- रवी टालेसत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या झारखंडमधील राष्ट्रीय नेत्याने महाराष्ट्रातील अकोल्यासारख्या जिल्हा मुख्यालयी विदर्भातील शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडावे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्याच मागण्या मान्य करून, आंदोलनाची इतिश्री करावी! सारेच कसे अगम्य, अनाकलनीय!गत आठवड्यातील अकोल्यातील या घटनाक्रमाने विविध राजकीय पक्षांचे नेते, शेतकरी नेते, राजकीय विश्लेषक, पत्रकार अशा सगळ्याच घटकांना बुचकळ्यात पाडले. यशवंत सिन्हा यांनी शेतकºयांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडण्यासाठी अकोल्याचीच निवड का केली, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा, मग प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला. कुणाला त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे कटकारस्थान दिसले, कुणाला विरोधी पक्षांची हवा काढण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न दिसला, तर कुणाला भाजपामध्ये स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या अंतर्गत कलहाचा पुढील अध्याय दिसला.पूर्वी आपल्या देशात काहीही अवांछित घडले, की काही लोकांना त्यामागे परकीय हात असल्याचा साक्षात्कार होत असे. हल्ली विदेशी हाताची जागा संघाच्या स्वदेशी हाताने घेतली आहे! संघ आणि भाजपाच्या इशाºयावरूनच सिन्हा अकोल्यात दाखल झाल्याची मांडणी करणाºयांनी, सिन्हांची नाळ संघाशी नव्हे, तर समाजवाद्यांशी जुळली असल्याची आणि त्यांनी २०१४ पासूनच भाजपाच्या विद्यमान नेतृत्वाच्या विरोधात आघाडी उघडली असल्याची वस्तुस्थितीही विचारात घेतली नाही. सिन्हांप्रमाणेच, त्यांना अकोल्यात आमंत्रित करणाºया मंडळीपैकीही कुणी संघाशी जुळलेला नाही. त्यांनी सिन्हांसोबतच नाना पटोले, राजू शेट्टी या भाजपावर नाराज असलेल्या खासदारद्वयांनाही आमंत्रित केले होते. मग पटोले व शेट्टीही संघ व भाजपाच्या कारस्थानात सहभागी होते का? आणि संघ किंवा भाजपाला कटकारस्थान करून सिन्हांना पाठवायचेही होते, तर अकोलाच का?वस्तुस्थिती ही आहे, की ज्या शेतकरी जागर मंच नामक संघटनेने आंदोलन छेडले होते, ती संघटना नवी आहे. त्या संघटनेकडे कोणतेही मोठे नाव नाही. त्यामुळे गत महिन्यात एका व्याख्यानाच्या निमित्ताने अकोल्यात निमंत्रित केलेल्या यशवंत सिन्हा यांनाच त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी निमंत्रण दिले आणि सध्या राजकारणात अवकाश शोधत असलेल्या सिन्हांनी ती संधी साधली!यशवंत सिन्हा यांनी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा आयताच चालून आलेला ‘मौका’ हेरला; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘मौके पे चौका’ हाणून, विरोधकांच्या भात्यातील अस्त्र अलगद काढून घेतले. विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकºयांच्या प्रश्नांवर विरोधक आपल्याला घेरणार, याची मुख्यमंत्र्यांना पुरेपूर कल्पना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर मोर्चाची तयारी चालविली आहे. आपण मागे राहू नये, याची काळजी काँग्रेसही घेणारच आहे. सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाही वार करणारच आहे. या पार्श्वभूमीवर, सिन्हांच्या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकºयांच्या प्रमुख मागण्या मान्य करून, विरोधकांचे शस्त्र बोथट करण्याची चतूर खेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
यशवंत सिन्हांचा ‘मौका’; मुख्यमंत्र्यांचा ‘चौका’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 4:06 AM