अच्युत गोडबोले ख्यातनाम लेखकसहलेखिका - आसावरी निफाडकर
१९६८ सालच्या ‘दि लव्ह बग’ या धमाल चित्रपटात ‘हर्बी’ नावाच्या कारची जिम नावाच्या एका कार रेसरबरोबर कशी मैत्री होते आणि मग सतत रेस हरणाऱ्या जिमला ती कशी जिंकायला मदत करते वगैरे दाखवलं होतं. अशा स्वयंचलित कार्सची कल्पना आता प्रत्यक्ष उतरते आहे.
याच त्या ‘सेल्फ ड्रायव्हिंग कार्स’ किंवा ‘ऑटोनॉमस कार्स’! यात चालक नसतो. या गाड्या चक्क बघू शकतात, निर्णय घेऊ शकतात आणि स्वत:वर नियंत्रणही ठेवू शकतात. त्यासाठी सेन्सर्स, कॅमेरे, सॉफ्टवेअर अशा अनेक गोष्टी असतात. समोर आलेला अडथळा वेळीच ओळखून तो टाळून या गाड्या पुढे जाऊ शकतात. एकदा आपल्याला कुठे जायचं आहे हे त्यांना सांगितलं, की नेव्हिगेशन सिस्टिमचा वापर करून त्या आपल्याला इच्छित ठिकाणी पोहोचवू शकतात आणि हे सगळं कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाशिवाय होतं!
१९३९ साली ‘फुटूरामा’ या जागतिक प्रदर्शनात ऑटोनॉमस गाड्यांबरोबरच ऑटोनॉमस बसेस, ट्रक्स तसंच त्यांना नियंत्रित करणारं टॉवर असं सगळं मांडलेलं होतं. १९७० च्या दशकात कॉम्प्युटर आणि इमेज प्रोसेसिंग विकसित झालं. १९७७ साली जपानमधल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ सुकुबा मेकॅनिकल इंजिनिअरिंग लॅब’ची पहिली सेल्फ-ड्रायव्हिंग कार ताशी २० मैल इतक्या वेगानं रस्त्यावर धावली. १० वर्षांनी अर्नेस्ट डिकमन्स या जर्मन इंजिनिअरनं एक ‘VaMOR’ नावाची ‘डायनॅमिक व्हिजन’ सिस्टिम गाडीच्या मागे आणि पुढे बसवली. त्यामुळे फिल्टर होऊन गाडीला इमेजेस दिसणं आणि ठरावीकच आवाज ऐकू येणं शक्य व्हायला लागलं. वेगाची मर्यादा नसलेल्या जर्मनीच्या ‘ऑटोबान’ हायवेवर या गाड्या प्रतितास ६० मैल वेगाने धावल्या !
८ ऑक्टोबर, २००५ रोजी डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (DARPA)नं आयोजित केलेली एक स्पर्धा ‘टाउरंग’ या गाडीने जिंकली. ७ तासांत आपल्या मार्गातली शंभर-एक तीव्र वळणं, तीन बोगदे, चिखल आणि खडबडीत उंच-सखल भाग असं सगळं पार करत तिनं ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २००७ साली DARPA नं. ३०-३५ ऑटोनॉमस सिग्नल्स वगैरेंचे अनेक नियम पाळून या गाड्या बागा, रहदारी असलेल्या रस्त्यावर उतरवून बघितल्या. यात स्टॅन्फर्ड विद्यापीठाच्या गाडीने ही स्पर्धा जिंकली; तरीही त्या गाडीने ड्रायव्हिंगचे नियम पाळले नसल्यामुळे तिला हे बक्षीस मिळालं नाही. पण या स्पर्धेमुळे अशा गाड्या फक्त लष्करासाठीच नाहीत, तर सामान्य नागरिकांसाठीही तयार करता येतील, असं अनेक कंपन्यांना वाटायला लागलं. पण २००७-०८ सालच्या जागतिक मंदीमुळे हे प्रयत्न मागे पडले.नंतर जसजशी मशीन/डीप लर्निंग या तंत्रज्ञानात वेगानं प्रगती होत गेली, तसतशी ऑटोनॉमस कार्सच्या दिशेनंही भराभर पावलं पडत गेली. आज ऑटोनॉमस गाड्या बनवण्यात टेस्ला, ऑडी, एनव्हिडिया, फोर्ड, गुगल (अल्फाबेट) अशा कंपन्या अग्रेसर आहेत.
आता जहाजं, रेल्वे आणि विमानं ही वाहनंही ‘ऑटोनॉमस’ होण्याच्या मार्गावर आहेत. २०५० सालापर्यंत ऑटोनॉमस रेल्वे प्रवासी घेऊन सगळीकडे धावायला लागतील. सिंगापूर, न्यूरेम्बर्ग आणि पॅरिस इथे अशा रेल्वे स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून धावताहेत; पण त्या अजून पूर्णपणे स्वयंचलित नाहीत. त्यांना दूरवरून नियंत्रित करावं लागतं. भारतातही अशा रेल्वे लवकरच दिसायला लागण्याची शक्यता आहे. भविष्यात अधिक सुधारणा झाल्यावर या रेल्वेमध्ये मानवी हस्तक्षेप फारच कमी प्रमाणात असेल, अशी आशा आहे.स्वयंचलित गाड्या मोठ्या प्रमाणात धावायला लागल्यावर अनेक गोष्टी बदलतील. मानवी चुकांमुळे होणारे अपघात कमी होतील. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या गाड्या जलद मार्ग निवडतील. विशेष म्हणजे त्यांच्याकडे दर क्षणी रहदारीचा अपडेट असेल.
यामुळे आपल्या प्रवासाचा वेळ वाचेल. मालाची देवाण-घेवाणही जलदगतीनं होऊ शकेल. यामुळे एकूणच कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढेल. स्वयंचलित गाड्या नवीनतम ऊर्जा/वीज वापरणाऱ्या असल्यामुळे हवेतलं कर्बवायूंचं उत्सर्जन खूपच कमी होईल. या गाड्या स्वत:हून पळतील, इंधन भरायला जातील, विम्याचे हप्तेही स्वत:च भरतील आणि स्वत:मध्ये काही गडबड वाटली तर स्वत:हूनच गॅरेजला जातील. गाडीच्या मालकाला यातलं काहीच बघावं लागणार नाही. त्यामुळे या गाड्या फार लवकर लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. २०४० सालापर्यंत नवीन (साध्या) गाड्या घेण्याचं प्रमाण ५०%नं घटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे !कुठलंही वाहन पूर्णपणे स्वयंचलित होण्यासाठी त्या वाहनाला एकूण ४ टप्पे पार करावे लागतात. यातल्या ३ टप्प्यांमध्ये कॉम्प्युटरबरोबरच मानवी हस्तक्षेपाची गरज भासतेच. आता आपण यातल्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत.पूर्णपणे स्वयंचलित गाड्या तयार व्हायला तरी अजून काही काळ जावा लागेल; पण नंतर आपला प्रवास भन्नाट असेल, त्याबरोबर लाखो ड्रायव्हर्सच्या नोकऱ्याही जातील, हे मात्र नक्की!godbole.nifadkar@gmail.com