विजय दर्डा
गणपती उत्सवात दरवर्षी नव्या ऊर्जेचा संचार होतो. हा केवळ भक्तीचा उत्सव नाही, तर सामाजिक समरसतेचेही सर्वात मोठे प्रतीक आहे. म्हणूनच घरोघरी गणपती पूजिले जातात. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणा व आरत्यांनी आसमंत दुमदुमत राहतो. भाविक आपापल्या श्रद्धा व कुवतीनुसार श्रीगणेशाची पूजा करतात व आशीर्वादही मागतात. त्या विघ्नहर्त्याकडे माझे मागणे एवढेच आहे की, संपूर्ण देश सुखी राहावा, प्रत्येक हाताला काम मिळावे, कोणाचीही उपासमार होऊ नये की, उपचाराअभावी कोणावरही मृत्यूची पाळी येऊ नये. समाजात वैमनस्य असू नये आणि बंधुभाव नांदावा. सर्वांनी गणेशोत्सव साजरा करावा आणि प्रेमाने म्हणावे, ‘गणपती बाप्पा मोरया...!’
देशात लोकशाही बहरावी, अशीही मनात इच्छा आहे. पण काँग्रेस या देशातील प्रमुख विरोधी पक्षाची हालत पाहतो तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकते. प्रबळ विरोधी पक्षाशिवाय लोकशाही कशी बळकट होणार? काँग्रेस हा माझा पक्ष आहे, माझ्या नसानसांत काँग्रेस भिनलेली आहे. त्यामुळे आपल्या सध्याच्या दुर्दशेतून बाहेर येण्याचा मार्ग शोधण्याची सुबुद्धी देशातील या सर्वात जुन्या राजकीय पक्षास होवो, अशी माझी त्या गौरीसुताच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे. श्री गणरायाने काँग्रेसला पुन्हा मैदानात उभे राहण्याची ताकद द्यावी आणि या देशातील सर्वसामान्य नागरिक पुन्हा विश्वास टाकेल, एवढी तंदुरुस्ती द्यावी. एकेकाळी या देशातील लोकांचा भरवसा फक्त काँग्रेसवरच होता. गावोगाव काँग्रेसचे कार्यकर्ते होते. काँग्रेसी टोपी घालणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. पण आता ती टोपी तर पार गायबच झाली आहे. बोलीभाषेत सांगायचे तर काँग्रेसचे नेते एकमेकांच्या टोप्या उडविण्यातच एवढे मश्गूल आहेत की, समाजाशी त्यांची नाळच तुटली आहे. पक्ष केव्हा गलितगात्र झाला व आजारी झाला याचा कोणी हिशेबही ठेवला नाही.
आता महाराष्ट्राचीच अवस्था पाहा ना! अजून विधानसभा निवडणूक जाहीर व्हायची आहे, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी भावाने अश्वमेध घोडा घेऊन राज्यभर दौरे करीत आहेत. पुन्हा मीच सत्तेवर येणार, अशी त्यांनी घोषणाही करून टाकली आहे. त्यांच्या महाजनादेश यात्रेला लोकांची गर्दी उसळतेय. ही गर्दी धरून आणलेल्या लोकांची नाही तर उत्स्फूर्त आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या संघटन चातुर्याविषयी बोलत नाही. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलतो आहे, ते नेतृत्वाची धुरा एकट्याच्या खांद्यावर घेऊन संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. त्यांनी मोठ्या धोरणीपणाने व मित्रभावाने शिवसेनेलाही सोबत घेतले आहे. शक्ती कशी उभी करायची हे फडणवीस जाणतात. लोकांशी संवाद कसा साधावा, याची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे मीच पुन्हा सत्तेवर येईन या त्यांच्या सांगण्यात दर्पोक्ती अजिबात नाही. त्यातून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो.
याउलट मी जेव्हा माझ्या काँग्रेस पक्षाकडे पाहतो तेव्हा या पक्षाला एवढी मरगळ का आली आहे, असा प्रश्न पडतो. काँग्रेसचे नेते आहेत कुठे? भाजपच्या अश्वमेध घोड्याचा निदान लगाम तरी पकडण्याची धडपड करावी, अशी त्यांच्या मनात इच्छाही उत्पन्न होत नाही? पण काँग्रेसमध्ये ती ऊर्मीच दिसत नाही. मी गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्ष फार जवळून पाहिला आहे. राजकारणाचे बाळकडूही मी याच काँग्रेसकडून घेतले. आजच्या एवढी काँग्रेस पूर्वी कधीच गलितगात्र नव्हती, हे मी नक्की सांगू शकतो. पक्षाच्या बड्या नेत्यांमध्येही काही उत्साह दिसत नाही. मग कार्यकर्त्यांमध्ये तरी उत्साह कुठून येणार? लिहिताना मला खूप क्लेष होत आहेत, पण ही वस्तुस्थिती आहे की, काँग्रेस समजच गमावून बसल्यासारखी झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही मला सार्थक सामंजस्य असल्याचे दिसत नाही. काँग्रेसच्या या दुबळेपणाची माझी चिंता केवळ एक पक्ष म्हणून नव्हे तर देशाच्या हितासाठीही आहे. पंडित नेहरू नेहमी म्हणायचे लोकशाहीसाठी प्रबळ विरोधी पक्ष ही नितांत गरज आहे. म्हणूनच ते राम मनोहर लोहिया, मधू लिमये व अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांचा मनापासून सन्मान करायचे. नेहरूजी टीकेला वैचारिक तंदुरुस्तीचे माध्यम मानत असत. आज स्थिती नेमकी उलटी आहे. प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे बजावण्याची क्षमता काँग्रेसखेरीज अन्य कोणत्याही पक्षात नाही. तुम्हीही गणपतीकडे काँग्रेससाठी आशीर्वाद मागा. धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करा आणि सामाजिक सलोखा मजबूत करा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला गणेशोत्सवाच्या भरपूर शुभेच्छा!
हे लिखाण संपविण्यापूर्वी...जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व आता संपत आले आहे. या अत्यंत पवित्र पर्वात ८४ लाख जीव योनींची क्षमायाचना करतात. या पावन पर्वात मीही आपली क्षमा मागतो. गतकाळात माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले गेले असेल, कोणाला माझ्यामुळे दु:ख मिळाले असेल तर त्यासाठी मी कायावाचेमना क्षमाशील आहे. क्षमेहून दुसरे कोणतेही प्रभावी शस्त्र नाही, हेच जैन धर्म शिकवितो.( लेखक लोकमत एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूहाचे चेअरमन आहेत )