हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली -
कोणाच्या डोक्यातही येणार नाही, अशा गोष्टी करण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. यात ते मोठा धोकाही पत्करत असतात. आपल्या निर्णयांनी इतरांना धक्का देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. राजधानी दिल्लीत हल्ली कानावर येते त्यानुसार २०२४ची लोकसभा निवडणूक दक्षिण भारतातून लढवण्याचा विचार मोदी सध्या करत आहेत. भारतीय जनता पक्षासाठी दक्षिणेची दारे उघडून घेण्याचा हेतू त्यामागे आहे. पाच दक्षिणी राज्यांमधून भाजप किमान ६० जागा कशा जिंकू शकेल, याचा एक अंदाज मांडायला पंतप्रधानांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सुचवले आहे. सध्या भाजपला कर्नाटकात चांगला जनाधार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने २८पैकी २५ जागा जिंकल्या. तेलंगणातील १७ पैकी ४ जागाही पटकावल्या. पण, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात पक्षाच्या हाती फारसे काही लागले नाही. या राज्यांबरोबरच तेलंगणातील संख्याबळ वाढवण्याचेही भाजपचे प्रयत्न आहेत. दक्षिणेतला पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी मोदी पक्षनेतृत्त्वापुढे नेमके प्रश्न ठेवत आहेत. केरळ कदाचित कठीण जाईल. तामिळनाडूत जोर लावायला हरकत नाही, असा एकूण मतप्रवाह दिसतो. याच चर्चेत पुढे आलेली एक कल्पना मोठी लक्ष वेधून घेणारी आहे. सध्या नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत; येत्या निवडणुकीत ते तामिळनाडूतून उभे राहिले तर? मोदी यांनी रामनाथपुरम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी भरली तर भाजपची ही दक्षिणेतील लढाई रंगू शकते. हिंदी पट्टा, पश्चिम भारत, ईशान्येकडे पक्षाला आता खूप काही मिळवण्यासारखे राहिलेले नाही. या भागातून फार तर आणखी वीसेक जागा पक्षाच्या पदरात पाडून घेता येतील. म्हणून कोणाच्याही डोक्यात येणार नाही असे काही तरी आता केले पाहिजे, असे भाजपच्या गोटात चर्चिले जात आहे.तामिळनाडूत भाजपची सूत्रे हिंदुत्त्वाची कार्यक्रमपत्रिका हातात देऊन एका आयपीएस अधिकाऱ्याच्या हाती दिलेली आहेत. काशी आणि तामिळनाडूतले अनुबंध पुनर्प्रस्थापित करण्याच्या हेतूने गेल्या नोव्हेंबरमध्ये राज्यात महिनाभराचा कार्यक्रम घेण्यात आला. शेकडो कार्यकर्ते त्यात सामील झाले होते. तामिळनाडूचा पारंपरिक पोशाख करून पंतप्रधान तेथे गेले. थोडे तमिळही बोलले. अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षाच्या दोन गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही भाजप कसोशीने करत आहे. दुसरे म्हणजे रामनाथपुरमशी रामाचे नाते आहे. रामसेतू राष्ट्रीय वारसा जाहीर होण्याची शक्यता आहे; प्रकरण सध्या कोर्टासमोर आहे. पंतप्रधानांनी दोन लोकसभा मतदारसंघातून उभे राहावे काय? - असाही एक पर्याय चर्चेत आहे. उत्तर प्रदेशात पक्षाला पंचाहत्तर जागा खिशात टाकण्याची अपेक्षा आहे. मोदी दुसरीकडून उभे राहिले तर या राज्यात त्याचे काय परिणाम होतील, याचाही विचार करावा लागेल. त्यामुळे अंतिम फैसला अद्याप व्हायचा आहे. सन २०२४ मध्ये निवडणूक आयोग आठ टप्प्यातल्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करील; तेव्हाच या रहस्याची उकल होईल!राज्यसभेच्या दोन जागा रिक्तराज्यसभेवर १२ खासदार नामनियुक्त केले ज़ातात; पैकी दोन जागा साधारणत: वर्षभर भरल्या गेलेल्या नाहीत. सरकारने गतवर्षी पाच सेलिब्रिटीना राज्यसभेवर नेमले. प्रत्येकाची निवड मोदी यांच्या कठोर विचारप्रक्रियेतून केली गेली होती. महान धावपटू पी. टी. उषा यांची निवड केरळमधून केली गेली. डॉक्टर विरेंद्र हेगडे कर्नाटकचे आहेत. संगीतकार इलिया राजा तामिळनाडूचे, सिने पटकथालेखक - दिग्दर्शक व्ही. विजेंद्र आंध्रचे आहेत. चारही जण दक्षिणी राज्यांतून आलेले आहेत. या सगळ्यावर कडी म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधून आलेले अनुसूचित जातीतील नेते गुलाम अली यांना मोदी यांनी नाम नियुक्ती दिली. यातल्या कोणीही भाजपत प्रवेश केलेला नाही. सोनल मानसिंग यांच्यासारख्या नाम नियुक्त खासदारांनी यापूर्वी पक्षात प्रवेश केला होता. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यात आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. तिथून कोणातरी दोघांची निवड होईल, असे आता मानले जात आहे. पद्म पुरस्कारांची यावेळची यादी पाहिली तरी एक गोष्ट लक्षात येईल : सगळा भर दक्षिण भारतावर होता!