- प्रा. संतोष पद्माकर पवार, ज्येष्ठ कवी
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांवर अत्यंत वेगळी आणि कालसुसंगत भूमिका घेणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. रावसाहेब कसबे यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते. गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकाच्या निमित्ताने कसबे यांनी ‘झोत’ या पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संपूर्ण चिकित्सा करून संघाचा दांभिकपणा उघड केला. संघाबाबत मोठी खळबळ उडवून दिली. संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा फॅसिस्ट चेहरा समोर आला. गोळवलकरांच्या या पुस्तकातील अनेक मुद्दे अगदी अलीकडे संघाला मागे घ्यावे लागले.ऐंशीच्या दशकात कसबे यांनी आपल्या वाणी आणि लेखणीला आविष्कृत करायला सुरुवात केली. इंदिरा गांधींचे आणीबाणी युग आणि त्यातून संघ आणि समाजवादी लोकांनी एकमेकांशी मैत्री केल्याच्या पार्श्वभूमीवर कसबे यांचे लेखन समाजवाद्यांची एक प्रकारे कानउघाडणी करणारे होते़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर त्यांच्या चळवळीतील नेतृत्वाने तडजोडवादी राजकारण केले. फक्त आंबेडकर म्हणविणारे ‘निळे’ आणि फक्त मार्क्स म्हणणारे ‘डावे’ राजकारण यांच्या वैचारिक संघर्षात कसबे यांनी समन्वयाची भूमिका घेत समतोल साधला. ‘आंबेडकर आणि मार्क्स’ हा ग्रंथ त्यातूनच आल्याचे दिसते. त्यांना मार्क्सवादी ठरविण्याचेदेखील प्रयत्न झाले. सत्यशोधक मार्क्सवादाची भूमिका घेणारे शरद पाटील यांनीदेखील कसबे यांच्या भूमिकेची चिकित्सा केली आहे. ती वाचण्याजोगी आहे.पुरोगामी चळवळीत ताठर भूमिका घेऊन चळवळीचे नुकसान करणाऱ्यांना कसबे हे कायम अडचणीचे ठरले. गांधी-आंबेडकर यांच्या संबंधाबाबत चळवळीच्या कार्यकर्त्यांची अत्यंत कडवट भूमिका असताना कसबे हे तसा विचार कधीही करत नाहीत. उलट गांधीविरोधाने आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाल्याचे मत मांडतात. आक्रमक मांडणी हा त्यांच्या वक्तृत्वाचा गुणविशेष आहे. त्यांचे लेखन या वक्तृत्वाचे पुढचे उपयोजन आहे. झोत, डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, आंबेडकर आणि मार्क्स, आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार, देशीवाद समाज व साहित्य, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह, भक्ती आणि धम्म, मानव आणि धर्मचिंतन, हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदूराष्ट्रवाद या सर्व ग्रंथांची निर्मिती आणि त्यांचा कालावधी यांचा खूप निकटचा संबंध असून त्या-त्या काळात उपयुक्त राजकीय, वैचारिक भूमिका घेत त्यांनी या ग्रंथांचे लेखन केले.नाशिकच्या लोस्ली सोनी सेंटरमध्ये एका व्याख्यानातून त्यांचा मे. पुं. रेगे यांच्यासोबत झालेला जाहीर वाद अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या जातीची आडवी रचना पुरस्काराचा कसबे यांनी देशीवादाचा संदर्भ घेऊन मोठा प्रतिवाद केला. त्यांनी आयुष्यभर पुरोगामित्वाचा प्रसार आणि प्रचार केला. मात्र पुरोगामी म्हणवून घेणाºयांनाच कसबे पेलवले नाहीत.महाराष्ट्रात प्रथमच भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हा त्यांनी, ‘हे सरकार मराठेतर सवर्णांचे आणि महारेतर दलितांचे’ असल्याचे म्हटले. कसबे हे शिवशक्ती-भीमशक्तीचे पुरस्कर्ते असल्याचा अर्थ त्यातून काढला गेला. मात्र त्यांचे हे आकलन तटस्थ होते. शिवसेनेचे हिंदुत्व हे सरधोपट आहे आणि ते भाजप, विहिंपसारखे त्रिशूळासारखे टोकदार नाही हेही त्यांनी मांडले.चाचपडणाºया काळात धाडसी भूमिका घेणे, आपले खासगी सिद्धान्त मांडत मोठ्या प्रश्नाला भिडणे हे त्यांचे वैशिष्ट्य़ म्हणूनच लाखोंचे मराठा मोर्चे निघत असताना मराठा समाजातील सरंजामी घटक आणि त्यातील उतरंडीवर बोलत ओबीसी घटकांच्या हक्कासाठी कसबे मुलाखती देत होते. असे धाडस दाखविणारे विचारवंत विरळे आहेत. ते सरधोपट कार्यकर्तेगिरी करणारे विचारवंत नाहीत. डोळसपणे बघणे हा त्यांचा बाणा आहे. तत्त्वज्ञान मांडताना स्वजातीला गोंजारण्यात त्यांनी धन्यता मानलेली नाही. बाबरी पाडल्यानंतर मुस्लीम प्रश्नाची मांडणी करून इस्लामच्या परिवर्तनाची गरज त्यांनी प्रतिपादन करीत मुस्लिमांचे प्रबोधन आणि उत्थान यावर भर दिला. हे करताना त्यांनी सावरकरांच्या नवमतवादावर कोरडे ओढले. अनेक छोट्या-मोठ्या संमेलनांत कसबे हे प्रमुख पाहुणे म्हणून गेले. वैचारिक साहित्याप्रमाणेच ललित साहित्याशीही त्यांचा अनुबंध आहे. विखे पाटील साहित्य पुरस्कार निवडीत त्यांनी निवडलेल्या साहित्यकृतींना पुढे साहित्य अकादमी मिळाली. यातूनही त्यांचे आकलन व दूरदृष्टी दिसून येते.
‘झोत’ या ग्रंथाची चाळिशी आणि त्याचे लेखन करणाºया डॉ. रावसाहेब कसबे यांचा अमृतमहोत्सव असा दुहेरी कार्यक्रम आज संगमनेर (जि. अहमदनगर) येथे समाजवादी संमेलनात होत आहे.