‘आयुष्याची सारवट गाडी वंगण जास्त झालं म्हणून वेगाने पळाली नाही आणि कमी पडलं म्हणून कुरकुरली नाही. खाण्यापेक्षा उदरभरण हाच स्वच्छ हेतू.’ पु.लं.च्या अंतू बर्व्याचे तत्त्वज्ञान. मी घाटावरचा. त्यामुळे सारवट गाडी पाहिली नाही तर कळणार कशी? आयुष्याची गाडी मात्र थोडी थोडी समजू लागली आहे. कधी संथ तर कधी वेगाने धावते आहे. वेग वाढला की आपणच म्हणायचे ‘धीरे धीरे हाक गाडी धीरे धीरे हाक.’ जीवनाच्या या गाडीने अनेक वळणे पाहिली आणि पारसुद्धा केली. पुढे धोकादायक वळण आहे, सावधान! कित्येकदा तर प्रवासात वेडीवाकडी वळणे अशा पाट्या अनेक ठिकाणी पाहायला मिळाल्या. विशेषत: घाटाच्या प्रवासात. वाकडी वळणे एकवेळ ठीक आहे. पण वेडी वळणाचे गणित अद्याप सुटलेले नाही. खरे तर, प्रत्येक वळण वेगळे. बालपणी वळणावरचा प्रवास मजेचा होई. तारुण्यात तर वळणे बेदरकारपणे पार केली. जराही डगमगलो नाही. अंगात जोम होता. उन्मादाचा कैफ होता. किती वेगाने जीवनगाडी धावली ते कळलेच नाही. मोठ्या कौशल्याने सारी वळणे पार केली. अगदी नागमोडीसुद्धा. वळणावरची शोभा काही औरच. डोंगर दिसले, कडे कपारी दिसल्या, हिरवी वनराई पाहिली, क्षणाक्षणाला बदलणारे आकाशाचे मनविभोर रंगही पाहिले. लोक म्हणतात, ‘जशी दृष्टी तशी सृष्टी.’ सृष्टीला नावे ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाही. काही काळ तर एकही वळण लागले नाही. सारे काही तेच ते असे सपाट प्रदेशातून जाताना जाणवले. वाटे वळणे हवीतच कशाला? प्रत्येक वळणावरती दृश्य बदलते. नवे वळण-नवा अनुभव. अनुभवाची शिदोरी जवळ असली म्हणजे ज्येष्ठत्वाचा अधिकारही लोक आपसूकच मान्य करतात. वसंत बापटांच्या ‘दख्खनची राणी कवितेमधील छोटी बालिका ‘निसर्ग नटला बाहेर घाटात, असे आईला सांगते तेव्हा म्हणाली ‘‘आई, पुरे गं बाई!’’ अशी त्या बालिकेला गप्प करते. निसर्गाकडे तर आपण पाठच फिरविली आहे. प्रत्येकाच्या जीवनात वळणावळणावर एक आठवण साठवण बनून राहिलेली असते. ही वळणे आयुष्याची दिशा बदलून टाकतात. अखेरचे वळण मात्र अंतिम प्रवास सुखदायी करणारे ठरो.आरती प्रभूंच्या शब्दात-‘‘अखेरच्या वळणावर यावामंद सुगंधी असा फुलोराथकले पाऊल सहज उठावेआणि सरावा प्रवास सारा’’
वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:37 AM