं. सध्या सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातूनही कुठून-कुठून ओळखीपाळखीची नसलेली महाराज मंडळी सध्या सोलापुरात येताहेत. भाजपकडून उभारलेल्या गौडगावच्या जयसिद्धेश्वर महाराजांसाठी गावोगावी फिरताहेत. याचवेळी अकोल्याहून इथं आलेल्या प्रकाश आंबेडकरांसाठी बुधवारपेठेतल्या थोरल्या राजवाड्यापासून कोंतम चौकातल्या धाकट्या राजवाड्यापर्यंत सारेच एकदिलानं एकवटलेत. यात ओवैसींच्या सभेनं तर पुरता हंगामा माजविलेला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मोदींच्या सभेपेक्षाही अधिक गर्दी म्हणे ओवैसींचं भाषण ऐकण्यासाठी जमलेली. त्यामुळं ‘वंचित’च्या निळ्याला हिरव्या रंगाचीही किनार लाभलेली. याचवेळी सुशीलकुमारांनीही ‘धनगरवाड्यातला ढोल’ वाजवत पिवळ्या रंगाशी अधिक जवळीक साधलेली.
या पार्श्वभूमीवर दोन वेगळे फोटो ‘लोकमत’च्या हाती लागले. एकामध्ये जयसिद्धेश्वर महाराज यांचं स्वागत करण्यासाठी काळा बुरखा घातलेल्या काही भगिनी भाजपच्या मंडपात उभारल्यात. भगव्या वस्त्रातले महाराज गळ्यात हार घालून त्यांच्यासमोर विनम्रपणे उभे आहेत़़़ तर दोघीजणी हातात पंचारतीचं ताट घेऊन त्यांना ओवाळताहेत. दोघींच्या काळ्या बुरख्यावर लाल स्कार्फही ओढलेला असून, तिसरी बुरखाधारी ताटातलं तांदूळ हातात घेऊन महाराजांचं स्वागत करू पाहतेय. शेजारी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवारही साक्षीला उभे. हा प्रसंग उत्तर सोलापूर तालुक्यातल्या मार्डीचा़ हा फोटो एका कार्यकर्त्यानंच आज सोमवारी सकाळी टिपलेला.
दुसरा फोटो दिसतोय तो सुशीलकुमारांचा. बाळीवेशीत लिंगायत समाजाच्या बसव मेळाव्यात बसवलिंग महास्वामींनी त्यांच्या कपाळावर विभूती पट्टा लावलेला. काही दिवसांपूर्वी एका मेळाव्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी हेही जाहीरपणे सांगितलेलं की, ‘आपले नेते वीरशैव कक्कय्या समाजाचेच...म्हणजेच तेही मूळचे वीरशैवच आहेत बरं का़़़!’आजपावेतो सोलापूरचा लिंगायत समाज वेळोवेळी सुशीलकुमारांच्या पाठीशी राहिलेला; मात्र सार्वजनिक ठिकाणी चार-चौघांत असं कपाळाला विभूती पट्टा लावून घेण्याची वेळ बहुधा प्रथमच आलेली असावी.
महाराजांसोबत ‘तम्म तम्म मंदी’ गेल्याचे चित्र दिसू लागल्यानं लिंगायत समाजाला जवळ करण्यासाठी उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. अशातच ओवैसींच्या माध्यमातून आंबेडकरांनी थेट विजापूर वेस गाठल्याची पोस्ट व्हायरल झालेली.़़ हे पाहून काँग्रेसवाले अधिकच जोमानं कामाला लागलेले. या पार्श्वभूमीवर भगव्या वस्त्रातल्या महाराजांचं स्वागत काळ्या बुरख्यातल्या भगिनींना करायला लावून ‘भाजप’वाल्यांनी नेमकं काय साधलं, हे जिल्हाध्यक्ष शहाजीबापूंनाच माहीत...कारण या भगिनी त्यांच्याच गावच्या ना !
- सचिन जवळकोटे
(लेखक ‘सोलापूर लोकमत’चे निवासी संपादक आहेत)