दिल्लीपासून गल्लीपर्यंत राज्य असणा-या भाजपाचे सोलापूर महापालिकेवरही राज्य आहे. त्याच महापालिकेतील भाजपचे पक्षनेता सुरेश पाटील गेल्या ५० दिवसांपासून सोलापूर ते मुंबई अशा उपचार फे-यात आजाराशी झुंज देताहेत... कुणी म्हणतो, ‘थॅलियम’ विषाचा प्रयोग झाला तर कुणी वेगळेच काही तरी सांगतो... आता आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.सोलापूर महापालिकेवर भाजपाची व पर्यायाने सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची सत्ता आली. महापौरपदी सुभाष देशमुख गटाच्या शोभाताई बनशेट्टी तर भाजप सभागृह नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांची वर्णी लागली. सत्ता आली तरी देशमुखद्वयांच्या निष्ठावंतांमधील संघर्ष मात्र कायमच राहिला. श्री सिद्धरामेश्वरांच्या ऐतिहासिक ‘गड्डा यात्रा’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एकीने राहा, नाही तर महापालिकाच बरखास्त करतो!’ अशी तंबी दिल्याने दोन्ही गटाने उत्साहाने ‘एकोपा नाट्य’ रंगविले आणि महापालिकेच्या संसाराला सुरुवात झाली. या सुखदायी पार्श्वभूमीवर ६ डिसेंबर २०१७ रोजी पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांचे निष्ठावंत पक्षनेता सुरेश पाटील यांची प्रकृती अचानक ढासळली आणि त्यांना सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल केले.अशा ताज्या घटना इतिहासावर हा विषय थांबत नाही. मार्कंडेय रुग्णालयात मज्जासंस्था संदर्भातील तीव्र न्यूरोपॅथीचे उपचार करण्यात आले. गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेच्या राजकारणात भाजपचा किल्ला लढविणाºया पन्नाशीतील पाटील यांच्यावरील साखर निदानाचा हा बाका प्रसंग पहिल्यांदाच ओढवला. उपचार झाले तरी त्यांची प्रकृती मात्र सुधारली नाही. अखेर तिथून त्यांना पुण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेही प्रकृती सुधारण्याऐवजी ढासळतच जाऊ लागली. त्यांच्या हातापायातील शक्ती क्षीण होऊ लागली. हालचालीही मंदावल्या. अखेर त्यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. आज ते तेथेच अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.सुरेश पाटील यांच्या प्रकृतीत झालेल्या चढउतारांचा धागा पकडून त्यांना विषबाधा झाल्याची जोरदार चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली. त्यांच्या खाण्यात काही आले असेल असाही सूर उमटला. वैद्यकशास्त्रात विषबाधा आटोक्यात आणण्याचे अनेक प्रभावी उपचार आहेत. सोलापूरपासून पुणेमार्गे मुंबईपर्यंत हे सर्व उपचारही झाले. त्या उपचारानंतर सुरेश पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती बिघडतच चालल्याने पाटील यांचे कुटुंबीय, कार्यकर्ते आणि त्यांचे नेते पालकमंत्री विजयकुमार देशमुख चिंतातूर बनल्याचे दिसून येते.सुरेश पाटील यांना नक्की काय झाले? या प्रश्नाचा शोध घेता थॅलियम या घातक विषारी रसायनाचा प्रयोग झाला असल्याच्या निष्कर्षापर्यंत सोलापूरकर पोहोचले! पाटील यांच्या शरीरात थॅलियमचा अंश आढळला. असाच प्रकार पूर्वी मुंबईतील एका व मराठवाड्यातील एका पुढा-यावर झाला होता. तसाच ‘विषप्रयोग’ सुरेश पाटलांवर झाला असावा, ही फक्त कुजबूज न राहता चक्क महापालिकेच्या सभेत या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणीही झाली. एकूणच विषप्रयोगाच्या चर्चा धास्तीने काही पुढाºयांनी तर बाहेर खाणे-पिणे बंद करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री विजयकुमार देशमुखही आता हे प्रकरण सीआयडीकडे द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडेच करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.- (raja.mane@lokmat.com)
सोलापुरी राजकारणाला थॅलियम विषाचा धसका
By राजा माने | Published: January 24, 2018 12:37 AM