चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 09:34 AM2024-05-20T09:34:51+5:302024-05-20T09:35:32+5:30
तापमानवाढीमुळे कोकोची झाडेच संकटात आहेत. परिस्थिती सुधारली नाही, तर २०५० पर्यंत चॉकलेट बहुदा मिळणारच नाही!
साधना शंकर, लेखिका, केंद्रीय राजस्व अधिकारी -
बहुतेकांना त्यांचे वय काहीही असले, तरी चॉकलेट आवडत असतेच. चॉकलेटची बाजारपेठ आता विस्तारली असून, विविध चवींची चॉकलेट्स उपलब्ध आहेत. फक्त दुधाचे, डार्क चॉकलेट, असे अनेक प्रकार मिळतात. त्यातही मिरची, मद्य, शेंगदाणे असे किती तरी पदार्थ मिसळलेले असतात. स्वाभाविकच चॉकलेटप्रेमींच्या निवडीला भरपूर वाव मिळतो. मात्र, नुकतीच आलेली एक बातमी काही चॉकलेटप्रेमींसाठी फार चांगली नाही.
कोकोच्या झाडाला येणाऱ्या फळांपासून चॉकलेट तयार होते. कोकोच्या बिया भाजल्या जातात, किण्वन प्रक्रिया करून किंवा वाळवून त्यात साखर आणि लोणी मिसळले जाते, मग चॉकलेट तयार होते. पेय किंवा अन्नपदार्थ अशा कोणत्याही स्वरूपात चॉकलेट ५ हजारांहून अधिक वर्षांपासून खाल्ले जात आहे, असे उल्लेख आढळतात. साधारणतः १६०० मध्ये स्पॅनिश भाषेतून इंग्रजीत चॉकलेट हा शब्द आला.
सध्या आयवरी कोस्ट, घाना, नायजेरिया आणि कॅमेरून या देशांत जगातील सुमारे ७० टक्के कोको बियांचे उत्पादन होते. आयवरी कोस्ट आणि घाना या दोनच देशांत जगात ५० टक्क्यांहून अधिक कोको पिकवला जातो. उपलब्ध माहितीनुसार २०२३ मध्ये जगातील चॉकलेटची बाजारपेठ ४२१ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. २०३० सालापर्यंत ती ४.१ टक्के चक्रवाढीनुसार वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जातो.
भारतातील चॉकलेटची बाजारपेठ २०२४ मध्ये २.३१ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होईल, असे सांगण्यात येते. यंदा लागोपाठ तिसऱ्या वर्षी कोकोच्या जागतिक मागणीच्या साडेआठ टक्के इतका कमी पुरवठा होणार आहे.
चॉकलेटमध्ये अत्यंत महत्त्वाचा कच्चा माल असलेल्या कोकोच्या बिया एप्रिल २०२४ मध्ये टनामागे १२ हजार डॉलर्स इतक्या महाग झाल्या. ही किंमत गेल्या वर्षीच्या चौपट आहे. अल निनो, हवामानातील बदल यामुळे कोको उद्योगावर हे संकट ओढवले असून, कोको पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांमध्येही वाढ होत आहे.
भरपूर पाऊस असणारी जंगले कोकोच्या वाढीस पोषक असतात. विषुववृत्ताच्या १० अंश उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे व्यापारासाठी चांगला असा कोको पिकवला जातो, परंतु वाढते तापमान, पावसाची अनिश्चिती यामुळे कोकोची झाडे संकटात आली आहेत.
या झाडांना आर्द्रता चालत नाही. पृथ्वीला टोकाच्या हवामानाचा सामना करावा लागत असल्यामुळे या झाडांवर परिणाम होत आहे. २०२३ मध्ये विषुववृत्तानजीकच्या प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान अल निनोमुळे वाढले. त्यामुळे पश्चिम आफ्रिकेत अत्यंत मुसळधार पाऊस पडून कोकोच्या झाडांवर ब्लॅक पॉड नावाचा रोग पडला.
जगात पाच एकरांपेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त कोको पिकवला जातो. संशोधन असे सांगते की, जमीनधारणेच्या या प्रमाणामुळेही नुकसान होत आहे. हवामानातील बदलामुळे सुपीक जमीन कमी होते. कोकोची झाडे लावण्यासाठी शेतकरी इतर झाडे कापतात. त्यातून पर्यावरणाचे प्रश्न अधिकच बिकट होतात.
चॉकलेट उत्पादक आता चॉकलेटच्या वडीचा आकार कमी करणे, त्यात भरण्याच्या पदार्थांची संख्या वाढवणे, असल्या युक्त्या अवलंबत असून, मोठ्या चॉकलेट कारखान्यांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. या प्रश्नाकडे लक्ष दिले गेले नाही, तर जगभरातील चॉकलेट शौकिनांसाठी चॉकलेट लवकरच खूप महाग होईल. काहींनी वर्तवलेल्या अंदाजानुसार २०५० पर्यंत परिस्थिती इतकी दारुण होईल की, चॉकलेट नष्ट होण्याचीच भीती आहे.
एका साध्या कोकोच्या बीचा हा प्रवास आपल्याला हेच सांगतो की, हवामान बदलावर होणारे परिणाम किमान राहतील, अशी काळजी आपण घेतली नाही, तर आपल्या सवयीच्या अनेक गोष्टींमध्ये किती अकल्पित आणि टोकाचे बदल होऊ शकतील!
sadhna99@hotmail.com