नकोशींना संपविणाऱ्यांनाही हवी कठोर शिक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:02 AM2018-04-26T00:02:55+5:302018-04-26T00:02:55+5:30
कल्याणमधील उंबर्डे व बुलडाणातील कुंभेफळ या दोन्ही गावांमध्ये प्रत्यक्ष जन्मदात्यांनीच मुलींचा खून केला. या दोन्ही घटनांमध्ये ‘मुलगी नको’ हे सूत्र कायम आहे. आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये मुली अग्रसेर आहेत, परंतु अजूनही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही प्रवृत्ती मात्र कायम आहे.
राजेश शेगोकार|
अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केले गेलेल्या घटनांनी सध्या देशभर संतापाची लाट उसळल्याने केंद्र सरकारने बलात्काºयांना जरब बसेल, अशी पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने पॉक्सो कायद्यात दुरुस्ती केली असल्यामुळे आता १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाºयाला फाशीसारखी कठोर शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे या निर्णयाची चर्चा देशभर असताना दुसरीकडे केवळ मुलगी आहे म्हणून तिचा खून करून तिलाच संपविण्याचे प्रकार अजूनही सुरूच असल्याचे समोर आले आहे.
बुलडाण्यातील कुंभेफळ या गावात मुलगी नकोशी असणाºया जन्मदात्या बापाने चार वर्षाच्या मुलीला विहिरीत फेकून खून केल्याची घटना उजेडात आली आहे. विशेष म्हणजे, मला तीन मुली आहे, चौथा मुलगा झाला तो आजाराने मरण पावला. त्यामुळे मला मुलीबद्दल तिरस्कार आहे. त्यामुळे मी माझ्या मुलीला विहिरीत फेकून देऊन खून केला अशी कबुली खुद्द सिध्देश्वर सरोदे या बापानेच पोलिसांना दिली तर दुसरीकडे कल्याणमधील उंबर्डे या गावात अवघ्या सहा दिवसापूर्वीच जन्म घेतलेल्या मुलीची नख मारून जन्मदात्या आईने हत्या केल्याची घटना घडली. मुलीच्या हत्येप्रकरणी आई वैशाली प्रधानला अटक केली असून तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. दोन मुलानंतर नको असलेला गर्भ पाडण्यासाठी तिच्या सासूने दिलेले पैसे नवºयाने दारूच्या व्यसनात खर्च केले. त्यामुळे तिसरे अपत्य जन्माला आले व ती मुलगी असल्याने तिच्या भविष्याच्या चिंतेने वैशालीने मुलीच्या गळ्याला नख लावले.
बुलडाणा व कल्याणमधील या दोन्ही घटनांमध्ये ‘मुलगी नको’ हे समान सूत्र आहे. आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये मुली अग्रसेर आहेत, परंतु अजूनही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही प्रवृत्ती मात्र कायम आहे. त्यामुळेच नकोशींचा प्रश्न अजून संपलेला नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ज्या बुलडाण्यात हा प्रकार घडला त्याच बुलडाण्यात मुलींचा जन्मदर वाढला असल्याचे टिष्ट्वट खुद्द मुख्यमंत्र्यांनी ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधत केले होते. स्त्री-पुरुष गुणोत्तरामध्ये बीड, बुलडाणा हे दोन जिल्हे रेड झोनमध्ये होते. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शासन, सामाजिक संस्था, युवा मंडळे आदींनी पुढाकार घेत स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृती केली, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. बुलडाण्यात मुलींचा जन्मदर प्रति हजारी ९०८ होता तो ९३९ झाला तर बीडमध्ये ८९४ वरून ९२२ एवढी प्रगती झाली. अनेक डॉक्टरांनी कायद्यातील पळवाटा शोधत गर्भलिंग तपासणीचा गोरखधंदा सुरू केला त्यामुळे लाखो कळ्या उमलण्यापूर्वीच संपविण्यात आल्या. हे चित्र बदलविण्यासाठी सरकारी यंत्रणा, विविध संस्था यांचे प्रयत्न, लेक माझी, लेक वाचवा, बेटी बचाओ, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात केलेले प्रबोधन यामुळे बीड, बुलडाण्यात मुलींचा जन्मदर वाढला. ही बाब आनंदाचीच आहे. त्यामुळे आता नकोशींना नाकारणारी मानसिकता संपविण्याचे मोठे आव्हान आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण व प्रवास, तिच्या जन्माच्या स्वागतासाठी विविध योजना, लग्नासाठीही विविध योजना असे अनेक उपक्रम असतानाही मुलीच्या गळ्याला नख लावण्याची मानसिकता संपत नसेल तर आता अशा प्रकारांसाठीही कठोर शिक्षेची तरतूद करावी का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एवढे मात्र निश्चित !