वृक्ष गायब; अभियानाचा वाजला बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 04:21 PM2019-02-08T16:21:30+5:302019-02-08T16:23:26+5:30
मिलिंद कुलकर्णी शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बिगुल पुन्हा वाजला आहे. नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाने किती ...
मिलिंद कुलकर्णी
शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बिगुल पुन्हा वाजला आहे. नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाने किती झाडे लावायची, हे निश्चित करण्यात आले आहे. शासकीय बैठकीला उपचार आटोपला. वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्या. विषय संपला.
परंतु चार वर्षापासून ही मोहिम राबविण्यात येत असताना त्याचा त्रयस्थ संस्थेमार्फत ताळेबंद मांडण्यात आला काय? चार वर्षात किती झाडे लावली, किती जगली, त्यासाठी किती खर्च झाला. पर्यावरणात काही सकारात्मक बदल झाला काय, याचा हिशोब ठेवला काय? असे घडले असेल तर जगजाहीर करायला हवे. जनतेकडून त्याची खातरजमा करायला हवी. तर खऱ्या अर्थाने हे काम विश्वसनीयरीत्या आणि पारदर्शकपद्धतीने होत असल्याची जनसामान्यांची खात्री पटेल. अन्यथा हिवताप प्रतिबंधक अभियान, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण या सारख्या शासकीय अभियानांसारखी स्थिती वृक्षारोपण मोहिमेची होईल.
गेल्या वर्षी खड्डे आणि त्याचा हिशोब ठेवण्याचा प्रयत्न झाला. फोटो काढून पाठविण्याची सक्ती झाली. परंतु, त्याच त्या खड्डयांमध्ये दरवर्षी नव्याने रोपे लावली जात आहेत. ना कुठे गांभीर्य, ना कुठे तळमळ. केवळ उद्ष्टि पूर्ण करण्याची धावपळ असेच या मोहिमेचे वास्तव चित्र राहिले. अर्थात शासन आणि प्रशासन हे वास्तव स्विकारणार नाहीच. कागदावर रंगविलेले आकडे आणि कागदावर झालेल्या वृक्षारोपणाची आकडेवारी देऊन ‘शतकोटी अभियान’ १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला जाईल.
जनतेला केवळ खोदलेले खड्डे दिसतात, पावसाळ्यात लावलेल्या रोपांच्या काड्या दिसतात, त्यांच्याभोवती केलेले वेगवेगळ्या प्रकारचे कुंपण दिसते, पण पुढे चित्र बदलते. पाण्याअभावी रोप जळते, कुंपणाच्या वस्तू गायब होतात. आणि खड्डा शाश्वत बनून राहतो, पुढच्या वृक्षारोपणाची वाट पाहत...
नवीन वृक्षलागवड अभियानाची अशी दारुण परिस्थिती असताना अस्तित्वात असलेली वृक्षराजी सांभाळण्याचे, जपण्याचे कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाही. विकासाच्या नावाखाली पहिली कुºहाड ही जुन्या, डेरेदार वृक्षांवर पडत आहे. खान्देशात रस्त्यांची कामे सध्या सुरु आहे. राज्य मार्ग आणि राष्टÑीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्याने त्यात आड येणाºया हजारो वृक्षांवर सर्रास कुºहाड चालविली गेली. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर काही पटींनी झाडे लावण्याचे संबंधित विभाग आणि कंत्राटदारावर बंधन असते. परंतु, असे कोठेही झाल्याचे चित्र अद्याप दिसून आलेले नाही. नवापूर ते धुळे या महामार्गाचे काम बºयापैकी पूर्ण झालेले आहे. पण त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षलागवड थातूरमातूर केली गेली आहे. धरणगाव ते अमळनेर रस्त्यावरील म्हसले गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा घनदाट असलेली वृक्षराजी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आली. तब्बल ४ हजार झाडे तोडण्यात येणार आहे. कुठल्या जंगलात आल्यासारखी ही वृक्षराजी होती. आता ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यावर बांधकाम विभाग वृक्षतोडीचा पुनर्विचार करणार आहे.
जळगाव ते औरंगाबाद, फागणे ते जळगाव या मार्गावरील झाडे तोडून मोठा कालावधी लोटला. रस्त्यांची कामे तर बंद पडली, पण झाडे गायब झाली. पर्यावरणावर झालेला परिणाम, पर्जन्यमान आणि तापमानाविषयी निर्माण झालेली अनिश्चितीता हे दृष्य परिणाम आम्ही लक्षात घेत नाही. कधी आम्हाला गांभीर्य येणार आहे , कळायला मार्ग नाही.