लाल किल्ल्यातला ‘राष्ट्र सुरक्षा यज्ञ’ देशाला कुठे नेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:45 AM2018-02-17T02:45:23+5:302018-02-17T02:45:57+5:30
सीमेवर दररोज आपले जवान शहीद होत आहेत. आपल्या मौल्यवान प्राणांचे देशाच्या रक्षणासाठी बलिदान देत आहेत. जवानाची दररोज पडणारी ही आहुती कशी रोखता येईल? त्यावर कोणते ठोस उपाय योजता येतील? याचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी, दिल्लीच्या लाल किल्ल्यात ‘राष्ट्र सुरक्षा यज्ञाचा’ घाट घालण्यात आला आहे.
- सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)
सीमेवर दररोज आपले जवान शहीद होत आहेत. आपल्या मौल्यवान प्राणांचे देशाच्या रक्षणासाठी बलिदान देत आहेत. जवानाची दररोज पडणारी ही आहुती कशी रोखता येईल? त्यावर कोणते ठोस उपाय योजता येतील? याचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी, दिल्लीच्या लाल किल्ल्यात ‘राष्ट्र सुरक्षा यज्ञाचा’ घाट घालण्यात आला आहे. देशाच्या विविध भागातून त्यासाठी पाणी आणि माती आणली जाणार आहे. निमित्त कोणतेही असो, उठसूठ देशव्यापी यात्रा काढण्याची हौस असलेला संघपरिवार व त्याच्या संघटनांनी या जुनाट पारंपरिक प्रयोगासाठी जल माती यात्रा आरंभली आहे. यात्रेसाठी जो आलिशान रथ तयार केला आहे, त्याला अन्य कुणी नव्हे तर देशाचे विद्यमान गृहमंत्री राजनाथसिंगांनी नुकताच हिरवा झेंडा दाखवला.
‘राष्ट्र सुरक्षा यज्ञ’ दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात होऊ घातला आहे. या यज्ञासाठी १०८ यज्ञकुंड इथे बनवले जाणार आहेत. देशभरातले ११ हजार पंडित त्याचे पौरोहित्य करणार आहेत. जे होम हवन त्यात होईल, त्यात नेमक्या कोणत्या समिधा पडणार आहेत? यज्ञामुळे देशाची सुरक्षा होईल की नाही याची कल्पना नाही. लाल किल्ला आणि सारा देश मात्र नक्कीच असुरक्षित होईल. विशेष म्हणजे हा तोच लाल किल्ला आहे, ज्याने एकेकाळी मुघल राजवटीचा वैभवकाळ अनुभवला. भारताचे स्वातंत्र्ययुध्द पाहिले. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेच्या कमांडरांवर ब्रिटिशांनी चालवलेला खटला ऐकला. स्वतंत्र भारतात किल्ल्याच्या तटावरून प्रत्येक पंतप्रधानाने राष्ट्राला संबोधित केले. देशाच्या विकासाचे नवनवे संकल्प प्रतिवर्षी ऐकवले. त्याच लाल किल्ल्याच्या साºया ऐतिहासिक स्मृती यज्ञाच्या धुरात विलीन करून टाकण्याचा हा खटाटोप, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी होणाºया यज्ञाच्या नावाखाली होणार आहे. विध्वंसावर उभ्या असलेल्या विचारसरणीने सभ्यतेच्या सीमा ओलांडल्या की ऐतिहासिक स्मृतींचे भग्नावशेषात रूपांतर होते. हा यज्ञ त्यासाठीच तर योजलेला नाही?
सीमेवर शत्रूकडून चढवल्या जाणाºया हल्ल्यांची आक्रमकता वाढत चालली आहे. धारातीर्थी पडणाºया जवानांच्या संख्येत रोज भर पडते आहे. सर्जिकल स्ट्राईक्सचा वापर राजकीय स्वार्थासाठी केल्यामुळे त्याचे उलटे परिणाम सध्या देश भोगतो आहे. भारताच्या एकात्मतेला तडे जाणाºया अनेक घटनाही देशभर घडतच आहेत. कुठे गोरक्षणाच्या नावाखाली तर कुठे लव्ह जिहादच्या नावाखाली. सत्ताधारी पक्षाचे समर्थन करणाºया विविध संघटनांचे उन्मादी वीर उठसूठ कायदा हातात घेतात आणि हिंसाचाराला उत्तेजन देतात. हरियाणातले खट्टर सरकार तर अशा अराजक वीरांना माफी देऊन मोकळेही झालेय. विविध प्रकारच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे राजधानी दिल्लीचे ‘क्राईम कॅपिटल’मधे रूपांतर होते आहे. या अराजकाला प्रतिबंध घालण्यात देशाचे गृहमंत्रालय सपशेल अयशस्वी ठरले आहे. मग लाल किल्ल्यात असा कोणता यज्ञ होतो आहे की ज्याने खरोखर राष्ट्राच्या सुरक्षेची हमी मिळणार आहे? गृहमंत्री राजनाथसिंगांच्या मनात भारताचा असा कोणता नकाशा आहे की देशाच्या सुरक्षेचा ते या यज्ञाद्वारे विमा उतरवणार आहेत?
भारत एकेकाळी साºया जगाचे ज्ञानपीठ होता. आज जगातली अनेक विद्यापीठे वैज्ञानिक संशोधनात भारतापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत. खरं तर आपल्या विद्यापीठांचे संशोधन परदेशी विद्यापीठांच्या बरोबरीला कसे येईल, याचा प्रयत्न व्हायला हवा. आपला सारा फोकस अशा प्रयत्नांवर केंद्रित असायला हवा. त्याऐवजी आपण कोणत्या शतकात देशाला घेऊन चाललो आहोत, याचे भान सरकारला नाही. भाजपचे मंत्री उठसूठ वैदिक संस्कृतीचे गुणगान ऐकवीत असतात. त्यांच्या श्रध्देचा अपमान करण्याचा इथे कोणताही हेतू नाही मात्र वैदिक परंपरांचे पुनरागमन झाले तर अनेकांचे संताप आणि संशयही परत जागृत होतील. त्यातून जे काही नवे प्रश्न निर्माण होतील, त्याला आपण कसे सामोरे जाणार? वैदिक कालखंडाची बौध्दिक गुंगी व आळसामुळे आपण नेमके कुठे पोहोचलो, याचा विचार केला तर आज आपण कुठे उभे आहोत?
कोणत्याही परंपरा काळानुसार विकसित होत असतात. ज्ञानाची परंपराही अनेक पावले पुढे मार्गक्रमण केल्यानेच वाढते. भूतकाळाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला तर अंधश्रध्देत त्याचे रूपांतर झाल्याशिवाय रहात नाही. अंधश्रध्देच्या विरोधात संघर्ष करीत आपल्या प्राणांचे बलिदान करणाºया दाभोलकर, कलबुर्गी, कॉम्रेड पानसरेंना आपण अजूनही न्याय मिळवून देऊ शकलो नाही हे वास्तव आहे. मग राष्ट्राच्या सुरक्षेसाठी यज्ञासारख्या पुरातन परंपरांना श्रध्देच्या मखरात बसवून त्यांचे स्तोम माजवण्यात काय अर्थ आहे? गृहमंत्र्यांना हा देश कोणत्या दिशेने न्यायचा आहे?
योगायोग असा की याच सुमारास बिहारच्या मुझफ्फरपूरला सरसंघचालक मोहनराव भागवत म्हणाले ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अवघ्या तीन दिवसात असे सैन्य उभे करू शकतो की तितकी तयारी करायला भारतीय सैन्यदलाला तब्बल सहा महिने लागतील.’ त्यांच्या या दाव्याचा गांभीर्याने विचार केला तर काही प्रश्न निश्चितच मनात उभे रहातात. भारतीय सैन्यदलाच्या क्षमतेवर भागवतांचा खरोखर विश्वास संपलाय काय? आपल्या प्राणांचे बलिदान द्यायला सदैव तयार असलेल्या भारतीय सैन्यदलाइतकी कठोर शिस्त संघाच्या स्वयंसेवकांमधे आहे काय? सैन्यदलाच्या मनोबलावर भागवतांच्या विधानाचा विपरीत परिणाम झालाच नसेल काय? की देशाच्या संरक्षणाचाही ठेकाही आता संघपरिवारालाच हवा आहे?
राजकीय स्वार्थासाठी कोणत्याही पक्षाने अथवा आपली प्रतिष्ठा वाढवण्याच्या खटाटोपात असलेल्या तथाकथित सांस्कृतिक संघटनेने, सीमेवर लढणाºया जवानांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभे करणे कदापि योग्य नाही. सत्तेच्या मांडवाखाली वावरणाºया संघ परिवाराला मात्र त्याचे भान राहिलेले नाही. याच सुमारास संघ परिवाराच्या आक्रमक सेनेचे स्वयंघोषित सेनापती व भाजपचे खासदार विनय कटियार यांनी आग्य्राच्या ताजमहालाच्या ऐतिहासिक अस्तित्वावर हल्ला चढवला आहे. त्याचे तेजोमहाल अथवा तेज मंदिरात परिवर्तन करण्याच्या ते गर्जना करीत आहेत.
लाल किल्ल्यातला ‘राष्ट्र सुरक्षा यज्ञ’ असो, सीमेवर लढायला तत्पर असलेली भागवतांच्या स्वयंसेवकांची संघसेना असो की ताजमहालच्या ऐतिहासिक अस्तित्वावर कटियारांनी चढवलेला हल्ला; एकाच सप्ताहात घडलेल्या या तीन घटना नेमके कोणते संकेत देत आहेत? सुप्रीम कोर्टात लवकरच अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणाची सुनावणी आहे. केवळ जमिनीच्या मालकीचा वाद असलेला हा खटला आहे, अशा चौकटीत त्याची सुनावणी होणार आहे. याचे संकेत पहिल्याच सुनावणीत न्यायालयाने दिले आहेत. यंदाचे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. चहुबाजूंनी धार्मिक उन्माद वाढवला तर देशापुढचे कळीचे प्रश्न त्यात आपोआप मागे पडतात. या सूत्रानुसार या तीनही घटनांमागचे तर्कशास्त्र तपासले तर मोदी सरकार आपल्या अनेकविध अपयशांवर पांघरुण घालण्यासाठी, देशाला त्याच दिशेने तर ओढू इच्छित नाही?