मुंबईचा धडा नाशिक घेणार का?

By किरण अग्रवाल | Published: August 31, 2017 07:55 AM2017-08-31T07:55:25+5:302017-09-07T20:12:43+5:30

कोणतीही आपत्ती कधीही सांगून येत नसते हे खरेच, पण एकदा अशा आपत्तीचा फटका बसून गेला असताना किंवा तोंड पोळले गेल्यावरही त्यापासून काही बोध घेतला गेला नाही तर होणाऱ्या नुकसानीला अगर हालअपेष्टांना निसर्गाइतकेच संबंधित यंत्रणांना जबाबदार धरले जाणे स्वाभाविक ठरते.

Will Mumbai take the chapter of Nashik? | मुंबईचा धडा नाशिक घेणार का?

मुंबईचा धडा नाशिक घेणार का?

Next

कोणतीही आपत्ती कधीही सांगून येत नसते हे खरेच, पण एकदा अशा आपत्तीचा फटका बसून गेला असताना किंवा तोंड पोळले गेल्यावरही त्यापासून काही बोध घेतला गेला नाही तर होणाऱ्या नुकसानीला अगर हालअपेष्टांना निसर्गाइतकेच संबंधित यंत्रणांना जबाबदार धरले जाणे स्वाभाविक ठरते. नुकत्याच मुंबईत झालेल्या व तत्पूर्वी नाशकातही बरसून गेलेल्या धुवाधार पावसाचा अनुभव त्याचदृष्टीने, म्हणजे पाऊस पाण्याच्या निचऱ्याच्या संबंधाने महापालिकांच्या यंत्रणांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
दोन दिवसांपूर्वी मंगळवारी (दि. २९ ऑगस्ट) मुंबईत झालेल्या ‘आभाळफाड’ पावसाने समस्त मुंबईकरांची दाणादाण उडविली. अवघ्या ९ ते १० तासांत सुमारे ३०० मिमी इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या या विक्रमी पावसाने २६ जुलै २००५ रोजी झालेल्या जलप्रलयाचीच आठवण करून दिली. मुंबईची लाईफ लाईन म्हणणविणाऱ्या लोकल सेवेबरोबरच रस्ता वाहतूक व विमानसेवाही कोलमडली. पावसामुळे वाहतूक खोळंबल्याने ठिकठिकाणी अडकून पडलेल्या चाकारमान्यांच्या चिंतेने अनेक कुटुंबीय धास्तावलेत. शासकीय कार्यालये, शाळांना सुटी देण्यात आली, पण माणसं-मुलं वेळेत घरी पोहोचू न शकल्याने अनेकांनी जी हृदयाची धडधड अनुभवली ती शब्दात मांडता येऊ नये. या अनुभवातून पुन्हा तोच सनातन प्रश्न उपस्थित झाला, मुंबईतील पाऊस-पाण्याच्या निचऱ्याचे काय? महापालिका नगर नियोजनाबाबत काय करतेय?

मुंबईलगत असलेल्या नाशकातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. गेल्या १४ जून रोजी एका तासात तब्बल ९२ मिमी पाऊस झाल्याने नाशिककरांची झोप उडाली होती. नाशिकच्या मध्यवस्तीतून वाहणाºया गोदावरीच्या पुराने अनेकांना फटका दिला. घरातून- दुकानांतून थेट रस्त्यावर आणून ठेवले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कविता यासंदर्भाने आठवायची तर,

गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले।

पण निसर्गच कोपला व एवढा पाऊस झाला तर आपण काय करणार? असे म्हणत महापौरांनी हात टेकल्यागत भूमिका प्रदर्षिली. निसर्ग सांगून फटका देत नसतो, पण पूर्वानुभवातून संकेत घेऊन काही उपाय योजले तर या फटक्याची तीव्रता नक्कीच बऱ्यापैकी कमी करता येऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही ही खेदाची बाब आहे. एका तासांत ९२ मिमी पाऊस होत असताना नाशकातील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइन्स अवघ्या २७ मिमी क्षमतेच्या असल्याचे यानिमित्ताने लक्षात आले. तेव्हा, निसर्गाचा वाढता लहरीपणा पाहता या पाइपलाइन्सला पर्यायी व्यवस्था करण्याबाबत विचार होणे अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे, असे पहिल्यांदाच घडलेले नाही. गेल्यावर्षी २ ऑगस्ट २०१६ रोजीही मुसळधार पावसाने व गोदेला आलेल्या पुराने होणारी जीवितहानी टाळण्यासाठी थेट लष्कर बोलवावे लागते की काय याची चर्चा करण्याची वेळ आली होती. त्याहीपूर्वी १९ सप्टेंबर २००८ रोजी तर नाशिककरांनी महापूर अनुभवला आहे. त्यावेळी उडालेली दाणादाण आठवली तर आजही जिवाला कापरे भरते. चांदवडकर लेनपर्यंत व प्रसिद्ध सरकारवाड्याच्या नवव्या पायरीपर्यंत तेव्हा पुराचे पाणी आले होते. त्यामुळे पूररेषा निश्चितीचा विषय गाजून काही निर्णयही घेण्यात आले होते. पण पुढे त्याबाबत फारसे गांभीर्य बाळगले गेलेले दिसले नाही. नदीपात्राचे संकुचित होणे सुरूच आहे. साधी नाले सफाई नीट होत नाही, अशा अनेक बाबी आहेत. त्याकडे लक्ष द्यायला हवे, पण ते होत नाही.
नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदापात्रातच उभी असलेली दुतोंड्या मारुतीची मूर्ती नाशिककरांसाठी पर्जन्यमापक मानली जाते. ‘दुतोंड्या’ बुडाला की नाशिकच्या गाडगे महाराज पुलाला पाणी लागते व गोदाकाठी दैना उडते. या ‘दुतोंड्या’जवळच असलेल्या नारोशंकराच्या मंदिरातील घंटेला पुराच्या पाण्याने स्पर्श केला तर पुढे चांदोरी, सायखेडा या गावात तसेच कोपरगावच्या बाजारपेठेत पाणी शिरते; असे काही संकेत प्ररस्थापित आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत गोदावरीला चार पूर गेले असून, १४ जून रोजी ‘दुतोंड्या’चे पूर पाण्यात पूर्ण स्नान घडून आले आहे. अशा वेळी वा आपत्ती ज्या ज्यावेळी येते तेव्हा ती टाळण्याबद्दल वांझोटी चर्चा घडून येते व निसर्गापुढे हतबलता व्यक्त करून हात वर करण्याचे प्रकार घडून येतात. त्यामुळे प्रत्येकच वेळी नव्याने संकटाला सामोरे जाण्याची व परीक्षेला बसण्याची वेळ येते. त्या त्यावेळी मुंबईकरांचे ‘टीम स्पीरीट’ जसे दिसून येते तसे नाशकातही ते दिसते. नागरिकच एकमेकांच्या मदतीला धावतात. कोसळलेल्यांना उभारण्याचा हात देतात. पण, यंत्रणा केवळ कागदे नाचवून थांबू पाहतात. तेव्हा, मुंबईत उडालेल्या हाहाकारानेच काय, नाशकातही यापूर्वी घडून गेलेल्या पूरप्रपातातून धडा घेऊन अशा आपत्तीतूनही बचावण्याची व्यवस्था साकारली जाणे गरजेचे आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था सुधारणे, पावसाळी गटार योजनेतील उणिवा दूर करणे, पाणी तुंबण्याची ठिकाणे हेरून तेथे विशेष उपाय योजणे, पावसाळी नाल्यांची क्षमता वाढविणे यांसारख्या मुद्द्यांकडे त्यासंदर्भाने लक्ष दिले जावे इतकेच यानिमित्ताने.
 

Web Title: Will Mumbai take the chapter of Nashik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई