देव आहे की नाही, यावर खल करीत बसण्यापेक्षा ही श्रद्धा आहे म्हणून तुम्ही आम्ही गुण्या-गोविंदाने जगत आहोत, हे सत्य प्रत्येकाने स्वीकारायलाच हवे. प्रत्येक गोष्ट विकत घेता येऊ शकते, फक्त त्याची योग्य किंमत द्यावी लागते, अशा व्यवहारिक तत्वावर चालणाऱ्या या जगात कोणालाच कशाचा धाक नाही. काहीही केले तर पैशांच्या जोरावर त्यातून बाहेर पडता येते, हे ठाऊक असल्याने भीती म्हणून कोणाची राहिलीच नाही. म्हणूनच देवाची श्रद्धा महत्त्वाची वाटते.
या दरबारात तरी कोणी खोटे बोलत नाही, असे आम्हाला वाटते. हे खोटेपण एकतर त्याला स्वत:लाच माहित असते आणि दुसरा जर कोणी हे ओळखून असेल तर तो त्याचा श्रद्धेतला देव. या दरबारात तो न चुकता जातो आणि सारे पाप कबूल करून आपल्या कमाईतला काहीसा भाग दानपेटीत देऊन मोकळा होतो. एखादी दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती असो वा सरकारचे जीएसटी, नोटाबंदीसारखे पाऊल याचा परिणाम बाजारपेठेतील प्रत्येक क्षेत्रावर होत असला तरी दानपेटीवर मात्र फारसा होत नाही.
लोकांची श्रद्धाच इतकी गाढ असते की, कितीही मोठा दुष्काळ पडला तरी दानपेटीतील पैशांचा ओघ कमी होत नाही. बरे, ज्याच्यावर या गोष्टींचा परिणाम होतो, तो गरीब, पिचलेला किंवा मध्यमवर्गीय मोठे दान करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याची तेवढी कुवतच राहत नाही. जो मोठे दान करतो त्याच्यावर कुठल्याच आपत्तीचा फारसा परिणाम होत नाही.
यंदाचेच पाहा. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग जमा होऊ लागले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर हे चार जिल्हे वगळता राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात खरीप हातात पडेल, याची अजिबात शाश्वती नाही. थोड्या दिवसांत पाऊस न झाल्यास रबीचीही आशा मावळणार आहे. पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार आहेत. अशा तंगीच्या दिवसांतही दानपेट्यांमधील रक्कम काही कमी होताना दिसत नाही.
याचाच अर्थ गरीबांचे हे ‘दान’ नाही. माणसांमधील कोडगेपण इतके वाढत आहे की देवालाही ते सोडत नाहीत. बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथील कालिकादेवीची दानपेटी रविवारी उघडली असता त्यात चलनातून बंद झालेल्या पाचशे रुपयांच्या तब्बल २१ नोटा निघाल्या. म्हणजे ‘त्या’ भक्ताने देवाचीच १० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक दानपेट्यांमधून ही फसवणूक समोर आली होती.
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरूपतीलाही या लोकांनी सोडले नाही. या दानपेटीत चक्क ८.२९ कोटींच्या बनावट नोटा आढळल्या होत्या. श्रद्धेतल्या या देवाला फसवून काय हाशील? श्रद्धेनुसार, करता, करविता हा देवच असेल तर केलेली ही फसवणूक तो कशी स्वीकारेल? या दानाच्या बदल्यात तो चांगला आशीर्वाद तरी कसा देईल? हे प्रश्न पडणारा श्रद्धाळू असे फसवणुकीचे उद्योग करीत नाही आणि जो हे उद्योग करतो, तो देवालाही भीत नाही, हेच खरे.