देशातील बँकांना हजारो कोटींनी गंडवून विदेशात पळालेली माणसे तेथे चैनीत कशी राहतात? विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, चोक्सी या साऱ्यांनी देशाला एक लाख कोटी रुपयांचा गंडा घातला. त्यांच्या त्या कारवाया सरकारातील मंत्र्यांच्या डोळ्यासमोर होत होत्या. त्यातील काहींनी विदेशात पळताना मंत्र्यांची भेट घेऊन तशी परवानगीही मिळविली. मल्ल्याला जेटलींनी तर ललित मोदीला सुषमा स्वराज यांनी तशी परवानगी दिली. ही माणसे प्रचंड मालमत्ता व संपत्ती घेऊन भारतीय विमानांनी विदेशात गेली. त्यांना परत आणण्याच्या सरकारी वल्गना देश ऐकत आला आणि त्या ऐकून तो आता कंटाळलाही आहे. आपला दयाळू व विस्मरणशील समाज एक दिवस या बड्या चोरांना व त्यांना साथ देणाऱ्या साऱ्यांना विसरूनही जाईल आणि पुन्हा जैसे थे ही स्थिती उत्पन्न होईल.मल्ल्या इंग्लंडच्या राणीच्या यजमानांसोबत गोल्फ खेळत होता. ललित मोदी भारतीय पासपोर्टचा वापर करून जगभरच्या देशांना भेटी देतो. नीरव मोदी लंडनमध्ये हिऱ्यांचा व्यापार करतो आणि भारताचे मजबूत सरकार त्यांना ‘कधीतरी पकडूच’ अशी आशाच काय ती लोकांना दाखविते. ज्यांना घरातले चोर पकडता येत नाही ते बाहेर पळालेले चोर कसे पकडतील, हा दयाळू प्रश्न आपल्यापैकी अनेकांना अशा वेळी पडेल. संरक्षण खात्यातील महत्त्वाची कागदपत्रे चोर पळवितात व पुन्हा जागच्या जागी आणून ठेवतात आणि सरकारला त्याचा अखेरपर्यंत पत्ता लागत नाही हे उदाहरण मोदींच्या डोळस सरकारचे आहे. राफेल विमानांबाबतची ही कागदपत्रे ‘चोरांनी नेली व त्यांनीच ती आणूनही ठेवली’ असे देशाचा अॅटर्नी जनरल सर्वोच्च न्यायालयात शपथेवर सांगत असेल तर त्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती? प्रत्यक्ष संरक्षण खात्याचे रक्षण ज्यांना करता येत नाही, त्यांच्यावर देशाच्या संरक्षणासाठी तरी विश्वास कसा ठेवायचा? नरेंद्र मोदी निर्मला सीतारामन यांच्याखेरीज कोणत्याही जाणकार व्यक्तीला त्या पदावर आणत नाहीत. या संवेदनशील मुद्द्यावर पर्रीकर गप्प राहतात, निर्मलाबाई प्रश्नांची नेमकी उत्तरे टाळतात आणि नरेंद्र मोदी त्यांच्या सवयीप्रमाणे काहीएक बोलत नाहीत. त्यांचे भक्त मात्र सोशल मीडियावर त्यांना प्रश्न विचारणाºयांची ‘आई-बहीण’ काढत असतात. आपल्या सुसंस्कृत व प्राचीन देशातील परंपराभिमानी पक्षाला हे चालतही असते. मल्ल्याला पकडत नाहीत ते दाभोलकरांच्या खुन्यांना कसे पकडणार? ज्यांना नीरव मोदीला देशात आणता येत नाही ते अझहर मसूदला हात कसे लावणार? पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे मारेकरी तर देशातच आहेत, तरी त्यांचा सुगावा सरकारला कसा लागत नाही? नीरव मोदी लंडनमध्ये दिसल्याचे मोठे फोटो आता वृत्तपत्रांनी छापले. पण ते सरकारला का गवसले नाही? की त्यांनी बाहेरच राहणे या सरकारला आवश्यक वाटते. तशीही त्यांच्यातील काहींनी ‘देशात आलो तर अनेकांची बिंगे बाहेर काढू’ अशी धमकी दिलीच आहे. त्यामुळे ‘तुम्ही पळण्याचे नाटक करा, आम्ही पकडण्याचे नाटक करतो’ असा हा देखावा आहे. ज्या देशात व समाजात मोठे गुन्हेगार मोकळे राहतात तो देश व समाज सुरक्षित कसा राहील? की आज जे राज्य करतात ते आपलेच आहेत म्हणूनच या गुन्हेगारांच्या कृत्यांकडे आपल्यातील अनेक जण सहानुभूतीने पाहतात? आधी घडले ते सारे पाप होते, आता होत आहे ते सारे पुण्य आहे अशी या कृत्यांची कालमानानुसार व पक्षनिहाय वर्गवारी करायची असते काय? जे या वर्गवारीत मग्न आहेत त्यांचे समाधान कुणालाही हिरावून घ्यायचे नाही. मात्र ते या देशाच्या हिताशी खेळत आहेत, एवढे तरी त्यांना सांगितलेच पाहिजे.सरकारला कोणताही अवघड प्रश्न विचारला की या प्रश्नाचा आरंभ पूर्वीच्या सरकारांच्या काळातच झाला आहे, असे कामचलाऊ उत्तर देण्याची सवय या सरकारातील मंत्र्यांना व त्यांच्या प्रवक्त्यांना आता जडली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात काय केले यापेक्षा पूर्वीच्या सरकारांनी काय केले, यावर हेच ऐकून घेण्याची वेळ देशावर येते आहे. त्यामुळे त्यांनी कधीतरी सत्याची कास धरावी, एवढेच येथे त्यांना नम्रपणे सांगायचे आहे.
ज्यांना घरातले चोर पकडता येत नाही, ते बाहेर पळालेले चोर कसे पकडतील?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 5:29 AM