महात्माजींचे रामराज्य प्रत्यक्षात आणण्यासाठी झटू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 03:16 AM2017-10-04T03:16:35+5:302017-10-04T03:17:17+5:30

संपूर्ण देशाने २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधींची जयंती साजरी करून त्यांना आदरांजली वाहिली. या जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी दारिद्र्य, भ्रष्टाचार, निरक्षरता, जातीवाद, काळा पैसा, लिंगभेद, दुर्बल घटकांवर

Try to bring Mahatmaji to the realm of Ramrajya | महात्माजींचे रामराज्य प्रत्यक्षात आणण्यासाठी झटू या

महात्माजींचे रामराज्य प्रत्यक्षात आणण्यासाठी झटू या

Next

एम. व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती
संपूर्ण देशाने २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधींची जयंती साजरी करून त्यांना आदरांजली वाहिली. या जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी दारिद्र्य, भ्रष्टाचार, निरक्षरता, जातीवाद, काळा पैसा, लिंगभेद, दुर्बल घटकांवर अत्याचार आणि अस्वच्छता यांच्या विरोधात लढा देण्याचा संकल्प केला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊनही ही सर्व दुष्कृत्ये देशाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील रामराज्याची निर्मिती करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत.
महात्मा गांधीजींचे विचार शाश्वत आहेत. त्यांची रामराज्याची संकल्पना नीट समजून घ्यायला हवी आणि त्यांच्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी आणि नागरिकांनी झटायला हवे.
‘‘माझ्या रामराज्यात राजापासून रंकापर्यंत सर्वांना समान हक्क असतील.’’ असे महात्माजी म्हणत. ‘‘काही लोक ऐश्वर्यात लोळत आहेत तर सामान्य जनतेला खायला पुरेसे अन्नही मिळत नाही अशा स्थितीत रामराज्य अस्तित्वात येऊ शकत नाही.’’ देशातील २२ टक्के जनता सध्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असताना सर्व सरकारांनी आणि खासगी संघटनांनी सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. दारिद्र्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांना योग्य शिक्षण देण्याची गरज आहे. महात्माजी म्हणत, ‘‘माझ्या कल्पनेतील स्वराज्य हे गरीब माणसाचे स्वराज्य आहे. श्रीमंतांना ज्या सुखसोयी उपभोगता येतात, त्या सुखसोयी गरीब जनतेलासुद्धा उपभोगता आल्या पाहिजेत. याचा अर्थ त्यांनीही राजवाड्यात राहावे असा होत नाही. पण प्रत्येक व्यक्तीला सर्वसामान्य सुखसोयींचा लाभ झाला पाहिजे. तो होईल तेव्हाच संपूर्ण स्वराज्य लाभले असे मी म्हणेन.’’
गांधीजी असेही म्हणत, ‘‘आपण सुसंस्कृत झाल्याशिवाय आपले स्वराज्य निरर्थक आहे. आपण नैतिकतेला जीवनात सर्वोच्च स्थान द्यायला हवे. प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या जीवनात प्रामाणिकपणा आणि उच्च नैतिक मूल्ये जोपासली पाहिजेत. पालकांनी आणि शिक्षकांनी बालवयापासूनच मुलांचा नैतिक पाया मजबूत केला पाहिजे. साक्षर होणे म्हणजे शिक्षण घेणे नव्हे. शिक्षणाने जीवनात जे जे चांगले आहे त्याच्याशी व्यक्ती जोडली गेली पाहिजे.’’
अशा स्थितीत महात्मा गांधींना अभिवादन करणे म्हणजे त्यांचे विचार अमलात आणणे होय. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा जीवनातील स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे, हे त्यांचे विचार त्यांची स्वच्छतेविषयीची दृष्टी दर्शवितात. या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियान ही जनतेची चळवळ होत आहे याचा मला आनंद होत आहे. महात्माजींची १५० वी जयंती जेव्हा आपण साजरी करू तेव्हा सारा भारत स्वच्छ झालेला असायला हवा. त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाने निर्धार केला पाहिजे.
आज वैज्ञानिक प्रगतीमुळे सारे जग जवळ येत असताना काही माणसे धर्माच्या आधारे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक धर्माचा उपयोग शांततामय सहजीवनासाठी व्हायला हवा. धार्मिक कट्टरवादाला जीवनात थारा देता कामा नये.
महात्माजी म्हणत, ‘‘धर्मातील उच्च तत्त्वांचा पुरस्कार करण्यासाठी धर्माचा उपयोग व्हायला हवा. इतरांच्या विचारसरणीशी संघर्ष करण्यासाठी धर्माचा वापर होता कामा नये. खरा धर्म लोकांची सेवा करण्याची शिकवण देत असतो. सर्वांशी मैत्री करण्याची शिकवण माझ्या आईच्या कुशीतून मला मिळाली आहे.’’
शांतता राखल्याशिवाय प्रगती आणि समृद्धी संपादन करणे शक्य होत नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन सर्व माओवाद्यांना आणि नक्षलवादी चळवळीतील लोकांना माझे आवाहन आहे की त्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवावीत आणि देशाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे.
महात्माजी म्हणत, ‘‘मानवाच्या हातात अहिंसेची फार मोठी शक्ती आहे. विध्वंसासाठी वापरल्या जाणाºया सर्वात महान शस्त्रापेक्षाही अहिंसेची ताकद फार मोठी आहे.’’ त्यांचे हे विचारच देशाला शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतील, असा मला विश्वास वाटतो.

(editorial@lokmat.com)

Web Title: Try to bring Mahatmaji to the realm of Ramrajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.