- रवी टालेहवामान बदलांच्या परिणामांचा आता प्रत्यक्ष अनुभव येत आहे. आपण जागे होणार आहोत की नाही?जगाच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये सध्या विचित्र हवामानाचा अनुभव येत आहे. अमेरिकेच्या हवाई बेटांमध्ये ज्वालामुखीचा कधी नव्हे असा उद्रेक झाला असून, लाव्हारस अनेक घरांना कवेत घेत सुटला आहे. लाव्हारसाची शेकडो फूट उंचीची कारंंजी उडत असून, सोबतीला भूकंपाचे झटके बसत आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडत असलेल्या विषारी वायूंनी आसमंत व्यापून टाकला आहे. तिकडे टर्कीची राजधानी असलेल्या अंकारा शहरात अवकाळी पावसाने नुकतेच असे काही थैमान घातले, की जणू जगाचा अंत जवळ आला आहे, असे वाटावे! त्याचवेळी भारतात धूळीच्या वादळाने सुमारे शंभर बळी घेतले आणि आणखी आठवडाभर तरी भारताच्या बहुतांश भागांना वादळाचा धोका आहेच!भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच आयएमडीने दिलेल्या इशाºयानुसार, आणखी किमान आठवडाभर तरी देशभर विचित्र हवामानाचा अनुभव येणार आहे. आयएमडीनुसार येत्या काही दिवसात किमान १३ राज्यांना वादळ आणि वादळी पावसाचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या मधोमध वसलेल्या विदर्भात या कालावधीत तापमान उच्चांक गाठेल, असा अंदाज आहे.जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदलांबाबत आतापर्यंत केवळ वाचायला, ऐकायलाच मिळत होते. आता सर्वसामान्यांनाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव यायला लागला आहे.भारतापुरते बोलायचे झाल्यास, पावसाळ्याच्या आगमनापूर्वीची वादळे ही नित्याचीच बाब आहे; मात्र वादळांची यावर्षीसारखी तीव्रता यापूर्वी कधी दिसली नव्हती. शास्त्रज्ञांच्या मते, सातत्याने वाढत असलेले तापमान त्यासाठी कारणीभूत आहे. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस भारतात वादळे येतातच; मात्र वाढत्या तापमानामुळे त्यांची तीवता आणि वारंवारिता वाढण्याचा धोका शास्त्रज्ञांनी यापूर्वीच वर्तविला होता. त्याचाच प्रत्यक्ष अनुभव आपण सध्या घेत आहोत.गत चार वर्षात भारतात उष्णतेच्या लाटांनी तब्बल ४,६०० लोकांचे बळी घेतले. वाढत्या हरितगृह वायू उत्सर्जनामुळे तापमानवाढीस हातभार लागत असून, जर आपण वेळीच जागे झालो नाही, तर या शतकाच्या अखेरीस भारतातील बराच मोठा भाग मानवी वस्तीच्या लायक उरणार नाही, असे भाकित संशोधकांनी वर्तविले आहे. शतकाची अखेर होण्यास अद्याप बराच अवकाश आहे; पण येत्या पाच वर्षातच तापमानातील अधर््या अंशाची वाढही मोठ्या प्रमाणात मानवी बळी घेईल, अशी भीती आहे.‘इंदिरा गांधी इंस्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च’नुसार, ‘इंटरगव्हर्नर्मेंटल पॅनेल आॅन क्लायमेट चेंज’ने जागतिक तापमानवाढीविषयी वर्तविलेली भाकिते प्रत्यक्षात उतरल्यास, हवामानातील बदलांमुळे भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) नऊ टक्क्यांनी घसरेल. त्यासाठी कारणीभूत ठरेल, तांदुळासारख्या पिकांच्या उत्पादनात संभवणारी ४० टक्क्यांपर्यंतची घट! याशिवाय मुंबई, चेन्नईसारख्या समुद्रकाठावरील शहरांचे काही भाग पाण्याखाली गेल्याने जवळपास ७० लाख लोक बेघर होतील. हे सगळे अत्यंत भयानक आहे. प्रश्न हा आहे, की आपण आता तरी जागे होणार आहोत की नाही?
कधी जागे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 4:03 AM