संपादकीय - आपण जे वाचतो, जगतो ते झिरपतंच...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 06:55 AM2021-11-20T06:55:14+5:302021-11-20T06:55:44+5:30
आपला परिसर, समाज समजून देता-घेता आला, तर कर्तव्य व जबाबदाऱ्यांचं भान वेगळं द्यावं लागत नाही.
वीणा गवाणकर
कोविड काळाचा उल्लेख तुम्ही ‘अपरिहार्य ठहराव’ असा केलात. ‘इंटिमेट डेथ’सारख्या तुमच्या अनुवादित पुस्तकामुळे आकस्मिक मृत्यू व कोलाहलाकडे बघायची नजर वेगळी झाली?
-‘जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा ती त्याच्याशी शेवटची भेट आहे असं समजून भेटा. पुढच्यावेळी तुम्ही किंवा ते कुणीतरी एक नसेल असं समजून वागलात तर, तुम्ही आपोआप ऋजू होता. मृत्यू येण्याआधी मरू नका ! आणखी एक लक्षात घ्या, शेवटच्या क्षणापर्यंत माणूस बदलू शकतो, त्याला बदलण्याची संधी द्या, त्याची चूक कबूल करता येईल अशी परिस्थिती निर्माण करा, मरताना माणसाला मोकळा होऊन मरू द्या.’ - डॉ. मारी हेनेझेल हिनं मांडलेले हे विचार मला पटतात. कोविडकाळात आसपास मृत्यूच्या वार्ता येत असताना मृत्यूचं तत्त्वज्ञान स्वीकारून मी जगतच होते. अस्वस्थता होती, ती बहुतकरून मनात चाललेल्या विषयाबद्दल. शशी पटवर्धनांच्या वार्षिक अंकासाठी त्यांना निसर्गप्रेमीवर लिहून हवं होतं. ३० वर्षांपूर्वी मी रिचर्ड बेकरसारख्या पर्यावरण तज्ज्ञाविषयी लिहिलं होतं. त्यावेळी लक्षात आलं, शंभर वर्षांपूर्वी लंडनमध्ये जगभर झाडं लावण्याची मोहीम सुरू करणारा, सहारा वाळवंटाला हिरवी वेसण घाला म्हणणारा रिचर्ड आजही किती प्रस्तुत ठरतो आहे. त्याच्याविषयी वाचकांना सांगायलाच हवं या अस्वस्थतेनं मी घेरले गेले. निसर्गात केलेल्या हस्तक्षेपाचे दुष्परिणाम तापमान बदल, ऋतूचक्र बदल आणि अगदी कोविडपर्यंत आपण भोगतो आहोत. त्याबद्दल जागर करणाऱ्या बेकरविषयी एक पुस्तक मी कोविडकाळात लिहिलं. कोलाहलाच्या मुळाशी पोहोचू पाहाणाऱ्यांचं काम सांगणं ही जबाबदारी वाटते मला.
कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण, नोकरी या अनुभवातून व मुख्यत: वाचण्यातून भान मिळवलंत, ते कसं?
-माझे वडील पोलीस खात्यात, त्यामुळं ज्या गावी जाऊ तिथं त्यांचा दबदबा असे. ग्रामीण भागात जेमतेम एक शिक्षकी शाळेत पुस्तकाच्या पेट्या मात्र नियमित यायच्या. रेडिओही नव्हता, कुठलंच सामाजिक जीवन नव्हतं, तिथं वाचनानं तारलं. आपण राहातो त्या पलीकडचं जग कळत गेलं. गावात भुताखेतांबद्दल बोलणी व्हायची. त्याबद्दल वडिलांना विचारलं. ते थेट मध्यरात्री स्मशानात व कबरस्तानात घेऊन गेले, समजावलं, ‘असं काही नसतं!’ त्यावेळी कमावलेला धीटपणा अजूनही पुरतो आहे. ग्रंथपाल म्हणून मिलिंद महाविद्यालयात काम करू लागले व तिथली समृद्धता बघितली तेव्हा साक्षात्कार झाला की, आपण फक्त साक्षर आहोत, बाकी काहीच नाही. या कामामुळे आपल्याला हवे असणारे संदर्भ कुठे व कसे शोधावेत याची माझी यंत्रणा शिस्तशीर झाली. ज्याला संशोधनपर काम करायचं त्याला ग्रंथालयं आणि अर्काइव्हज यांचं ओरिएंटेशन ठाऊक हवं. कामाला नेमकेपणा येतो. आपला परिसर, समाज समजून देता-घेता आला तर, कर्तव्य व जबाबदाऱ्यांचं भान वेगळं द्यावं लागत नाही हे मी अनुभवलं आहे.
कार्व्हरपासून, डॉ. खानखोजे, आयडा स्कडर, गोल्डा, रॉबी डिसिल्व्हांपर्यंत ‘स्वातंत्र्या’चं मूल्य मानणाऱ्या माणसांचे प्रवास तुम्ही लिहिलेत. आजच्या काळात ही जाणीव कशी आहे?
-ज्यांची आयुष्यं मी अभ्यासली ती माणसं अत्यंत तत्त्वनिष्ठपणे संघर्षरत होती. लीझ माईट्नरसारखी थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ आठ वर्ष एका ड्रेसवर राहिली. तिची विचारसरणी, ज्ञान, व्यासंग मोठा होता म्हणून आपण कसे दिसतो याची तिला पर्वा करावीशी वाटली नाही. तिनं सत्याच्या शोधासाठी, बौद्धिक स्वातंत्र्यासाठी दिलेला लढाच आहे तो. कार्व्हरनं शेतीत निरनिराळे प्रयोग केले म्हणून केवळ तो मोठा आहे का?, - नाही! साधी राहाणी, श्रमाला प्रतिष्ठा देणं, पैशासाठी स्खलन होऊ न देणं हे त्याचं मोठं काम आहे. त्यानं त्याला हव्या असणाऱ्या स्वातंत्र्यासाठी चंगळवादी राहाणीशी फारकत घेतली. व्यक्ती विकास झाल्याशिवाय समाज विकास करताच येत नाही. त्यासाठी माणूस म्हणून तुम्ही स्वत:ला तयार करणं भाग आहे. कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी मूलभूत नीतिमत्ता पाळली पाहिजे व आपण कशासाठी स्वातंत्र्य घेतो आहोत तो मुद्दा ठोस हवा. विलासराव साळुंखेंनी मोठेमोठे कारखाने उभारले, कर्जबाजारी झाले, पण, समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न लावून धरायचा असं ठरवल्यावर त्यांनी यशस्वीतेच्या समाजाच्या गणितापेक्षा स्वत:च्या बुद्धीला व भावनेला स्वातंत्र्य द्यायचं ठरवलं ! स्वातंत्र्यासोबत घेतलेले निर्णय निभवायची जबाबदारी असते आणि दुसऱ्याचं स्वातंत्र्य जपण्याचीही जबाबदारी असते हे आपण विसरतो किंवा टाळतो. स्वातंत्र्य म्हणजे अनिर्बंधता नव्हे. मला पान खायचं स्वातंत्र्य आहे, पण, ते कुठं थुंकावं याच्या निर्णयाची जबाबदारी येते. एकात एक गुंतलेल्या व अत्यंत व्यापक परीघ असणाऱ्या या गोष्टी आहेत. स्वातंत्र्याची बंधनंही असतात. इतक्या सगळ्या पातळ्यांवर कुठलीही पिढी विचार करत जाते व कृती तपासत राहाते तेव्हा जाणीव घडते, विकसित होते.
शब्दांकन : सोनाली नवांगुळ