या आधुनिक बॉन्डचा कर्ता करविता ‘एम’ कोण?
By admin | Published: July 5, 2016 03:38 AM2016-07-05T03:38:45+5:302016-07-05T03:38:45+5:30
असेल तो बॉन्ड; अगदी जेम्स बॉन्ड, पण दूर तिकडे लंडनमध्ये कुणी ‘एम’ बसलेला असतो, तो तिथे बसून कळा फिरवतो, त्याची प्रत्येक हालचाल ठरवतो, जणू तो सूत्रे हलविणारा
- हरिष गुप्ता
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )
असेल तो बॉन्ड; अगदी जेम्स बॉन्ड, पण दूर तिकडे लंडनमध्ये कुणी ‘एम’ बसलेला असतो, तो तिथे बसून कळा फिरवतो, त्याची प्रत्येक हालचाल ठरवतो, जणू तो सूत्रे हलविणारा आणि बॉन्ड त्याच्या हातातलं बाहुलं!
बॉन्ड ज्याप्रमाणे नेहमीच कोणत्या ना कोणत्या ‘मिशन’वर जायला सज्ज असतो त्याचप्रमाणे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामीदेखील सदा लढाईच्या तयारीत असतात. प्रश्न एवढाच की या आधुनिक बॉन्डचा ‘एम’ कोण? त्या बॉन्डची लक्ष्ये वेगवेगळी त्याचप्रमाणे या बॉन्डची सावजंही निरनिराळी. त्या बॉन्डप्रमाणे स्वामींच्या हातात पिस्तूल नाही. त्यांचे आवडते हत्त्यार म्हणजे ट्विटर हॅण्डल वा न्यायालये. ते कोणाच्या जीवाला लक्ष्य करीत नाहीत. त्यांच्या लक्ष्यावर असते संबंधिताची इज्जत आणि इभ्रत. त्यांच्या याच अस्त्राने रघुराम राजन यांना घायाळ केले व त्यांना पुन्हा शिक्षकी पेशाकडे वळण्यास बाध्य केले.
पण स्वामींचे खरे लक्ष्य अरुण जेटली. जेटली चीनमध्ये सूट घालून फिरताना स्वामींना ते हॉटेलच्या वेटरसारखे दिसले. पण, आपण जेटलींचे नाव कुठे घेतले असे सांगून ते लगेच मोकळेही झाले. स्वामींनी राजन किंवा दास यांच्यावर केलेली टीका चुकीची आणि अन्यायकारक असल्याची जी प्रतिक्रिया जेटलींनी व्यक्त केली, तिचा सूड घेण्यासाठी स्वामींनी ‘वेटर’ हा शब्द वापरला हे उघड आहे.
गेल्या शुक्रवारी मात्र स्वामींनी ट्विटरवरून थेट पंतप्रधानांवरच हल्ला केला. मोदींनी दिलेल्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेची टवाळी करताना स्वामी म्हणाले, ‘देशाच्या आर्थिक वाढीचा खरा दर जर मी जाहीर केला तर देशात हल्लकल्लोळ माजेल’. याचा अर्थ आता स्वामी उघडपणे मोदींच्याही विरोधात उभे राहिले आहेत. मागे अॅड. राम जेठमलानी यांनी मोदी आणि जेटली यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली, तेव्हा त्यांना तत्काळ पक्षातून बडतर्फ करण्यात आले. मग प्रत्येकाचा पाणउतारा करणाऱ्या स्वामींचा नेमका त्राता कोण? काहींना वाटते, त्यांना रा.स्व. संघाचे पाठबळ आहे. पण स्वामी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात थेट संबंध नाहीत. मग मोदींनी स्वत:च स्वामींची राज्यसभेवर वर्णी का लावावी हे एक कोडेच आहे. मोदींना स्वामींच्या वर्तणुकीची पूर्ण जाण असचानाही ते राज्यसभेवर गेले म्हणजे त्यांचा राज्यसभेकडचा रस्ता अन्य कोणी प्रशस्त केला? या प्रश्नाचे उत्तर मला वाटते, मोदींसकट त्यांच्या पक्षातील कोणीही स्वामींच्या विरुद्ध कारवाई करायला किंवा साधे बोलायलाही तयार होत नाही त्यातच दडलेले आहे.
येथे कॉँग्रेस आणि भाजपातले एक साम्य आढळून येते. राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंहराव या दोन्ही पंतप्रधानांना प्रणव मुखर्जी आवडत नसत. पण निवडणुकांचे राजकारण दिवसेंदिवस भलतेच महाग होत चालले असल्याने व राजकीय पक्षांना व्यवसाय-उद्योगांकडून निधी तर गोळा करावाच लागत असल्याने नरसिंहराव यांच्या कारकीर्दीच्या अगदी अखेरीस बहुतेक नाईलाजानेच प्रणव मुखर्जी यांना मंत्रिमंडळात दाखल करुन वाणिज्य मंत्रालय देण्यात आले. व्यापार-उद्योग क्षेत्रातील मुखर्जींच्या मित्रांनी पक्षाचे हवे ते काम केले. त्यांच्या याच मित्रांना २०१३ साली मुखर्जी देशाचे पंतप्रधान व्हावेत असे वाटत होते, पण कॉँग्रेसने ते जुमानले नाही.
अखेरीस मुखर्जी देशाचे राष्ट्रपती झाले. पण ते राष्ट्रपती भवनात दाखल होताच व्यापार-उद्योग क्षेत्रातील त्यांच्या मित्रांकडून कॉँग्रेस पक्षाला मिळणारी रसद अचानक बंद झाली. डॉ.सुब्रह्मण्यम स्वामी यांचा जनता पक्ष आधी भाजपात विलीन करून घेतला गेला आणि नंतर लगेचच त्यांची राज्यसभेवर वर्णी लावली गेली.
आज मोदींच्या राजवटीत अनेक बडे भांडवलदार नाराज झाल्याचे दिसतात. देशातील आणि विदेशातील अवैध मालमत्ता शोधून काढण्याचा आणि त्यायोगे रालोआची प्रतिमा सुधारण्याचा जोरात प्रयत्न सरकार करीत आहे. सरकारमध्ये घुसून महत्त्वाची माहिती पैदा करण्याच्या कॉर्पोरेट जगताच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या लिलाव प्रक्रियेत सुसूत्रता आणून टेंडर पद्धतीमध्ये जे घोटाळे होत असत ते थांबविण्यात आले आहेत. थेट परकीय गुंतवणुकीचे सारे दरवाजे मोकळे करण्यात आल्यामुळे देशांतर्गत मक्तेदारी प्रस्थापित करून बसलेल्यांना हादरे बसू लागले आहेत.
कदाचित त्यामुळेच की काय या कॉर्पोरेट जगतामधीलच ‘एम’ कामाला लागला असेल. आणि त्याने हाती ट्विटरचे शस्त्र घेतलेल्या ‘बॉण्ड’ला मिशनवर पाठविले असेल!