परंपरेचीच परंपरा मोडण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 03:09 AM2018-10-22T03:09:13+5:302018-10-22T03:09:28+5:30
शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून सध्या देशात बराच वादंग माजला आहे.
- डॉ. सुभाष देसाई
शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून सध्या देशात बराच वादंग माजला आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश करण्याची मुभा देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागतही होत आहे आणि दुसरीकडे परंपरेच्या नावाखाली महिलांच्या प्रवेशबंदीचे समर्थनही होत आहे. या पार्श्वभूमीवर आता अशा इतर अनेक परंपरा नेमक्या कशा निर्माण झाल्या आणि कालौघात त्या बदलल्या पाहिजेत का, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. रूढी, परंपरा आपणच तयार करतो, मग आपणच त्या बदलू शकत नाही का?
भारतीय संस्कृती म्हटले की, उपवेद, ब्राह्मणग्रंथ, सूत्रग्रंथ आणि उपनिषदे आणि या सर्वांच्या प्रारंभी ब्रह्मसूत्र व वेद यांचा विचार होतो. या पाठांतरीत ज्ञानाला शिस्त लावून एका चौकटीत सादर करण्याचा प्रयत्न मनू, याज्ञवलक्य यांनी स्मृतिग्रंथातून केले. त्या चिंतन, मननातून रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये, महाकथांची निर्मिती झाली. अर्थात, तो काही
इतिहास नव्हे. एकाच वैदिक संस्कृतीच्या या शाखा आहेत.
मॅक्समूलरच्या काळी कार्लाईल, रस्किन, किंग क्ले या इंग्लिश तत्त्वज्ञानी मंडळींनी व स्वामी विवेकानंद, दयानंद, योगानंद, थिआॅसॉफिकल स्कूलच्या डॉ. अॅनी बेझंट या मंडळींनी धर्मातील, जातीतील समाजकल्याण कल्पनेचा पुरस्कार केला.
चार वेदांपैकी ऋग्वेदाचा विचार केला, तर त्यात एकूण १0 मंडले, १0२८ सूक्तसंख्या, ऋचा संख्या १0५५२ इतकी आहे. हा ग्रंथ स्फूट कवनांच्या संग्रहाचा आहे. ऋचा म्हणजे मंत्र. अध्याय म्हणजे सूक्त आणि मंडल म्हणजे विभाग. ऋग्वेदातील विविध सूक्त अभ्यासली, तर अग्निसूक्तापासून रोगविज्ञानसूक्त, श्रीसूक्त या साऱ्या अध्यायातून भौतिक सुखसमृद्धीची मांडणी केली आहे. यम-नचिकेता संवाद यात आहे तोच पुढे कठोपनिषदात दिसतो. गीता, महाभारत यांच्या रचनेमागे ऋग्वेदातील चिंतनाचा मोठा आधार आहे.
काळाच्या ओघात वेदातील काही अध्याय नष्टही झाले, परंतु हिंदू धर्मावरील कलंक असे जग मानते, त्या चातुवर्ण्याचा उगम ऋग्वेदातील पुरुषसूक्त दशममंडलात येते. वैदिक साहित्यात हे पुन:पुन्हा वापरले जाते. यजुर्वेदात, अथर्ववेदात १९.६, कठोपनिषदात ३.११ भागवतात १0.१,२0,११,२७,३१ यात हे वापरले आहे. भगवद्गीतेतही ४.२५ याचा पुनरुच्चार आहे. काळाच्या ओघात ही मांडणी पुसली गेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने समतेचा पुरस्कार केला आहे.
घटनेच्या कलम १४ ची पायमल्ली समान संधी नाकारल्याने होते. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा राहणार नाही. कलम १५(४) याची जबाबदारी सरकारची आहे, पण कोणी काय खावे, प्यावे, गावे, लिहावे, बोलावे यावर बंधने लादणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणेच होय. ‘सबका साथ सबका विकास’ हे भ्रमजाळच ठरते आहे.
आज अमेरिकेत वांशिकवादाने घेतलेले उग्र स्वरूप भारतात नको असेल, तर धर्म मानणाºया सरकारने ‘हिंदू राष्ट्र, संघप्रणित विचारसरणी सोडावी. घटना बदलण्याचा अट्टाहास सोडावा. वर्णवर्चस्ववादी वृत्ती सोडावी. गुण्यागोविंदाने जगू द्यावे. मग खरे रामराज्य येईल तो सुदिन.
(धर्म आणि विज्ञानाचे अभ्यासक)