वैशाख वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:17 AM2018-05-07T00:17:27+5:302018-05-07T00:17:27+5:30
वैशाख मासामध्ये सूर्य अधिकच तेजानं तळपतो. त्याची किरणं प्रखर होतात. किरणांची प्रखरता सहन होत नाही. पशु झाडांच्या छायेत बसतात. पक्षी घरट्याचा आश्रय घेतात. सर्वत्र उन्हाचा तडाखा, मारा यामुळे जीव हैराण होतात. माथ्यावर छाया शोधतात. तेजस तत्त्वाचं आधिक्य समस्त जीवांना होरपळून काढतं. सूर्याकडे मान वर करून बघता येत नाही. सकल सृष्टीवर वैशाख वणवा पेटतो.
- कौमुदी गोडबोले
वैशाख मासामध्ये सूर्य अधिकच तेजानं तळपतो. त्याची किरणं प्रखर होतात. किरणांची प्रखरता सहन होत नाही. पशु झाडांच्या छायेत बसतात. पक्षी घरट्याचा आश्रय घेतात. सर्वत्र उन्हाचा तडाखा, मारा यामुळे जीव हैराण होतात. माथ्यावर छाया शोधतात. तेजस तत्त्वाचं आधिक्य समस्त जीवांना होरपळून काढतं. सूर्याकडे मान वर करून बघता येत नाही. सकल सृष्टीवर वैशाख वणवा पेटतो. अंगाची आग होऊन थंडावा हवाहवासा वाटतो. थंडगार जलाच्या सान्निध्यात राहावंसं वाटतं. तृष्णेनं जीव त्रस्त होतो. अशा वेळेला सरिता, विहिरी यांचं महत्त्वं अधिकच जाणवू लागतं.
तेजस तत्त्वाचा तडाखा सृष्टीला सोसेनासा होतो. जल तत्त्वाचं प्रमाण अत्यंत कमी झालं की जीव घाबरा होतो. पशु पक्षी, माणसं अस्वस्थ होतात. सरिता रोडावतात तर विहिरी कोरड्या पडतात. पाण्याचं दुर्भिक्ष्य, दुष्काळ पडतो. पृथ्वी भेगाळते. वृक्ष, वेली निष्पर्ण होतात. ओसाड, उजाड माळरानावर पाणी नाही आणि वृक्षदेखील नाहीत. तेजस तत्त्व वाढलं की जल तत्त्व क्षीण होतं. याचा परिणाम पृथ्वी तत्त्वावर होतो आणि ओघानं पंचमहाभूतांनी तयार झालेल्या जीवांवर होतो.
योग्य प्रमाण समतोल साधते तर विषम प्रमाण असमतोल निर्माण करते. सकल सृष्टीचा समतोल साधण्यासाठी मानवानं हव्यास सोडायला हवा. जंगलाचा, वृक्ष लावण्याचा ध्यास लागायला हवा. निसर्गाला सखा, सोबती मानणाऱ्या संतांच्या दृष्टीचं कौतुक वाटतं. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असं तुकाराम महाराजांना वाटतं. यामधून वृक्षांविषयी जिव्हाळा, प्रेम दिसून येतं. त्याचप्रमाणे समत्व वृत्ती लक्षात येते. पृथ्वी तत्त्व व्यवस्थित राहिलं तर माणसाचं जीवन सुरळीत चालेल. सूर्योपासना करून सूर्याला विनंती करायची, प्रार्थना करायची. त्याची दाहकता सीमा पार करून जाऊ नये. जलपूजन करून जलाला, सरितांना जीव जगवण्याची कळवळून प्रार्थना करायची. पृथ्वीचं पूजन, भूमी पूजन करायचं!
देवाच्या पूजेमधून अनेक गोष्टी साधलेल्या आहेत. ऋषी, मुनींनी प्रयोग करून पूजनाची प्रथा, परंपरा निर्माण केली. त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं. सृष्टीचा समतोल साधणाºया संस्कृतीचं वैशिष्ट्य लक्षात येतं. संस्कृतीच्या संवर्धनामध्ये मानवाचं हित सामावलेलं आहे. नाहीतर वैशाख वणव्याची प्रखरता वाढत जाऊन विनाश अटळ आहे. आपण कशाचा अंगीकार करायचा ते आपल्याच हातात आहे.