यशवंत सिन्हा भाजपाबाहेर पडण्याच्या मानसिकतेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:07 AM2018-04-20T00:07:24+5:302018-04-20T00:39:35+5:30

नेतृत्वाविरोधात भाजपा खासदारांनी बंड पुकारावे असे आवाहन सिन्हा यांनी केले आहे.

Yashwant Sinha's mentality in leaving the BJP | यशवंत सिन्हा भाजपाबाहेर पडण्याच्या मानसिकतेत?

यशवंत सिन्हा भाजपाबाहेर पडण्याच्या मानसिकतेत?

Next

-हरीश गुप्ता
(लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर)


वरिष्ठ भाजपा नेते यशवंत सिन्हा हे भाजपा बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. भाजपाच्या नेतृत्वाने जनतेला दिलेल्या अभिवचनांचे पालन केले नाही म्हणून नेतृत्वाविरोधात भाजपा खासदारांनी बंड पुकारावे असे आवाहन सिन्हा यांनी केले आहे. त्यावरून ते पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत असे वाटू लागले आहे. येत्या शनिवारी यशवंत सिन्हा पाटण्यात जाणार असून तेथेच ते काही महत्त्वाची घोषणा करून आपल्या भविष्याची दिशादेखील स्पष्ट करतील असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी यशवंत सिन्हा नाराज आहेत आणि त्यांनी सरकारच्या अनेक मुद्यांच्या विरोधात आवाजही उठविला आहे. पण अडवाणी युगातील या नेत्याकडे मोदींनी तसेच पक्षनेतृत्वाने आजवर दुर्लक्षच केले आहे. यशवंत सिन्हा यांच्या जम्मू-काश्मीर प्रश्नावरील पुढाकारासह त्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांविषयी पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. पण पक्षाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे टाळले. कारण यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा हा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह एका व्यासपीठावर उपस्थित राहून यशवंत सिन्हा यांनी पक्षनेतृत्वाला डिवचले आहे. अलीकडच्या काळात त्यांच्या संयमाचा बांध तुटल्याने ते पक्षत्याग करण्याच्या मन:स्थितीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाटणाभेटीकडे पक्ष नेतृत्वाचे लक्ष लागले आहे. कारण तेथेच ते आपल्या भविष्यातील वाटचालीसंबंधी घोषणा करण्याची शक्यता आहे. उपोषण करणाऱ्या आप पक्षाच्या नेत्या स्वाती मालीवाल यांच्या भेटीस भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा गेल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या या हालचालींची गंभीर दखल घेतली आहे. पण शत्रुघ्न सिन्हा हे यशवंत सिन्हा यांच्या मोर्चात सामील होतील का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भाजपाच्या दलित नेत्यात असंतोष
भाजपाच्या बहरीच येथील खासदार सावित्रीबाई फुले यांनी जदयूचे नेते शरद यादव यांची भेट घेतल्याने भाजपा नेतृत्वाने आकांडतांडव केले आहे. आपलेच सरकार आरक्षण संपविण्याच्या मानसिकतेत असल्याच्या संशयावरून श्रीमती फुले यांनी निषेध मोर्चा आयोजित केला होता. त्यानंतर त्यांनी शरद यादव यांची भेट घेतली. २ एप्रिल रोजी दलितांनी भारत बंदचे आयोजन केले होते. त्याचा परिणाम भाजपामधील दलित नेत्यांवर झालेला पहावयास मिळाला. दलितांचे विषय भाजपा ज्या पद्धतीने हाताळीत आहे, त्याविषयी पक्षातील दलितात नाराजी आहे. त्यामुळे भाजपाचे चार खासदार शरद यादव यांच्या संपर्कात असल्याचे कळते. भाजपाचे एक दलित खासदार उदित राज यांनी याबाबतीत आवाज उठविला असून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न खुद्द पंतप्रधानांनी केला. इतकेच नव्हे तर दिल्लीतील आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटनासाठी मेट्रो रेलने जाताना त्यांनी उदित राज यांनाही सोबत घेतले. केद्रीय मंत्री आणि लोजपचे नेते रामविलास पासवान यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप केल्यामुळे केंद्र सरकारची कुचंबणा झाली आहे. आता सरकारने रिव्ह्यूसाठी अर्ज केला असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला शह देण्यासाठी वटहुकूम काढण्याचे केंद्राने मान्य केले असले तरी सरकारविषयी अविश्वास बळावल्याचे दिसून येत आहे.

सपा-बसपाचा काँग्रेसला ‘दे धक्का!’
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतील यशाने विरोधकात तसेच काँग्रेस पक्षातही उत्साहाचे वातावरण आहे. पण उत्तर प्रदेशात तरी काँग्रेससाठी स्थिती चांगली नाही. उत्तर प्रदेशात निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने स.पा., ब.स.पा. यांच्यात समझोता झाला आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. पण काँग्रेसने फुलपूर आणि गोरखपूर मतदारसंघात आपले हात भाजून घेतले आहेत अशी टीका अखिलेश यादव यांनी अनेक मुलाखतीतून केली आहे. अखिलेश यांना वरिष्ठ काँग्रेस नेते भेटले तेव्हा काँग्रेसची मते सपा-बसपा नेत्यांकडे वळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते आणि काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असेही सुचविले होते. काँग्रेसविषयी सद्भावना व्यक्त करण्यासाठी अमेठी आणि रायबरेली येथे सपा-बसपा यांचे उमेदवार देणार नाही हे त्यांनी मान्य केले. काँग्रेसला खूष करण्यासाठी मायावतींना दुखवणे आम्हाला जमणार नाही हेही अखिलेश यादवनी स्पष्ट केले. मायावती काँग्रेसवर नाराज असल्याने कर्नाटकात त्यांनी देवेगौडा यांच्या पक्षाशी हातमिळवणी केली आहे, असेही अखिलेश यांनी स्पष्ट केले. सपा-बसपा युती ही काँग्रेससाठी ४ ते ५ लोकसभा जागा सोडण्यास तयार आहे असे सूत्रांकडून समजते. अजितसिंग यांच्या आर.एल.डी.साठी दोन जागा सोडण्याची त्यांची तयारी आहे.

मिस्त्रींनी टाटा ग्रुप सोडण्यासाठी सौदेबाजी
मिस्त्री यांच्या मालकीच्या शापुरजी पॅलनजी ग्रुपने टाटा ग्रुप आॅफ कंपनीतील स्वत:ची १८ टक्के भागीदारी सोडून ग्रुपमधून बाहेर पडण्यासाठी टाटांनी मिस्त्रींना एक लाख कोटी रुपये देऊ केले आहेत. मिस्त्रीच्या समभागांचे बाजारमूल्य एक लाख कोटी रुपयापेक्षा कमी आहे. सायरस मिस्त्रींना टाटा ग्रुप आॅफ कंपनीजच्या चेअरमन पदावरून हटविल्यापासून दोन्ही गट एन.सी.एल.टी. मध्ये लढाई लढत आहेत. टाटा ग्रुप आॅफ कंपनीजमधून मिस्त्री यांनी बाहेर पडावे यासाठी कोर्टाबाहेर तडजोड करण्याचा टाटांचा असा प्रयत्न आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेस नेत्यात सुंदोपसुंदी
मध्य प्रदेशातील काँग्रेसची अवस्था चांगली नाही. काँग्रेस पक्षाच्या मध्य प्रदेशातील १५ वर्षाच्या वनवासानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना खाली खेचण्याची आशा काँग्रेस पक्ष बाळगीत आहे. त्यादृष्टीने काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे दिग्विजयसिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राहुल सिंग यांची बैठक आयोजित केली होती. मध्य प्रदेश काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा असे राहुल गांधींना वाटत होते. पण ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाला दिग्विजयसिंग यांनी विरोध केला. कमलनाथ यांनी मात्र शिंदे यांचे समर्थन केले. राहुल सिंग यांनीही त्यांच्या नावास विरोध केला आहे. सर्व राज्यात तरुणांना स्थान देण्याची राहुल गांधींची इच्छा असून त्यांनी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांची निवड केली आहे.

 

Web Title: Yashwant Sinha's mentality in leaving the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.