आयारामांना संधी अन् निष्ठावंतांची कोंडी; अमित शाह बोलले त्याचा अर्थ काय होता?
By यदू जोशी | Published: March 15, 2024 08:00 AM2024-03-15T08:00:18+5:302024-03-15T08:01:21+5:30
बाहेरून आले आणि लगेच लोकसभेचे तिकीट मिळाले असे होणार नाही, हा ‘मेसेज’ भाजप श्रेष्ठींनी आयारामांना दिला आहे.
यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
मध्यंतरी अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा तयारीची बैठक घेतली तेव्हा एक ज्येष्ठ आमदार उठून उभे राहिले आणि ‘बाहेरून आलेल्यांना किंवा बाहेरच्यांना (मित्रपक्ष) सामावून घेताना आपल्यावर अन्याय होतो,’ असा सूर त्यांनी लावला. तेव्हा शाह यांनी दोन २५-३० वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या दोघांना विचारले.
तुम्ही इतकी वर्षे सक्रिय आहात तुम्हाला पक्षाने काय दिले?
ते दोघे म्हणाले, काहीही नाही. शाह त्यावर म्हणाले, तीस वर्षांत तुम्हाला काही मिळाले नाही तर तीस दिवसांपूर्वी आलेल्यांना आम्ही काही देऊ आणि तुम्हाला डावलले जाईल हे तुम्हाला खरे वाटते काय?
- शाह यांच्या या विधानाचा प्रत्यय महाराष्ट्रातील २० जणांच्या पहिल्या उमेदवार यादीत आला. बाहेरून आले आणि लगेच लोकसभेचे तिकीट मिळाले असे होणार नाही हा मेसेज भाजप श्रेष्ठींनी आयारामांना दिला आहे. रावेरमध्ये डॉ. केतकी पाटील आणि त्यांचे वडील डॉ. उल्हास पाटील यांनी गेल्याच महिन्यात कमळ हाती घेतले. केतकी यांना उमेदवारी दिली जाईल किंबहुना त्या अटीवर बापलेक पक्षात गेले असे बोलले जात होते; पण ते खोटे ठरले. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाताच त्यांच्या जवळच्या नातेवाईक मीनल खतगावकर यांना तिकीट मिळाले, असेही झाले नाही. अनेकांना रक्षा खडसे यांच्या उमेदवारीचे आश्चर्य वाटले. त्यांचे सासरे एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले, भाजपच्या राज्यातील नेत्यांवर ते सातत्याने टोकाची टीका करतात, ते फारच त्रासदायक आहेत म्हणून रक्षा यांना तिकीट नको यासाठी काहींनी लॉबिंग केले; पण सासऱ्यासाठी सुनेला शिक्षा का म्हणून? अशी विचारणा श्रेष्ठींनी केली. तेव्हा त्याचे उत्तर समाधानकारक मिळाले नाही म्हणतात. सासरेबुवांच्या बंडात आणि नंतरही रक्षा यांनी भाजप, भाजपचे नेते यांच्याविरुद्ध काहीही न बोलण्याचा संयम बाळगला, त्याचे बक्षीसही त्यांना मिळाले.
एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावे या अटीवर रक्षाताईंना उमेदवारी मिळाली का, हे लवकरच दिसेल. पूर्वी काँग्रेसमध्ये दोन गटांना आलटून पालटून संधी दिली जायची; चेकमेट चालायचे, आता तसे भाजपमध्ये घडत आहे.
रावेरमध्ये रक्षाताई अन् जळगावमध्ये स्मिता वाघ, दिंडोरीत डॉ. भारती पवार, नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित असे महिला राज्य भाजपने उत्तर महाराष्ट्रात आणले आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची घोषणा राहुल गांधींनी धुळ्यात केली. त्याच उत्तर महाराष्ट्रात भाजपने उमेदवारीत ५० टक्के आरक्षण दिले.
मोदींच्या करिश्म्यावर कोणीही निवडून येईल, या भ्रमात न राहता, कोणतीही जोखीम न पत्करता पहिली यादी भाजपने दिली आहे.
कोणाला का दिले, का कापले?
नितीन गडकरींनाच नागपुरातून तिकीट मिळणार नाही अशा कंड्या पिकवल्या गेल्या. उद्धव ठाकरेंनी तर ‘भाजप सोडून शिवसेनेत या, आम्ही तुम्हाला खासदार करतो,’ अशी ऑफर दिली. सुप्रिया सुळे यांनाही गडकरींबद्दलच्या आदराचे भरते आले होते. दोघांच्याही प्रेमाचा फायदा गडकरींना आता नक्कीच होईल. ‘इकडे आम्ही गडकरींशी पंगा घेतो अन् तिकडे महाविकास आघाडीतलेच नेते गडकरींची बाजू घेतात,’ म्हणून नागपुरातले काँग्रेसवाले अस्वस्थ झाले. गडकरींचे तिकीट कापणे एवढे सोपे नाही. बावनकुळेंचे कापले तेव्हा विदर्भात फटका बसला होता, आता गडकरींचे कापले असते तर आणखीच मोठा फटका बसला असता. दिल्लीला हे सगळे कळते. शिवाय, कोणाला ठेवायचे आणि कोणाला कापायचे या निर्णयात संघही असतोच ना!
धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याविषयीची जाडीजुडी फाइल एका स्थानिक बड्या नेत्याने अमित शाह यांच्याकडे जळगावला सोपविली होती, तरीही भामरेंनाच संधी मिळाली. त्यामुळे बरेच लोक चक्रावून गेले आहेत. डॉ. भारती पवार यांच्याबद्दलही तक्रारी झाल्या होत्या; पण त्यांची दखल घेतली गेली नाही. मुंबईत मनोज कोटक आणि जळगावमध्ये उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले जाण्याच्या कारणात समानता आहे.
माढामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते घराण्याचा तीव्र विरोध असूनही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देत दोन्ही विरोधकांना चाप लावला गेला. रामराजेंचे जावई असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईत पक्षाची उमेदवारी दिली जाणार आहे.
असेही म्हणतात की, रामराजेंच्या कुटुंबात आणखी एकाला राजकीय संधी द्यायची असे ठरले आहे. मोहितेंच्या कॅम्पमधून निवडणूक काळात काही उलटसुलट केले गेलेच तर त्यावर वॉच ठेवा, अशा वरून सूचना आहेत. मोहिते चुकीचे करण्याची जोखीम पत्करतील, असे वाटत नाही.
नवीन संसद भवनाचे दरवाजे चंद्रपूरच्या लाकडाचे बनविलेले आहेेत, आता त्याच दरवाजातून इच्छा नसतानाही जाण्याची परीक्षा चंद्रपूरचेच पालकमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांना द्यावी लागणार आहे. तिकीट मिळविण्यापेक्षा ते कापून आणणे किती कठीण असते हे आता सुधीरभाऊंना समजले असावे.
भंडारा-गोंदियाबाबत फैसला होऊ शकला नाही कारण तिथे विद्यमान खासदार सुनील मेंढे की माजी आमदार परिणय फुके असा टाय आला आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात सध्याच्या खासदार पूनम महाजन की पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असा टाय आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वर्धेबाबत बचावले. शेलार बचावतात का ते पाहायचे.