सर्व लोकप्रतिनिधींचे स्वागत..
विदर्भाच्या राजधानीत, नागपूर शहरात हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आपण सगळे जात आहात. अधिवेशनाचा कालावधी ओढून ताणून दहा दिवसांचा आहे. या काळात आरोप-प्रत्यारोप, गदारोळ, गोंधळ या अशा आयुधांचा वापर करून आपण हे सगळे दहा दिवस सार्थकी लावाल, याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. परवा अजितदादा मन मोकळे करून बोलले. अनेक गोष्टींचा स्फोट त्यांनी प्रथमच केला. त्यावर शरद पवार यांनीदेखील योग्य वेळी मला जे बोलायचे ते बोलेन, असे सांगून त्यांच्या बाजूने काय घडले नाही हे अद्याप कळू दिलेले नाही. अधिवेशनात एक दिवस सुटी आहे. त्या दिवशी दोन्ही बाजूंनी नेमके काय घडले हे महाराष्ट्राला सांगण्याचा कार्यक्रम घेता येईल का? ते देखील बघा. तसे झाले तर महाराष्ट्रातल्या जनतेला सत्याचा साक्षात्कार होईल.
भाजपसोबत सत्तेत सहभागी होताना झालेल्या बैठकांमध्ये शरद पवार होते. तुम्ही सरकारमध्ये जा, असे त्यांनीच सांगितले, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, त्यांचेच मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी पक्षाचे एक सहकारी हसन मुश्रीफ यांनी मात्र वेगळेच मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या मते शरद पवार त्या बैठकीला होते; पण भाजपसोबत जावे अशी त्यांची भूमिका नव्हती, असे हसन मुश्रीफ यांचे मत आहे. त्यामुळे नेमके खरे कोणाचे मानायचे हा संभ्रम अजून संपलेला नाही.
यानिमित्ताने वेगवेगळ्या संभाव्य पुस्तकांविषयी देखील महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. पुस्तक लिहून अनेक गोष्टी आपण उघड करणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यावर शरद पवार यांनी ‘पक्ष सोडून कसे जातात’ यावर पुस्तक लिहावे, असा सल्ला दिला आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ या नेत्यांनी वेगवेगळी पुस्तके लिहावीत. त्यानिमित्ताने राजकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी चांगले विषय मिळतील. फक्त ही पुस्तके वाचल्यानंतर त्यांची पीएच.डी. निश्चित कालावधीत पूर्ण होईल, याची काळजी घेऊन सत्य घटना लिहाव्यात. नाहीतर पुस्तकांमधील घटनांचा क्रम लावता लावता पीएच.डी. करणाऱ्याचे आयुष्य जायचे...
काँग्रेस पक्षाचे वेगळेच सुरू आहे. त्यांचे नेते माध्यमांशी कसे आणि किती वेळ बोलायचे याचा अभ्यास करण्यात व्यस्त आहेत. ग्राउंडवर जाऊन काम करावे लागते, लोकांना भेटावे लागते, त्यांचे प्रश्न ऐकून घ्यावे लागतात, या गोष्टींची आता फारशी गरज आहे असे त्यांना वाटेनासे झाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विषयीची सहानुभूती अजूनही कायम आहे, या भ्रमात आहेत. ओबीसींची मते आपल्यालाच मिळाली पाहिजेत या नियोजनात भाजपचे काही नेते गुंतले आहेत. अशा विषयांच्या भाऊगर्दीत अधिवेशनात असे वेगळे काय घडणार? असाही प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.
आपण सगळे नागपूरला जात आहात. छान गुलाबी थंडी आहे. आपण नागपुरी खाद्य यात्रेचा आस्वाद घ्या. होता होईल तेवढे एकमेकांविषयीचे गौप्यस्फोट करत रहा. लोकांना ते आवडतात. आरोप प्रत्यारोपांमुळे कार्यकर्त्यांमध्येही जान येते. त्यांना गावागावांत भांडायला, बोलायला मुद्दे मिळतात. उगाच दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले वाटोळे, अवयव विकायला मुंबईत आलेले शेतकरी, महागाई, बेरोजगारी अशा विषयांमध्ये फार गुंतून पडू नका. हे विषय निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये कामाला येतील.
सध्या दिवस उजाडला की संजय राऊत, नीलेश राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या असे अनेक नेते माध्यमांना वेगवेगळ्या विषयांचा रतीब घालायला निघतात. मध्येच ज्येष्ठ नेते स्फोट, गौप्यस्फोटाचे पार्सल पाठवत राहतात. महाराष्ट्रात एकदम छान वातावरण आहे. ते असेच कायम ठेवा. अधिवेशनानंतर आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिले? असा प्रश्न जर आपल्या घरातल्या मुलाबाळांनी, बायकापोरांनी विचारला, तर काय उत्तर द्यायचे ते देखील ठरवून ठेवा. उगाच तिथे खोटे बोलण्याची वेळ येऊ नये...
आपलाच, बाबूराव