आंदोलनकर्त्या तरुणांनी रस्त्यावर येऊन घोषणा सुरू केल्या.. लष्कराच्या अन्याय्य कृतीविरुद्ध बंड पुकारलं.. शेकडो लोक रस्त्यावर आले.. त्याबरोबर लष्करही सज्ज झालं आणि त्यांनी आंदोलनकारी तरुणांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. तेवढ्यात एक सिस्टर तिथे आल्या. लष्कराला एकट्यानं सामोऱ्या जाताना गुडघ्यावर बसून त्यांनी विनंती केली, कृपा करून या निरपराध मुलांना मारू नका, हवंतर त्याऐवजी मला गोळ्या घाला. माझा जीव घ्या... - ही घटना आहे म्यानमारमधली!
लष्कराच्या तुकडीसमोर हात फैलावून विनंती करणाऱ्या या सिस्टर आहेत एन रोस नु तवांग! त्यांच्या या धाडसाचं जगभरात केवळ कौतुकच होतं आहे. म्यानमारमध्ये लोकतांत्रिक पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला उलथवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. या दडपशाहीच्या निषेधार्थ हजारो लोक, विशेषत: तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
संपूर्ण म्यानमारमध्येच तीव्र असंतोष पसरला असून, आंदोलनाचा वणवा पेटला आहे. लष्कराची ही कृती जनतेला पसंत पडलेली नाही. पण, म्यानमारचे लष्करही (जुंटा) मागे हटण्यास तयार नाही. या घटनेचा जगभरातून निषेध होत असला तरी लष्कराने हे आंदोलन बळजबरीने दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
देशांत अनेक ठिकाणी त्यांनी मार्शल लॉ लागू केला आहे. त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे अधिकार लष्कराला मिळाले आहेत. लष्कराने ठिकठिकाणी नागरिकांची मुस्कटदाबी सुरू केली असून, हे आंदोलन अक्षरश: चिरडायला सुरुवात केली आहे. बळाचा वापर करताना लाठीमार, अश्रुधूर, पाण्याचा मारा, रबरी गोळ्या यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे; पण तरीही आंदोलन आटोक्यात येत नाही, म्हटल्यावर त्यांनी प्रत्यक्ष गोळीबारही सुरू केला आहे. त्यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
१ फेब्रुवारीला लष्करानं आँग सान सू की यांचं निर्वाचित सरकार उधळून लावताना सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि सू की यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक नेत्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबलं.म्यानमारमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित करावी आणि जनतेच्या हाती सत्ता द्यावी, असं तरुणांचं म्हणणं आहे. त्यासाठी म्यानमारमधील अनेक शहरांसह मितकाइना या शहरातही तरुणांचं आंदोलन सुरू होतं. त्या वेळी लष्करानं गोळीबार सुरू करताच सिस्टर एन रोस नु तवांग तेथे आल्या आणि त्यांनी लष्कराला गोळीबार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबतच्या आणखी दोन ननही या गोळीबाराला विरोध करण्यासाठी ठाम उभ्या राहिल्या.
सिस्टर एन रोस नु तवांग सांगतात, लष्कराचा गोळीबार आणि त्यात जखमी होणारे, मरण पावणारे निरपराध तरुण पाहून माझं मन हेलावून गेलं. मी तत्काळ पुढे गेले आणि गुडघ्यावर बसून असं न करण्याबाबत लष्कराला विनवणी केली. त्यांच्या प्राणासाठी अक्षरश: भिक्षा मागितली; पण ते बधले नाहीत. त्यांनी उलट माझ्या मागे असलेल्या तरुणांवर गोळीबार सुरू केला. घबराटीनं तरुणही सैरावैरा पळू लागले. माझ्यासमोरच एका तरुणाच्या डोक्यात गोळ्या घातल्या. रक्ताच्या थारोळ्यात तो माझ्या पुढे पडला. एकीकडे गोळीबार सुरू होता, तर दुसरीकडे अश्रुधुराचा मारा सुरू होता.
मी लष्करपुढे अक्षरश: हात जोडून विनवणी करीत होते, पण त्यांच्या काळजाला पाझर फुटला नाही. मी आणखी करू तरी काय शकत होते? मी फक्त परमेश्वराची करुणा भाकत होते, की हे परमेश्वरा, काहीही कर, पण विध्वंस थांबव. मरणाच्या दारात जाणाऱ्या या तरुणांना वाचव.. तेव्हा जे काही चाललं होतं, ते सगळंच इतकं भयानक होतं, की जगच जणू नष्ट होतंय असं मला वाटत होतं! काचीन हे म्यानमारचं सर्वांत उत्तरेकडील राज्य. अनेक वर्षांपासून वांशिक सशस्त्र गट आणि सैन्य यांच्यात तिथे संघर्ष सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील विस्थापित छावण्यांमध्ये हजारो लोक राहत आहेत तर काही घरं सोडून पळून गेले आहेत. काही ख्रिश्चन गट त्यांना मदत करीत आहेत.
सिस्टर एन रोस नु तवांग यांचं जगभरात कौतुक होत असलं तरी सशस्त्र लष्कराला सामोरं जाण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग नाही. याआधी २८ फेब्रुवारी रोजीही त्या लष्कराला अशाच निडरपणे सामोऱ्या गेल्या होत्या आणि गोळीबार करण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. सिस्टर एन रोस म्हणतात, “त्या दिवशीही गोळीबारात काही तरुण मरण पावले. ते भीषण दृश्य पाहून खरंतर त्याच दिवशी माझाही मृत्यू झाला असं मला वाटतं. पण, त्याच दिवशी मी ठरवलं, आता गप्प बसायचं नाही. काहीही झालं तरी लष्कराला विरोध करायचा!”
माझा प्राण गेला तरी बेहत्तर!
म्यानमारमध्ये लष्कराच्या गोळीबारात आतापर्यंत साठपेक्षा अधिक लोक मरण पावले आहेत. एकीकडे आंदोलन उग्र होत आहे, तर लष्कराची दडपशाहीदेखील वाढते आहे. सिस्टर एन रोस म्हणतात, मी हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. लष्कराला अडवताना भले माझा प्राण गेला तरी बेहत्तर!