ग्लोबल उंदरांची कहाणी; बलवानांपुढे जग हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 09:11 AM2022-04-19T09:11:50+5:302022-04-19T09:14:38+5:30

संयुक्त राष्ट्रसंघाचे १९३ सदस्य देश म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची यावर विचार करण्यासाठी एकत्र जमलेल्या उंदरांचा जणू समूह बनला आहे. महामारीत कोट्यवधी बळी गेलेच आहेत. आता जणू महायुद्धात कोट्यवधी जीव जाण्याची जग वाट पाहत आहे. बलवानांपुढे जग हतबल आहे.

The story of the global rat; The world is weak before the strong; Editorial about United Nations | ग्लोबल उंदरांची कहाणी; बलवानांपुढे जग हतबल

ग्लोबल उंदरांची कहाणी; बलवानांपुढे जग हतबल

Next

भारतात कोरोना विषाणू संक्रमणात पाच लाख नव्हे, तर आठपट म्हणजे चाळीस लाख लोक मरण पावले व आकडेवारी द्यायला भारत टाळाटाळ करीत आहे, अशा आशयाचा म्हणे जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल दिला आहे. त्यावर अशी मृतांची आकडेवारी काढण्याची पद्धतच चुकीची असल्याचे भारताचे आरोग्य मंत्रालय म्हणते. तर बघा, मी सांगतच होतो ना, देशात ४० लाख लोक मरण पावले.. तेव्हा त्यांना प्रत्येकी चार लाख रुपये भरपाई द्या, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात. योगायोग असा, की याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रयेसस तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर, गुजरातमध्ये दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते पारंपरिक औषधांच्या पहिल्या जागतिक केंद्राचा प्रारंभ करणार आहेत. त्यामुळे या जागतिक संघटनेचा अहवाल, एकूणच भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हे पहिल्यांदा घडतेय असे नाही. कोरोनाचा विषाणू मानवनिर्मित आहे व त्यासाठी चीनविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात गुन्हेगारी स्वरूपाचा खटला चालवायला हवा, अशा अमेरिकेच्या आरोपानंतर मोठा गाजावाजा करीत याच संघटनेने चीनमध्ये तपास पथक पाठविले होते. परंतु, त्या तपासातून अपेक्षेप्रमाणे काहीही निष्पन्न झाले नाही. चीनने डोळे वटारताच पथक तपासाचा सोपस्कार करून परतले. असे जागतिक म्हणविल्या जाणाऱ्या या एकाच संघटनेबद्दल घडले असे नाही. तापमानवाढीचा अत्यंत गंभीर विषय असाच हवेत उडवून डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली. तेव्हाही इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज संस्था काहीच करू शकली नाही. या सगळ्या जागतिक संघटनांची मातृसंस्था असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाची अवस्थाही अनेक बाबतींत केविलवाणी आहे.

ताजे उदाहरण रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचे आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेपुढे वेदना व संतापाने ओतप्रोत भरलेले तडाखेबाज भाषण केले. तेव्हा त्याला टाळ्या मिळाल्या खऱ्या, पण फक्त टाळ्याच मिळाल्या. युक्रेनमधील नरसंहार थांबला नाही. शहरे बेचिराख होतच आहेत. निषेध नोंदविला, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेतून रशियाला निलंबित केले, एवढे सांगण्यापलीकडे अगदी महासत्ता अमेरिका व तिच्या बाजूचे देश काहीही करू शकले नाहीत. यानिमित्ताने, पहिल्या महायुद्धानंतर भविष्यातील महायुद्ध रोखण्यासाठी स्थापन झालेल्या लीग ऑफ नेशन्सपुढे इथिओपियाचे अध्यक्ष हेल सेलेसी यांनी १९३६ साली केलेल्या भाषणाची अनेकांना आठवण झाली. तेव्हा, इटलीचा शासक बेनिटो मुसोलिनी याने इथिओपियावर आक्रमण केल्यानंतर सेलेसी यांना पदच्युत होऊन देश सोडावा लागला होता. त्यानंतर तीनच वर्षांत दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले. लीग ऑफ नेशन्सला महायुद्ध रोखता आले नाही. त्यात कोट्यवधी लोकांचे जीव गेल्यानंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघालाही नंतरच्या सत्तर वर्षांत युद्धे रोखता आली नाहीत. त्या युद्धांचे रूपांतर महायुद्धात न झाल्याचे श्रेय राष्ट्रसंघाला नव्हे, तर हल्ले आवरते घेणाऱ्या आक्रमक देशांना द्यावे लागेल. आताही चुटकीसरशी युक्रेनला संपविण्याचे स्वप्न पाहणारा रशिया दोन महिने झाले तरी निर्णायक विजय मिळाला नसल्याने नैराश्येतून तिसऱ्या महायुद्धाची व आण्विक हल्ल्याची धमकी देत आहे. तरीही जग व्लादिमीर पुतिन यांचे काहीच बिघडवू शकलेले नाही. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने उच्छाद मांडला आहे.

आण्विक क्षेपणास्त्राच्या चाचण्या करून अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या तो देत असतानाही दात, नखे गमावलेला संयुक्त राष्ट्रसंघ किंवा त्याची सुरक्षा परिषद हतबल आहे. या सगळ्या जागतिक संस्था व संघटनांना अहवाल देण्यापलीकडे काही काम उरलेेले नाही. त्यांच्या सूचना न पाळणाऱ्या बड्या देशांना झुकविण्याची ताकदही त्यांच्यात उरलेली नाही. एकीकडे म्हणायचे, जग आता ग्लोबल व्हिलेज झाले आहे, जागतिकीकरण हा उठताबसता घोकला जाणारा शब्द बनला आहे. अशावेळी बडी राष्ट्रे मनमानी करणार, आपापला स्वार्थ पाहणार आणि त्यांच्यावर अंकुश ठेवायची जबाबदारी असलेल्या जागतिक संघटनांच्या हाती सामान्य माणसांची ससेहोलपट बघत बसण्यापलीकडे काहीही नाही, हे चित्र आशादायक अजिबात नाही. संयुक्त राष्ट्रसंघाचे १९३ सदस्य देश म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची यावर विचार करण्यासाठी एकत्र जमलेल्या उंदरांचा जणू समूह बनला आहे. महामारीत कोट्यवधी बळी गेलेच आहेत. आता जणू महायुद्धात कोट्यवधी जीव जाण्याची जग वाट पाहत आहे. बलवानांपुढे जग हतबल आहे.
 

Web Title: The story of the global rat; The world is weak before the strong; Editorial about United Nations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.