Yoga: योगशास्त्राच्या परंपरेचा प्राचीन धागा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:51 AM2022-06-21T05:51:15+5:302022-06-21T05:51:53+5:30
International Yoga Day: आज जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने योगशास्त्राचे प्राचीनत्व विशद करणारा विशेष लेख !
- श्री श्री रविशंकर
(संस्थापक, आर्ट ऑफ लिव्हिंग)
ज्ञान संपादन करणे आणि नंतर ते पुढच्या पिढीला देणे ही क्षमता केवळ मानवाला प्राप्त झालेली आहे. त्यामुळेच ज्ञानाच्या विविध शाखा निर्माण झाल्या. इलेक्ट्रॉनिक्सचा जन्म काही एका दिवसात झालेला नाही. एका माणसाने तो शोध लावला नाही. इतकेच नव्हे तर एकाच्या आयुष्यात लागला, असेही नाही. काही शतके त्यासाठी खर्ची पडली. एका माणसाने वैद्यक शोधले नाही किंवा एकाच आयुष्यात ते सापडले, असेही नाही. त्यासाठी कित्येक पिढ्या लागल्या. कित्येक वर्षे लोटली, शतके उलटली आणि त्यानंतर आपण आज आहोत तेथे पोहोचलो.
कुठलीही विज्ञानाची शाखा घ्या, एखादे विज्ञान, तत्त्वज्ञान किंवा कला घ्या; त्यांचा विकास व्हायला, आज ती शास्त्रे - कला जिथे आहेत तिथे पोहोचायला पिढ्या उलटाव्या लागल्या.
वैद्यक, पदार्थविज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि गणित अशा सगळ्याच विषयांत आपल्याला एक परंपरा दिसते. भगवान कृष्ण गीतेच्या ४ थ्या अध्यायाच्या प्रारंभीच म्हणतात..
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्।
विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ।।
कृष्ण अर्जुनाला सांगतात, “अगणित वर्षांपूर्वीपासून ही योगशास्त्राची परंपरा येथे आहे. विवस्वानाला मी योग शिकविला, त्याने मनूला शिकविला आणि मनूने इक्ष्वाकुला तसेच इतर राजांना योगाची दीक्षा दिली!’’
- शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा आहे. कालौघात मध्ये कुठेतरी ती लुप्त झाली. नीट समजून घेतली गेली नाही. काही काळ लोटला की विज्ञानाचा विपर्यास होतो आणि मग त्याची पुनर्मांडणी, उजळणी करून घेण्याची, ते पुन्हा समजून घेण्याची वेळ येते. मानवी इतिहासात हे असे फार आधीपासून घडत आले आहे. जे ज्ञान संपादन केले जाते ते कुठेतरी हरवते आणि नंतर पुनरुज्जीवित केले जाते.
ज्ञानाचे पुनरुज्जीवन, परंपरेची फेरमांडणी पुन्हा पुन्हा होत आली आहे. कारण, परंपरा मौलिक असतात. परंपरा म्हणजे लक्षावधी लोकांचा अनुभव. त्यांनी लक्षावधी वर्षांत घेतलेला अनुभव!
याच धर्तीवर सध्याचे योगशास्त्र तयार झाले आहे. त्यात सुधारणा करून पुन्हा प्राण ओतण्यात आले आहेत. ती काही एका माणसाने एका दिवसात केलेली निर्मिती नाही. ती परंपरा आहे. म्हणून परंपरा मौल्यवान असते. एका माणसाने त्याच्या आयुष्यात मटेरिया मेडिका सिद्ध केलेले नाही तर तो अनेक लोकांच्या अनुभव संचिताचा परिणाम आहे. ते खात्रीशीर अचूक आणि मूळचे आहे. अनुभवांती तपासणीतून ज्ञान विशुद्ध होते. अनेकांचे प्रयोग त्यात उपयोगी पडलेले असतात.
भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात ‘बघ, योगशास्त्राचे ज्ञान मी तुला देणार आहे. ते मी राजगुरू, राजर्षी आणि संतपदाला पोहोचलेल्या राजांना शिकविले आहे. त्याचे रहस्य मी आता तुझ्यासमोर उघड करीत आहे.’’
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः।
‘‘हा प्राचीन मार्ग, योगशास्त्र जे मी पूर्वीही शिकवले आहे ते तुलाही सांगणार आहे. कारण तू भक्त आहेस, माझा मित्र आहेस, मला प्रिय आहेस आणि म्हणूनच मी तुला त्याचे रहस्य सांगणार आहे.
उत्तमम म्हणजे सर्वोच्च. हे सर्वोच्च रहस्य, ज्ञान मी आता तुझ्यासमोर खुले करणार आहे!’’
यावेळी अर्जुनाच्या मनात एक शंका उपस्थित झाली. तो म्हणाला, ‘हे कृष्णा मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. माझ्या मनात शंका आहे. विवास्वन लक्षावधी वर्षांपूर्वी होऊन गेला आणि आपण आज जगतो आहोत. तू आता जन्माला आला आहेस. जो हजारो वर्षांपूर्वी होऊन गेला त्या विवस्वनाला तू योग शिकविलास यावर मी कसा विश्वास ठेवू?’’
त्यावर कृष्ण भगवान म्हणाले, ‘‘अर्जुना तू आणि मी अनेक जन्म घेतले आहेत. तू येथे यापूर्वी अनेकदा येऊन गेला आहेस. मीसुद्धा. पण तुला आठवत नाही, मला मात्र आठवते; एवढाच काय तो फरक. आत्म्याला जन्म नसतो!’’ दुसऱ्या अध्यायात कृष्णाने सांगून ठेवले आहे की, ‘आत्मा जन्माला येत नाही. तो सर्वत्र असतो, तो एक असतो. अमर असतो. तो जीव, स्व, अवकाश जन्माला येत नाही. अर्थातच त्याचा मृत्यू होत नाही.’
भगवान म्हणतात, ‘‘होय अर्थातच मला मृत्यू नाही. मी या विश्वाचा नियंता आहे; पण माझ्या स्वतःच्याच मायेने, माझ्याच मुखवट्याने ते अवकाश पुन्हा साकार झाले आहे. मी प्रकृतीत सामावतो. तो माझा स्वभाव आहे. व्यक्तिगत आत्मा म्हणून मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो.
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया।।
माझ्या इच्छेने, ठरवून मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो!’’