ऐतिहासिक सत्ये पुसायची काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:03 AM2018-03-13T00:03:53+5:302018-03-13T00:03:53+5:30
त्रिपुरा या चिमुकल्या राज्यातील विजयधुंद भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझर आणून तेथे उभा असलेला लेनिनचा पुतळा जमीनदोस्त केला. (लेनिनचा देश १९५५ पासून भारताचा मित्र राहिला. पाकिस्तानशी झालेल्या प्रत्येक संघर्षात व काश्मीरच्या प्रश्नावर त्याने भारताला साथ दिली.
- सुरेश द्वादशीवार
त्रिपुरा या चिमुकल्या राज्यातील विजयधुंद भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझर आणून तेथे उभा असलेला लेनिनचा पुतळा जमीनदोस्त केला. (लेनिनचा देश १९५५ पासून भारताचा मित्र राहिला. पाकिस्तानशी झालेल्या प्रत्येक संघर्षात व काश्मीरच्या प्रश्नावर त्याने भारताला साथ दिली. अशा मदतीची गरज यापुढेही देशाला लागेल ही गोष्टच अशावेळी हल्लेखोरांच्या ध्यानात येत नाही) त्याची प्रतिक्रिया कोलकात्यात उमटून तेथील कम्युनिस्टांनी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याला काळे फासले. नेमक्या त्याच सुमारास लढ्याची सुरसुरी अंगात असलेल्या भाजपच्या एका खासदाराने पेरियर रामस्वामी नायकेर या पुरोगामी द्रविड नेत्याचा पुतळा येथे कशाला असे उद्दाम वक्तव्य चेन्नईत करून सारा तामीळ मुलुख पेटविला. मग पुण्यातील ब्राह्मणांना दादोजी कोंडदेवांची आठवण येऊन त्यांची प्रतिमा त्यांनी तिथल्या महापालिकेच्या आवारात आणून तिची पूजा केली. त्यामुळे चिडलेल्या मराठा महासंघाच्या लोकांनी त्यांच्याशी बाचाबाची आणि हाणामारी करून ती प्रतिमा त्यांना हटवायला लावली. यातल्या लेनिनला भारतात अनुयायी असले तरी त्याच्या मागे त्याचे संघटित जातवाले नाहीत. श्यामाप्रसादांनाही पक्ष असला तरी ते जातीने दुबळे आहेत. पेरियर पुरोगामी असल्याने त्यांना सहकारी व मित्र होते, पण सगळेच पुरोगामी जसे एकाकी असतात तसे पेरियरही एकाकी होते. त्यामुळे त्यांच्या प्रतिमांच्या विटंबनांची कोणतीही मोठी प्रतिक्रिया उमटलेली दिसली नाही. भाजपचे एक विद्वान पुढारी तर ‘लेनिनचे भारतात काय काम’ असेही म्हणताना आढळले. महात्मा गांधींचे पुतळे व प्रतिमा जगातील शंभरावर देशात आहेत. या शहाण्या पुढाºयाचे मूर्ख अनुकरण अजून तिकडे कोणी केले नाही आणि तसे करण्याएवढी तिकडची माणसे उठवळही नाहीत. त्यातली जी उठवळ आहे त्यांनी अफगाणिस्तानातील बामियान बुद्धाच्या दोन प्रचंड प्रतिमा तोफा लावून जमीनदोस्तही केल्या आहेत... या साºया पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केली गेली. आंबेडकरांचे दलित अनुयायी सर्वत्र असले तरी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जातीची माणसे उत्तर प्रदेशात नाहीत. त्यामुळे त्या प्रकरणाचे जेवढे पडसाद महाराष्ट्रात उमटले तेवढे उत्तर प्रदेशात वा अन्यत्र उमटले नाहीत. तरीही साºयांनी ध्यानात घ्यावा असा या घटनांचा एक धडा आहे. ज्या प्रतिमांच्या मागे संघटित जाती उभ्या आहेत आणि त्यांची संख्या मोठी आहे त्याच यापुढे देशात सुरक्षित राहतील. ज्यांना तसे जातींचे वरदान नाहीत त्या कधीही जमीनदोस्त होतील.
काही वर्षांपूर्वी रायगडावरील शिवरायांच्या प्रतिमेसमोर असलेली वाघा कुत्र्याची प्रतिमा काही अज्ञात गुंडांनी उखडली आणि दरीत फेकली. ती प्रतिमा तीन दिवसात पुन्हा स्थापन झाली नाही तर आम्ही महाराष्ट्रातील शिवाजीचेच पुतळे उखडू अशी धमकी धनगर समाजाच्या लोकांनी दिली तेव्हा सरकारने दरीत पडलेल्या त्या वाघ्याला तात्काळ शोधून काढून त्याला पुनश्च शिवरायांच्यासमोर प्रस्थापित केले. पुतळे, प्रतिमा, पूजास्थाने, मंदिर, मशिदी, गुरुद्वारे व श्रद्धास्थाने ही समाजाची मर्मस्थानेही असतात. त्या समाजाला वा वर्गाला डिवचायला अशा प्रतिमांची मोडतोड करणे हा मध्ययुगीन हिंसाचाराचा भाग आहे. मुस्लीम आक्रमकांनी जगभरची ख्रिश्चन वा अन्य धर्मीयांची पूजास्थाने उद्ध्वस्त करून त्यातील प्रतिमांची विटंबना केली. त्यांच्या संघटित मुसंडीसमोर इतर समाज झुकलेले दिसले. आता त्या इतिहासाची पुनरावृत्ती नव्या स्वरूपात होत असलेली आपण पाहतो. त्रिपुरापासून उत्तर प्रदेश आणि दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत झालेल्या घटना अशा पुनरावृत्तीच्या आहेत. भारतात अशा पूजास्थानांच्या पाडापाडीची सुरुवात १९९२ मध्ये भाजपच्या रथयात्रेने अयोध्येतील बाबरी मशिदीचा विध्वंस करून केली. पुढे भांडारकर संस्थेवरचा पुण्यातील हल्ला, रामगणेश गडकºयांच्या पुतळ्याची मोडतोड हे पराक्रमी प्रकार महाराष्ट्रातही झाले. हल्लेखोरांची नजर प्रतिमांवर नसते. त्या प्रतिमांच्या मागे असलेल्या श्रद्धा व वृत्तींवर असते. या वृत्ती जेथे आपल्याहून बलशाली असतील तेथे हल्लेखोरांची शस्त्रे म्यान होतात. या वृत्ती दुबळ्या वा असंघटित असतील तर त्या म्यानाबाहेर येतात. या हल्लेखोरांना मुके समर्थन राजकारणातही प्राप्त होते. त्यामुळे या प्रकारांना केवळ हल्ला करणारी माणसेच जबाबदार नसतात. त्यांचे मुके पाठीराखेही त्यांच्याएवढेच त्यात अपराधी असतात. हल्लेखोरांचे पाठबळ मोठे असेल तर ते प्रतिमांवरही थांबत नाहीत. मग ते दाभोलकरांची हत्या करतात, पानसºयांना गोळ्या घालतात, कलबुर्गी आणि गौरीचे प्राण घेतात. आदित्यनाथ या योगी मुख्यमंत्र्याने ताजमहाल ही जगप्रसिद्ध वास्तू उत्तर प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतून वजा केली तोही याच प्रकाराचा एक तांत्रिक नमुना आहे.
पुतळे व प्रतिमा ही समाजाला त्याची ऐतिहासिक सत्ये सांगत असतात. ही सत्ये चांगली आणि व्यथित करणारीही असतात. त्यातून वर्तमानात धडे घेऊन भविष्याच्या वाटा चोखाळायच्या असतात. म्हणून नावडती असली तरी ती सत्ये जपायची असतात. पोर्तुगालमध्ये सालाघारच्या हुकूमशाहीची एक पराभूत प्रतिमा तेथील जनतेने अशी जपली आहे. हिटलरने युरोपात केलेल्या हिंसाचाराच्या साºया प्रतिमा अजूनही त्या प्रदेशाने याचसाठी जपल्या आहेत. दुर्दैव याचे की या प्रकारचा खरा आनंद १९६० च्या दशकात डॉ. राम मनोहर लोहियांच्या समाजवादी सहकाºयांनी केला. दुसरा कोणताही राजकीय कार्यक्रम हाती नसल्याने देशातील ब्रिटिश राजवटींची प्रतिके हटविण्याचे एक ‘देशभक्तीपर’ आंदोलनच तेव्हा त्यांनी केले. राणी व्हिक्टोरियापासून रॉबर्ट क्लाईव्हपर्यंतच्या साºयांचे पुतळे उचलून ते एका अडगळीच्या जागी दाटीवाटीने ठेवण्याचे प्रकार त्यात झाले. इतरही काही देशात याच्या आवृत्त्या आल्या. आताच्या रशियाने स्टॅलिन आणि लेनिनचे पुतळे पाडले. त्यातही मॉस्कोच्या लाल चौकातले लेनिनचे शव रशियाने आणि माओचे नाव चीनने जपले आहे. काळ बदलला, सत्ताधारी बदलले, त्यांचे विचार बदलले पण त्यांनी इतिहास कायम राखला. कोणताही देश केवळ त्याच्या वर्तमानामुळे ओळखला जात नाही. त्याची संस्कृती, इतिहास, त्यातले पराक्रम, त्यातील प्रतिमा व पूजास्थाने ही सारी त्याची ओळख देत असतात. ग्रिकांचा इतिहास जयपराजयाचा नाही, तो विचार प्रवाहांचा, तत्त्वज्ञानाचा आणि प्रज्ञावंतांच्या कहाण्यांचा आहे. तसाच इतिहास भारत व चीनसारख्या देशांनाही लाभला आहे. हजारो वर्षांचे हे सातत्य जपायचे की मोडायचे हा आताच्या प्रकारांनी समाजासमोर उभा केलेला प्रश्न आहे.
(संपादक, नागपूर)