वेध - कोल्हापूरच्या दूध उत्पादकांचा सन्मान

By admin | Published: January 13, 2017 12:14 AM2017-01-13T00:14:36+5:302017-01-13T00:14:36+5:30

गत आठवड्यात इंडियन डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे सुपुत्र अरुण नरके यांची निवड झाली आहे.

Veedha - Honoring the Milk Producers of Kolhapur | वेध - कोल्हापूरच्या दूध उत्पादकांचा सन्मान

वेध - कोल्हापूरच्या दूध उत्पादकांचा सन्मान

Next

गत आठवड्यात इंडियन डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे सुपुत्र अरुण नरके यांची निवड झाली आहे. स्वत: कृषी द्विपदवीधर आणि गेली पन्नास वर्षे उत्तम शेती करणारे एक प्रयोगशील शेतकरी असलेले अरुण नरके कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक शेतकरी संघात सलग चाळीस वर्षे संचालक आहेत.

देशातील दुग्ध व्यवसायाचे धोरण ठरविण्यासाठी स्वातंत्र्याबरोबर १९४८ मध्ये इंडियन डेअरी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. खासगी, सहकारी, शासकीय, आदी सर्व क्षेत्रात चालणाऱ्या दुग्ध व्यवसायासंबंधी विचार करणारी ही दुग्ध व्यवसायातील शिखर संस्था आहे. या संस्थेच्या व्यासपीठावरून होणाऱ्या विचारमंथनातून देशाचे दुग्ध धोरण ठरते. या संस्थेवर देशातील अनेक मान्यवर प्रशासक, संशोधक, संघटक, दुग्ध व्यावसायिकांनी काम केले आहे. गत आठवड्यात या शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे सुपुत्र अरुण नरके यांची निवड झाली आहे.
सहकारी साखर कारखानदारीत अत्यंत पारदर्शी कारभार करून नवा पायंडा पाडणारे डी. सी. नरके यांचे ते चिरंजीव. स्वत: कृषी द्विपदवीधर आणि नोकरी न करता गेली पन्नास वर्षे उत्तम शेती करणारे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. सहकारी चळवळीत केवळ शेतकरी वर्गाच्या उद्धारासाठी काम करण्याचे व्रत अंगी बाळगून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक शेतकरी संघात सलग चाळीस वर्षे संचालक म्हणून काम करीत आहेत. या संघाचे दूध ‘गोकुळ’ या ब्रॅँडखाली विकले जाते. हा संघ उभा करण्यात आणि शेतकरी कुटुंबाचा आधारवड करण्यात अरुण नरके यांचे योगदान फार मोठे आहे. या दूध संघाची आताची उलाढाल १५०० कोटी रुपयांची आहे. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीतील सर्वांत मोठा यशस्वी आणि दर्जेदार दूध तसेच दुग्ध पदार्थांचे उत्पादन करणारा संघ आहे. कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घालणारा ब्रॅँड असा ‘गोकुळ’चा नावलौकिक आहेच, पण हजारो छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य निर्माण करून देण्यात या संघाचे योगदान मोलाचे आहे. अरुण नरके यांनी प्रारंभीच्या काळी पहिले संस्थापक अध्यक्ष कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या सोबतीने संघाचे काम सुरू केले. आपल्या दहा वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत संघाचा विस्तार केलाच, शिवाय कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या या दूध व्यवसायाला एक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जोड देऊन हा व्यवसाय सामान्य शेतकऱ्यांसाठीच करण्याचा यशस्वी प्रयोग केला. आपल्या देशात गुजरातच्या ‘अमूल’च्या यशाची गाथा सांगितली जाते. त्याचे नेतृत्व कै. व्हर्गिस कुरियन यांनी केले होते. त्यांचाच आदर्श समोर ठेवून हा व्यवसाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी करायचा, असा निर्धार करून असंख्य प्रकल्प अरुण नरके यांनी राबविले. विशेष म्हणजे म्हशींच्या दुधाचे उत्पादन कोल्हापूर जिल्हा तसेच सीमाभागातील शेतकरी महिलाच मोठ्या प्रमाणात करतात. पहाटेपासूनच गोठ्यात जाऊन ते डेअरीपर्यंत दूध पाठवून देण्यापर्यंत या महिलांचे मोठे कष्ट असतात. त्यामुळे या दुधाचे पैसे या महिलांच्या हाती पडावेत, जेणेकरून त्या आपला संसार अधिक नेटका चालविण्यासाठी वापरू शकतील, असा अभिनव प्रयोग त्यांनी केला. त्यामुळे दुधाचे पैसे उडविणाऱ्या पुरुषांना चाप लावण्यात आला. या महिलांना स्वत:च्या घरातील गोठ्यापासून दूध संघाच्या कारखान्यापर्यंतची प्रक्रिया समजावून सांगितली. त्यांना दूध संघात निमंत्रित करून, हा तुमचा संघ आहे, तो कसा चालतो याचे प्रशिक्षणच त्यांनी महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात दिले.
अरुण नरके यांनी आपल्या देशातील दूध व्यवसायाचा खूप बारकाईने अभ्यास केला आहे. शासनाची धोरणं, दुग्ध व्यवसायातील स्पर्धा, चढ-उतार, नवे तंत्रज्ञान तसेच आव्हाने याचा सातत्याने ते अभ्यास करतात. सहकार क्षेत्रातील दुग्ध व्यवसाय चालविण्यासाठी कोणती दक्षता घ्यायला हवी, याचे चिंतन ते नेहमीच करीत असतात. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत हा दुग्ध व्यवसाय सहकार क्षेत्रात यशस्वी का झाला नाही, धोरणे कशी चुकत गेली, त्याचवेळी गोकुळ दूध संघाने कशी पावले टाकली, याचे ते उत्तम अभ्यासक आहेत. व्ही. कुरियन आणि अमृता पटेल या ‘अमूल’च्या यशस्वी प्रयोगशील व्यक्तिमत्त्वांच्या सातत्याने संपर्कात राहून जागतिक दुग्ध व्यवसायाचा अभ्यास त्यांनी कायम केला.
- वसंत भोसले

Web Title: Veedha - Honoring the Milk Producers of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.