अतुल कुलकर्णी|
प्रिय सुभाष देसाई साहेब,जय महाराष्ट्र.एक काम जोरात केलं. त्या नाणारची अधिसूचना रद्दची घोषणा केली ते बरं झालं. आता करा म्हणावं त्या भाजपावाल्यांना काय करायचं ते. आता ना नाणार ना गाणार... पण साहेब, एरव्ही माध्यमांना बाईट देण्यासाठी कंजुषी करणारे आपले मा.मु. ऊर्फ देवेंद्रभाऊ काल चक्क बाईट देण्यासाठी थांबले आणि अधिसूचना रद्द केलेली नाही असं सांगून टाकलं ना त्यांनी. त्यामुळे नाणारला प्रकल्प होणार की नाही, यापेक्षाही मिलियन डॉलर क्वश्चन झालाय अधिसूचना आहे की नाही...? याचा. ते म्हणतात, आपल्याला अशी अधिसूचना रद्द करायचा अधिकारच नाही, चक्क आपल्याला अधिकार नाही म्हणतायतं... आपण अजून सत्तेत आहोत साहेब, तरीही हे असं बोलतायंत. हे काय बरोबर नाही साहेब... थेट आपल्याला चॅलेंज देतात म्हणजे काय? आता आपल्या स्वाभिमानाचा सवाल आहे साहेब, काहीही करा आणि अधिसूचना रद्द करून टाका. नाहीतर आपलं त्या कोकणातल्या स्वाभिमानी नेत्यासारखं व्हायचं. त्यांनी नाही का स्वाभिमान सोडून कमळ जवळ केलं. आता तो रद्द केलेला जीआर की फीआर फेकून मारा या सरकारच्या तोंडावर. म्हणजे हा सूर्य, हा जयद्रथ होतो की नाही पाहा...खासगीत सांगतो साहेब, मंत्रालयातले एक अधिकारी म्हणत होते, जोपर्यंत अधिसूचना कायम आहे तोपर्यंत आपले बोलणे म्हणजे पोकळ धमकीच. शिवाय एकाने तर आणखी वेगळीच माहिती दिलीय. आपण उद्योग खाते सोडून द्यावे असा प्रस्ताव आपल्याला भाजपाने दिला होता म्हणे. कारण काही करून त्यांना नाणार प्रकल्प करूनच घ्यायचाय. एकदा का आपण हे खाते सोडले की भाजपवाले प्रकल्प पूर्ण करून घेतील आणि आपल्याला त्या बदल्यात दुसरी दोन खाती पण मिळतील म्हणे. त्यामुळे आपल्या साहेबांनी अचूक टायमिंग साधून भाजपाची कोंडी केली म्हणतात? आता खाते सोडावे तरी आपले साहेब हिरो आणि नाही सोडावे तरी आपला विरोध कायम... हे नेमकं काय गौडबंगाल आहे ते सांगून टाका साहेब.आपल्या साहेबांनी त्या नाणार प्रकल्पावर हातोडा मारला खरा, पण जर का ती अधिसूचनाच रद्द झाली नाही तर सगळं मुसळ केरात जाणार. नाहीतरी आपली इमेज विचित्र झालीयं. आपण ना इकडचे ना तिकडचे. सत्तेत असून भाजपावाले आपल्या विरोधातले समजतात आणि विरोधक आपल्याला गांडूळ म्हणून चिडवतात. त्यामुळे आम्हाला नेमकं काय करावं काही कळेनासं झालयं. तेव्हा काय ते बघा जरा...तरी बरं आपल्या साहेबांनी एवढी मस्ती असेल तर प्रकल्प रेटून दाखवा अशी धमकी दिलीय ते बरं झालं. पण साहेब, ती धमकी सुकी आहे की ओली...? की नेहमीप्रमाणे भाजपावाले या कानाने ऐकतील आणि त्या कानाने सोडून देतील आपली धमकी... तसं झालं तर मग लोक पुन्हा आपल्याला गांडूळ म्हणू लागतील. आपलं तर डोकं काम करेनासं झालंय. या तुमच्या धरसोडीमुळं कार्यकर्ते देखील बिथरलेत साहेब. ते म्हणतात, तुमचं आधी काय ते ठरवा, विरोध आहे की सोबत आहे...? मग आम्हाला कामं सांगा, नाहीतर आम्हाला दरवेळी तोंडावर का पाडता असंही म्हणत आहेत साहेब...