श्रमदानाचा वॉटर कप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:48 AM2018-04-16T00:48:16+5:302018-04-16T00:48:16+5:30

सर्व काही सरकारच करेल, मला काय त्याचे, अशी प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत असताना, पाणी फाऊंडेशनने सुरू केलेली वॉटर कप स्पर्धा अशा प्रवृत्तीला गावागावांमधून हद्दपार करीत आहे. मी पाणी वापरतो, पण वाचवतो का, असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारून सुरू झालेली ही स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर या स्पर्धेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे.

water cup news | श्रमदानाचा वॉटर कप

श्रमदानाचा वॉटर कप

Next

सर्व काही सरकारच करेल, मला काय त्याचे, अशी प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत असताना, पाणी फाऊंडेशनने सुरू केलेली वॉटर कप स्पर्धा अशा प्रवृत्तीला गावागावांमधून हद्दपार करीत आहे. मी पाणी वापरतो, पण वाचवतो का, असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारून सुरू झालेली ही स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर या स्पर्धेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. सोबतच स्पर्धेत सहभागी प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला मी गावाचे काही तरी देणं लागतो, या जबाबदारीची जाणीव झाली आहे. सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव या दोघांनीही हे काम राज्याच्या जलसमृद्धीसाठी हाती घेतले असून, २०१९ अखेरपर्यंत राज्य दुष्काळमुक्तीचा संकल्प ठेवला आहे. यावर्षी २२ मेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील एकचतुर्थांश गावे या अभियानामध्ये सहभागी झाली आहेत. दुष्काळमुक्तीसाठी मोठ्या धरणांपेक्षा जलसंधारण आवश्यक असल्याची जाण ठेवत गावांचा आराखडा तयार करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी श्रमदानातून जलसंधारण, अशी ही चळवळ आहे. दिनांक ८ एप्रिलच्या मध्यरात्री अनेक गावांमध्ये कामाचा प्रांरभ झाला. ग्रामस्थांचे श्रम, आवश्यक साहित्यासाठी दानशुरांची मदत व पाणी फाऊंडेशनच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे ज्ञान, या शिदोरीवर सध्या राज्यात स्वावलंबी आणि एकसंध जल चळवळ पहायला मिळत आहे. उत्सव, महापुरुषांच्या जयंती, लहान-थोरांचे वाढदिवसही श्रमदानस्थळीच साजरे होत आहेत. बुलडाण्यातील एका युवकाने तर त्याचे लग्न आटोपल्याबरोबर नवविवाहितेसोबत श्रमदान करून लग्नास संस्मरणीय केले. असे अनेक अभिनव उपक्रम या स्पर्धेत दृष्टीस पडतात. या सर्व उपक्रमांमधून स्पर्धेच्याप्रती लोकांची आत्मीयता वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीला दररोज साधारणत: ४० लीटर पाणी लागते. प्रत्येकाचे सरासरी आयुर्मान ६० वर्ष गृहित धरल्यास, एका व्यक्तीस तिच्या आयुष्यात किती पाणी लागणार आहे, याची जाण प्रत्येक ग्रामस्थास करून दिली जात आहे. आयुष्यभरात जेवढं पाणी आपण वापरणार आहोत, किमान तेवढं साठवू शकेल, जमिनीत झिरपू शकेल, अशी व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत की नाही, या प्रश्नांनी अस्वस्थ झालेली गावे सध्या जलक्रांतीच्या दिशेने निघाली आहेत. जलयुक्त शिवार अन् वॉटर कप या दोन अभियानामुळे सध्या जलसंधारणाचे नवे पर्व राज्यात सुरू झाले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अशा प्रयोगांमधून मिळणारा फायदा तत्काळ दिसत नाही; मात्र जलसंधारणाची ही गुंतवणूक निश्चितपणे नव्या जलक्रांतीचे बीजारोपण करणारी ठरणार आहे.

Web Title: water cup news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.