या युद्धखोर उत्तर कोरियाचं करायचं तरी काय?

By admin | Published: February 17, 2016 02:47 AM2016-02-17T02:47:49+5:302016-02-17T02:47:49+5:30

कोरिया हे जगाच्या एका कोपऱ्यात चीनच्या पूर्वेला असणारे एक लहानसे द्वीपकल्प. रशिया आणि अमेरिका यांच्यात दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचे वाटप करून घेण्यासाठी जी

What does this warhorse North Korea do? | या युद्धखोर उत्तर कोरियाचं करायचं तरी काय?

या युद्धखोर उत्तर कोरियाचं करायचं तरी काय?

Next

प्रा.दिलीप फडके (ज्येष्ठ विश्लेषक)
कोरिया हे जगाच्या एका कोपऱ्यात चीनच्या पूर्वेला असणारे एक लहानसे द्वीपकल्प. रशिया आणि अमेरिका यांच्यात दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचे वाटप करून घेण्यासाठी जी साठमारी झाली त्यात जसे जर्मनीचे विभाजन झाले तसेच कोरियाचेही झाले. अमेरिकेच्या प्रभावाखालच्या दक्षिण कोरियाने नेत्रदीपक आर्थिक प्रगती केली. उत्तर कोरियाने मात्र स्वत:भोवती गुप्ततेचा आणि गूढतेचा एक अभेद्य पडदाच तयार केला. त्यामुळे बाह्य जगात उत्तर कोरियाबद्दलच्या बातम्या सहजासहजी पोहोचू शकत नाहीत. तिथले पूर्वीचे सत्ताधीश किम उल सुंग व किम जोंग-इल आणि सध्याचा हुकुमशहा किम जोंग-उन यांच्या क्रूर कारनाम्याच्या अनेक कहाण्या सातत्याने पाश्चात्य जगासमोर येत असतात. पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता हा एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पण या बातम्या खऱ्या आहेत असे मानले तर उत्तर कोरियात अतिशय जुलमी आणि क्रूर राजवट राज्य करते आहे आणि एक लहानसा देश जवळपास सगळ्या जगाला वेठीला धरू शकतो हे मान्य करावे लागते. गेल्या महिनाभरात उत्तर कोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने अतिप्रगत अग्नीबाणाच्या मदतीने पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून जगातील अनेक देशांनी ही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीच छुपी चाचणी होती असे सांगून निषेध केला आहे. हे बॅलेस्टिक मिसाईल परीक्षण असल्याची शंका व्यक्त होत आहे. या चाचणीमुळे आता उत्तर कोरिया अमेरिकेवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने मारा करू शकतो. उत्तर कोरियाने अलीकडेच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. आंतरराष्ट्रीय समुदाय उत्तर कोरियाला शिक्षा करण्यासाठी प्रयत्नशील असून अनेक निर्बंध आधीच लादले असून त्यात आता भर पडणार आहे. एरवी त्याच्याबद्दल सहानुभूती असणाऱ्या चीनसारख्या त्याच्या पाठीराख्यासह सर्व जगाने त्याच्यावर टीकेचा भडीमार केला आहे आणि आता या कोरियाचा चांगलाच समाचार घेतला पाहिजे आणि त्याला वठणीवर आणलेच पाहिजे अशी चर्चा नव्याने व्हायला लागली आहे. गेल्या महिनाभरात जगातल्या विविध भागांमधल्या प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दलची चर्चा आपल्याला वाचायला मिळते.
‘द इकॉनॉमिस्ट’ने आपल्या लेखात अमेरिका आणि चीन यांच्यातल्या संबंधांमध्ये उत्तर कोरियामुळे निर्माण होत असलेल्या तणावाचा आढावा घेतला आहे. २०१२ मध्ये उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली त्यावेळी चीनने नुसती शाब्दिक तंबी देण्यापलीकडे काहीच केले नाही. नंतरच्या तीन वर्षांमध्येही केवळ शाब्दिक खेळाशिवाय चीनने कोणतीच कृती केली नाही. उलट कोरियन द्विपकल्पात अस्थिरता निर्माण करू नये अशी ताकीद तो अमेरिकेलाच देत राहिला. कोरियन हुकुमशहा किम याला भेटून आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी पुढे ढकलावी अशी विनंती करण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी यांनी वू दावेई यांना तिथे पाठवले होते, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. चीनच्या उत्तरेला असणाऱ्या कोरियात अस्थिरता निर्माण होऊ नये असाच शी यांचा यामागचा हेतू आहे असेही इकॉनॉमिस्टने म्हटले आहे. तिथे अस्थिरता निर्माण झाली तर आपल्याकडे निर्वासितांचे लोंढे येतील अशी चीनला भीती आहे. दक्षिण चिनी समुद्रातल्या आपल्या हालचाली अमेरिकेने बंद केल्या नाहीत तर अमेरिकेच्या सोबत असणाऱ्या दक्षिण कोरिया आणि चीन यातले बफर म्हणून चीनला उत्तर कोरियाचा वापर करायचा आहे, असेही इकॉनॉमिस्टचे म्हणणे आहे. मुळात अमेरिकेच्या दृष्टीने उत्तर कोरियाची राजवट ही एक डोकेदुखी राहिली आहे. त्यामुळे अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्ये व्यक्त होणारी मते उत्तर कोरियाच्या विरोधातच असणार यात शंकाच नाही.
‘न्यूयॉर्क टाईम्स’ने या विषयावर अग्रलेख प्रकाशित केला आहे. उत्तर कोरियाचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्यात म्हटले आहे. या संदर्भातल्या जगाच्या आणि त्यातही चीनच्या सोयीस्कर निष्क्रियतेचा उल्लेख टाईम्सने ‘चीनचे नपुंसकत्व’ अशा कडक शब्दांमध्ये केला आहे. चीनने महत्वाच्या वस्तूंचा पुरवठा ताबडतोब थांबवला तर उत्तर कोरिया वठणीवर येईल पण ते घडत नाही असा सूर टाईम्सने लावला आहे. याच संदर्भात दक्षिण कोरियाने केसोन्ग औद्योगिक समूहाने आपल्या सीमा उत्तर कोरियाच्या मजुरांसाठी बंद केल्या आहेत. उत्तर कोरियाचे पूर्ण नि:शस्त्रीकरण व्हायला हवे आणि त्यासाठी जागतिक स्तरावर वाटाघाटी आणि चर्चा होणे गरजेचे आहे. जपान आणि उत्तर कोरिया यांचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. आपल्या नागरिकाना उत्तर कोरिया डांबून ठेवतो अशा तक्रारी जपान करीत असतो. उत्तर कोरियावरच्या प्रतिबंधात्मक कारवाईत जपान सहभागी झाला म्हणून त्या नागरिकांचा शोध घेण्याची आपली मोहीम उत्तर कोरियाने थांबवली आहे. त्याबद्दलची जपानची तीव्र नाराजी व्यक्त करणारे संपादकीय जपानच्या ‘अशाही शिम्बून’मध्ये वाचायला मिळते. गायब होणाऱ्या जपानी नागरिकांचा शोध घेण्याचा आपला शब्द प्योंगयांगने पाळावा आणि जागतिक स्तरावर इतर देशांच्या बरोबर राहावे अशी जपानची अपेक्षा त्या लेखात व्यक्त केली आहे. जोपर्यंत चीन यासाठी तयारी दर्शवित नाही तोपर्यंत उत्तर कोरियावरची कोणतीही कार्यवाही यशस्वी होणार नाही असे दुसऱ्या एका संपादकीयात शिम्बुनने सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तर कोरियावर कोणतीही कारवाई व्हायला उशीर होतो आहे, याबद्दलच्या तीव्र भावनाही शिम्बुनने व्यक्त केल्या आहेत. याउलट चीनच्या पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार उत्तर कोरियावर कोणतीही एकतर्फी प्रतिबंधात्मक कारवाई करायला चीनने विरोध केला आहे. उत्तर कोरियाने आपले रॉकेटप्रक्षेपण केल्यावर काही तासांच्या आत दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात अवकाशात शत्रूच्या क्षेपणास्त्राचा हल्ला निकामी करण्याची क्षमता असणाऱ्या, अमेरिकेची ‘टर्मिनल हाय अल्टीट्यूड एरीय डिफेन्स’ कार्यान्वित करण्याबद्दल चर्चा सुरु झाली. अशी मिसाईल प्रणाली चीनला स्वत:साठी धोकादायक वाटते आहे. अमेरिकेने दक्षिण कोरियाला संरक्षण देण्यासाठी अशी अतिप्रगत प्रणाली तिथे बसवली तर त्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते, असे सांगत कोरियन द्वीपाच्या संरक्षण विषयक गरजांपेक्षा कितीतरी जास्त क्षमतेच्या या प्रणालीची या भागात गरज नाही असा दावा चीनने केलेला दिसतो. याबद्दलच्या आपल्या हरकती म्युनिच येथे सुरु असलेल्या जागतिक सुरक्षाविषयक अधिवेशनात चीनच्या प्रतिनिधींनी मांडल्याचे वृत्तही पीपल्स डेलीत वाचायला मिळते. युनोसह सारे जग विरोधात असताना उत्तर कोरियाचा हुकुमशहा असणारा किम बेमुर्वतखोरपणाने क्षेपणास्त्र आणि हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्या करताना जणू जगाला वाकुल्या दाखवतो आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये यावर एक बोलके व्यंगचित्र आले आहे.

Web Title: What does this warhorse North Korea do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.