- गुरुचरण दास(ख्यातनाम लेखक)२०११ सालच्या एप्रिल महिन्यात ‘अरब स्प्रिंग मूव्हमेंट’ने मला इजिप्तच्या भवितव्यासाठी भारतीय प्रारूप सादर करण्यासाठी बोलावले होते. त्यांनी मला ३ प्रश्न विचारले. १ तुम्ही सत्तेपासून लष्करशहांना कसे दूर ठेवता? २. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा पल्ला भारताने कसा गाठला? ३. या पृथ्वीतलावरील सर्वात वैविध्यपूर्ण अशा समाजात तुम्ही सलोखा कसा कायम ठेवता?- भारताच्या गेल्या ७५ वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी हे तीन मुद्दे उपयुक्त ठरतील. वसाहतोत्तर भारतात लोकशाही आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचे श्रेय नि:संशय जवाहरलाल नेहरूंना जाते. आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानला ‘देश असलेले लष्कर’ असे संबोधले जाते आणि भारताने मात्र आपली लोकशाही मूल्ये सांभाळली, हे फार महत्त्वाचे! दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अर्थातच ‘आर्थिक सुधारणा’ हे आहे. प्रारंभीच्या समाजवादी कालखंडानंतर १९९१ साली भारताने अखेर त्या दिशेने पावले उचलली. त्यानंतर प्रत्येक सरकारने या सुधारणा पुढे नेल्या. सुधारणांचा वेग मंद होता; तरीही जवळपास ५० कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर सरकले. मध्यमवर्गाचाही जलद गतीने विकास झाला. गेल्या तीन दशकातला सुधारणांचा वेग कायम राखता आला तरी स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवात या देशातील अफाट लोकसंख्या सुखासमाधानाने नांदत असेल.
आदर्शवादी नेहरूंच्या समाजवादी अर्थव्यवस्थेच्या पोटात लाल फीतवाली नोकरशाही बळकट होत गेली. त्यातून परवाना राजची दहशत पसरली. त्याचा मोठा दोष नेहरूंकडे जात नाही, हे खरे. मात्र, जपान, कोरिया, तैवान यांनी कितीतरी आधी मार्ग दाखवूनसुद्धा बदल न केल्याबद्दल इंदिरा गांधी खचितच दोषी ठरतात. त्यांनी गरिबी हटावच्या नावाखाली राज्य केले; पण गरिबी काही हटली नाही. आपल्याकडच्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीबद्दल अरबस्थानातील तरुणांना हेवा वाटतो; पण ही क्रांती दोन कारणांनी झाली. एक म्हणजे सॉफ्टवेअर अदृश्य होते. ‘परवाना राज’च्या कचाट्यातून सुटून ग्राहकाच्या संगणकावर टेलिफोन तारांच्या माध्यमातून ते उतरले. नासकॉम नावाची एक वेगळीच संस्था आणि काही दुर्मीळ सरकारी अधिकारी यांच्या अनोख्या सहकार्यातून हे घडले. या धुरिणांनी अत्यंत शांतपणे लाल फीत बाजूला केली, संधी खुल्या केल्या आणि बाल्यावस्थेत असलेल्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाला वैभवाप्रत नेले.‘अरब स्प्रिंग’ला मूलतत्त्ववादी इस्लामची वाटत असलेली भीती इजिप्शियनांच्या तिसऱ्या प्रश्नातून समोर येते. त्यांच्याकडे १२ टक्के ख्रिश्चन असून, त्यांना सुरक्षित वाटत नाही, असे सांगण्यात आले. त्या दिवशी मला योग्य असे उत्तर देता आले नाही; पण त्यांच्या प्रश्नामुळे मी विचारात पडलो. भारताला असलेला धोका पाकिस्तान किंवा चीनकडून नाही, तो आतूनच आहे, हे त्या प्रश्नाने अधोरेखितच केले होते.
- अर्थात, ‘अरब स्प्रिंग’चे लोक आज तोच प्रश्न विचारतील, असे मला वाटत नाही. कारण भारतातल्या सामान्य मुस्लिमांना हल्ली सुरक्षित वाटेनासे झाले आहे आणि तरीही ७५ वर्षांनंतर अभिमान वाटावा, असे भारताकडे पुष्कळ काही आहे. देशाचे तुकडे होतील, अशी भाकिते वर्तवली जाऊनही आपण एकसंध राहिलो. पूर्वी नव्हतो इतके आपण आज ठाम आणि आशावादी आहोत. सामान्य आयुमर्यादा ३२ वरून ७० वर्षांपर्यंत गेली आहे. साक्षरतेचे प्रमाण १२ वरून ७८ टक्के झाले आहे. १९९५ साली ५० टक्के घरात वीज होती. २०११ साली हे प्रमाण ९० टक्क्यांवर आले. आणखीही पुष्कळ काही सांगता येईल. इतर देशांच्या तुलनेत भारत पुष्कळच स्थिर देश आहे. आगामी वर्षात जागतिक वाढीत भारताचा वाटा मोठा असेल, असा अंदाज अर्थशास्त्री व्यक्त करत आहेत. असे असले तरी भारताला यापेक्षा जास्त काही करता आले असते. दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा आपण देऊ शकलेलो नाही. त्यासाठी पैसे नव्हते असे नाही तर कारभार धड नव्हता. दोन तृतीयांश कच्चे कैदी खटला उभा राहण्याची वाट पाहत तुरुंगात का खितपत पडतात?
सामान्य नागरिकांना जवळच्या पोलीस ठाण्यावर जायची भीती का वाटते? देशातल्या एक तृतीयांश खासदार आणि आमदारांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाचे खटले का असतात? अत्यंत कार्यक्षम नोकरशहाला बढती मिळते, त्याच दिवशी अकार्यक्षम अधिकारीही ती कशी मिळवतो? - खासगी क्षेत्रातील यशाची आणि सार्वजनिक क्षेत्रातील अपयशाची कडू-गोड कहाणी हेच ७५ वर्षांच्या भारताचे सत्य आहे.