खोतकर खरेच लढणार का? दानवेंचा घाम काढणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 08:00 AM2019-03-12T08:00:00+5:302019-03-12T08:00:08+5:30

अजूनही खोतकर लोकसभा लढवण्याची भाषा बदलत नाहीत. म्हणजे त्यांना नेमके काय हवे आहे?

Will Arjun Khotkar really fight for jalana constituency against Raosaheb Danave? | खोतकर खरेच लढणार का? दानवेंचा घाम काढणार का ?

खोतकर खरेच लढणार का? दानवेंचा घाम काढणार का ?

googlenewsNext

- सुधीर महाजन

निवडणुका जाहीर झाल्या, त्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेची गाठ पुन्हा बांधली गेली तरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हट्ट का सोडत नाहीत? खा. रावसाहेब दानवेंशी दिलजमाई करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले आणि झाले गेले गंगेला मिळाले, अशा शब्दांत दोघांचे मनोमिलन घडवून आणले तरी अजूनही खोतकर लोकसभा लढवण्याची भाषा बदलत नाहीत. म्हणजे त्यांना नेमके काय हवे आहे? एक तर निवडणूक लढवायची असेल तर सेना त्यांना उमेदवारी देणार नाही आणि काँग्रेस त्यांना तिकीट देणार असे गृहीत धरले तरी खोतकर काँग्रेसला कितपत पचनी पडतील, हाही एक मुद्दा आहेच. कारण कैलाश गोरंट्याल यांना ते कितपत मान्य होईल.

खोतकर कोणाच्या बळावर लोकसभा लढवू पाहतात याचा आढावा घेतला, तर सिल्लोडमधून आ. अब्दुल सत्तारांचा त्यांना उघड पाठिंबा दिसतो. गेल्या दीड-दोन वर्षांपासून सत्तार आणि खोतकर यांची जवळीक वाढली आहे. इकडे दानवेंना पराभूत करण्याचा तिढा सत्तार यांनी उचलला आणि त्यासाठी खोतकर उपयुक्त प्यादे ठरू शकतात, असे वरकरणी दिसते आणि त्याच धोरणात गेल्या दीड-दोन वर्षांपासून हे निवडणूक लढण्याचे दबावतंत्र चालू आहे. सत्तार यांचा संपूर्ण पाठिंबा, जालना विधानसभेतील त्यांची स्वत:ची ‘मतपेढी’ आणि अंबडमधून राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्याकडून मिळणारी रसद एवढ्या शिदोरीवर खोतकर रावसाहेबांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात.

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे हे २ लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले असले तरी ती काही त्यांची मते नव्हती. देशभरात निर्माण झालेल्या ‘मोदी लाटे’चा तो परिणाम होता. रावसाहेबांची खरी परिस्थिती तपासायची असेल तर २00९ च्या निवडणुकीचा आधार घ्यायला पाहिजे. त्यावेळी ते अवघ्या साडेआठ हजार मतांनी विजयी झाले होते. लोकसभेसाठी हा विजय निसटता समजला जातो. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा मुलगा संतोष हे भोकरदनचे आमदार आहेत. मुलगी जि.प. सदस्या आहे. खोतकरांमुळेच ती अध्यक्ष होऊ शकली नाही. सर्व सत्ताकेंद्र दानवेंकडे असली तरी तीच त्यांच्याविषयीच्या नाराजीची कारणे ठरू शकतात. हे सर्व त्रैराशिक मोडूनच खोतकर लढण्याची भाषा करतात; पण आता मध्येच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून घूमजाव केले होते. ‘मातोश्री’वरही त्यांच्या कानावर समजुतीच्या चार गोष्टी घातल्या गेल्या. सारी निरवानिरव झाली असताना पुन्हा त्यांनी लढण्याची भाषा सुरू केली.

याचवेळी परवा सत्तार-दानवेंचे दिलखुलास गप्पा करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावरून सगळीकडे परसले. त्यामुळे पुन्हा एकदा खोतकरांच्या हट्टाकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास सुरुवात झाली. त्यांना नेमके काय हवे आहे, याची लोक चर्चा करायला लागले. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे. या समितीत झालेल्या गैरव्यवहाराचा तपास चालू आहे. याशिवाय जो जालना सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडे आहे, तेथेही गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत. त्याचीही चौकशी चालू आहे. चौकशीची ही भुतावळ गाडून टाकण्यासाठी तर ही लढण्याची भाषा नाही ना? अशी जोरदार चर्चा आहे. याशिवाय आणखी काही छोटी-मोठी प्रकरणे आहेतच. यातून त्यांना सहीसलामत सुटका हवी आहे म्हणूनच ते दानवेंना आव्हान देतात आणि दबाव वाढवतात. चर्चाच त्या, लोकांच्या तोंडाला कोण हात लावणार? प्रश्न मात्र अजून कायम आहे. खोतकर खरोखरच लढणार का?

Web Title: Will Arjun Khotkar really fight for jalana constituency against Raosaheb Danave?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.